माणसाला रोगमुक्त करण्याशी तसेच निरोगी ठेवण्याशी निगडित असलेल्या विज्ञानाच्या शाखेला वैद्यक म्हणतात. रुग्णाला रोगापासून मुक्त करण्यासाठी किंवा रोगाच्या लक्षणांच्या परिहारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रिया वैद्यकीय चिकित्सेत येतात. रोगाविरुद्ध शरीरात प्रक्रिया करण्यासाठी जे उपचार करतात, त्या पद्धतीला अॅलोपॅथी (विषम चिकित्सा किंवा आधुनिक चिकित्सा) पद्धती म्हणतात. याशिवाय आयुर्वेद, होमिओपॅथी (समचिकित्सा), बारा-क्षार चिकित्सा इत्यादी वैद्यकीय पद्धती आहेत. युनानी वैद्यक ही अशीच एक पद्धती आहे. यवन या संस्कृत शब्दाचा अर्थ ग्रीक पुरुष वा अनार्य असा असून यवनांनी पुढे आणलेल्या वैद्यकीय पद्धतीला युनानी वैद्यक म्हटले गेले. अरबी लोकांनी ग्रीकांचे वैद्यक जाणून घेतले, तसेच त्यात भरही घातली. अशा रीतीने प्रगत झालेल्या वैद्यकाला त्यांनी युनानी वैद्यक हे नाव दिले.
पायथॅगोरस (इ.स.पू. सु. ५७५–४९५) यांचा उष्ण, शीत, आर्द्र व शुष्क या मूळ घटकांच्या गुणधर्मांचा सिद्धांत आणि हिपॉक्राटीझ (इ.स.पू. सु. ४६०–३७०) यांचा शरीरद्रव्य सिद्धांत हे ग्रीक वैद्यकाचे आधारभूत सिद्धांत आहेत. शरीरामध्ये स्वसंरक्षण किंवा सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असते; या ग्रीक वैद्यकाच्या तत्त्वानुसार, शरीर कोणताही विक्षोभ (रोगकारक स्थिती) व्यक्तीच्या प्रवृत्तीच्या मर्यादेनुसार दूर करू शकते. मूळ घटक व शरीरद्रव्ये एकमेकांशी निगडित असतात. शरीरद्रव्यांचे योग्य व संतुलित मिश्रण म्हणजेच शरीर व मन यांचे स्वास्थ किंवा आरोग्य होय आणि त्यांच्यात झालेला बिघाड म्हणजे रोग, हा प्राचीन ग्रीक वैद्यकाचा सिद्धांत होय. युनानी वैद्यकाची उभारणी याच सिद्धांतावर झालेली आहे. म्हणून युनानी हकीम (वैद्य) त्याच्या औषधांच्या मदतीने शरीराची आत्मसंरक्षण करण्याची क्षमता जागृत करण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करतो आणि रुग्णाला बरे करून त्याचे आरोग्य पूर्ववत करतो.
ग्रीक व अरबी वैद्यक यांच्यात दीर्घकाळ युती होती. ग्रीक वैद्य केवळ अनुभवसिद्धता व गूढवाद यांवर विसंबून होते. उलट अरबांनी गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोल, वैद्यक आणि वनस्पतिविज्ञान यांचा युरोपीयनांना परिचय करून दिला. बगदादच्या खलिफांचे वैद्य व वझीर असलेल्या इब्न सीना (अॅव्हिसेना, इ.स. सु. ९८०–१०३७) यांनी विविध विषयांवर शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी अल्-कानून फी अल् तिब्ब या ग्रंथात त्यांनी वैद्यकाचे सर्व ज्ञान क्रमवार सांगितले आहे. त्यांनी या ग्रंथात अॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४–३२२) आणि गेलेन (इ.स. १३१–२०१) यांच्या आणि त्या काळातील वैद्यकीय तत्त्वांची जुळणी करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे मध्ययुगातील वैद्यकांचा तो आधारभूत ग्रंथ होता. ग्रीक वैद्यकातील विखुरलेल्या ज्ञानाचे वर्गीकरण, उपरुग्ण वैद्यकाची सुरुवात आणि विकृतिविज्ञानात नवीन रोगवर्णनांची घातलेली भर ही अरबी वैद्यकाच्या प्रगतीची क्षेत्रे आहेत. शिवाय इ.स. ७००–११०० या काळात अरबी वैद्यकावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत.
खलिफा हारुन-अल्-रशीद (इ.स. सु. ७६४ – ८०९) यांच्या काळापासून आयुर्वेद व अरबी वैद्यक यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला. आयुर्वेद जाणणाऱ्या काही तज्ज्ञांनी बगदादला भेट दिली होती. तसेच भारत युनानी हकीमांनी सुश्रुत, वाग्भट वगैरेंच्या आयुर्वेदिक ग्रंथांतील माहितीचा उपयोग केला होता.
मूलभूत सिद्धांत समजण्याकरिता रक्त, पीत पित्त, कृष्ण पित्त व श्लेष्मा या चार पदार्थांचे (द्रव्यांचे) संतुलित मिश्रण म्हणजे आरोग्य आणि असंतुलित मिश्रण म्हणजे रोग हा ग्रीक वैद्यकातील शरीरद्रव्य सिद्धांत जाणून घ्यावा लागतो. युनानी वैद्यकात खून, बलगम, सफरा व सौदा ही चार शरीरद्रव्ये म्हणजे खिल्त मानली आहेत. सेवन केलेल्या अन्नपदार्थांपासून यकृतात निर्माण होणारे व शरीरपोषणास उपयुक्त असे आर्द्र किंवा द्रव पदार्थ म्हणजे खिल्त होत. त्यांचे अदृश्य आणि दृश्य हे दोन प्रकार असून त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. यकृतातून बाहेर पडणाऱ्या रक्तात चारही खिल्त असतात. अन्नरसापासून अधिकांश खून, त्यानंतर बलगम, त्याखालोखाल सफरा व अल्प प्रमाणात सौदा निर्माण होतात. हे विकृत झाल्यास त्यांचे रंग, रुची, घनता वगैरे गुणधर्म बदलून विविध रोग उद्भवतात.
युनानी वैद्यकात रोगनिदान आणि चिकित्सा यांसाठी रुग्ण परीक्षेने ठरविलेली रोगाची लक्षणे व चिन्हे यांचा वापर करतात. प्रमुख रोगचिन्हांवरून रोगाचे नाव देतात. रोगनिदानासाठी नाडी परीक्षा म्हणजे नब्द हे मुख्य साधन आहे. निष्णात हकीम (म्हणजे नब्बाद) यात तरबेज असतो. इब्न सीना यांच्या मते नाडीचे दहा प्रकार असून त्यांवर शरीराची स्थिती ठरविता येते. निदानाकरिता हकीम नाडीव्यतिरिक्त मूत्र (बौल) व विष्ठा (बराज) यांचीही परीक्षा करतात. मूत्राचे अठरा प्रकारचे रंग निरनिराळे रोग दर्शवितात व त्यांची रोगनिदानास मदत होते.
युनानी औषधे मुख्यत: वनस्पतींपासून तयार करतात. काही युनानी औषधे खनिज किंवा प्राण्यांपासून बनविलेली आहेत. यकृत विकारावर प्राण्यांच्या यकृताचा अर्क, तर मानसिक विकृतीवर मेंदूचा अर्क देतात. जवळजवळ समाधान करणारी, मंदपणे परिणाम करणारी, किंचित जलदपणे व अधिक जलदपणे परिणाम करणारी औषधे तसेच मंदपणे व जलदपणे परिणाम करणारी विषे हे युनानी औषधांचे सहा वर्ग असून सुरुवात बहुधा समाधानकारक औषधे व आहारातील बदल यांनी करतात आणि हळूहळू अधिकाधिक प्रभावी औषधे देतात. रोगाच्या अगदी तीव्र अवस्थेतच शुद्ध विषारी औषधे वापरतात. फक्त आहारातील बदलांद्वारे रोग बरा करणारा हकीम सर्वात चांगला मानतात. जठर व यकृत यांच्या दीर्घकालीन विकारांवर युनानी औषधे गुणकारी आहेत. युनानी औषधे बहुधा अनेक औषधांची मिश्रणे असतात.
युनानी औषधे आधुनिक उपकरणे तसेच तंत्रे वापरून तयार करण्यात येऊ लागली आहेत. ती आवेष्टितही करतात व त्यांच्याविषयी संशोधन केले जाते; उदा., दिल्ली येथील हमदर्द रिसर्च क्लिनिक अँड नर्सिंग होम. युनानी हकीमांना निसर्गोपचारही माहीत आहेत. उदा. सूर्य-स्नान, तुर्की स्नान. पूर्वी युनानी वैद्यक शस्त्रक्रिया करीत असत; नंतर मात्र त्यांनी शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
अरब व्यापाऱ्यांबरोबर भारतात आलेल्या युनानी वैद्यकाची मोगलांच्या काळात प्रसार व भरभराट झाली होती. भारतीय हकीमांनी येथील स्थानिक हवामानास अनुकूल असे फेरफार करून युनानी वैद्यकाला पूर्णपणे देशी रूप दिले. त्यातील अरबी ग्रंथांचे प्रथम पर्शियन व नंतर उर्दू भाषेत अनुवाद करण्यात आले. मसिहूल मुल्क हकीम अजमल खान यांनी भारतातील युनानी वैद्यकाची चांगल्या रीतीने मांडणी व बांधणी केली. त्यांनी दिल्लीमध्ये टिब्बिया कॉलेज स्थापन केले. भारतात अजमल खान टिब्बिया कॉलेज (अलीगढ), हमदर्द टिब्बी कॉलेज (दिल्ली) आणि आयुर्वेदिक अँड युनानी टिब्बिया कॉलेज (दिल्ली) या ठिकाणी युनानी वैद्यकाच्या शिक्षणाची सोय आहे. आजही भारताखेरीज पाकिस्तान व बांगला देश या देशांत युनानी वैद्यकाचा उपयोग केला जातो.