एक शोभिवंत व सदापर्णी वृक्ष. ही वनस्पती क्लुसिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅलोफायलम इनोफायलम आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील पूर्व व पश्चिम समुद्रकिनार्‍यांच्या प्रदेशांतील असून म्यानमार, श्रीलंका, अंदमान बेटे, वेस्ट इंडिज बेटे, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणीही आढळतो. भारतातील पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांवर तसेच नदीच्या किनारी या वृक्षाची लागवड केली जाते. काही ठिकाणी याला ‘सुरंगी’ व ‘उंडण’ अशीही नावे आहेत. रेताड जमिनीत हा जोमाने वाढू शकतो.

मध्यम आकाराचा हा वृक्ष १५-१८ मी. उंच वाढतो. अनेक फांद्या असलेल्या या वृक्षाचे खोड तपकिरी काळ्या रंगाचे असते. साल काळी. खवलेदार व भेगाळ असते. पाने साधी, गर्द हिरवी, जाड व चकचकीत असून पानाचे टोक गोल असते. ती ५-७ सेंमी. रुंद असून मध्यशिरेपासून समांतर शिराविन्यास दिसतो. फुले पांढरी व सुगंधी असतात. फळे गोल, पिवळसर रंगाची व आठळीयुक्त असतात. बिया अंडाकार असतात.

या वृक्षाची लागवड शोभेसाठी आणि तेलासाठी करतात. सावलीसाठी त्याचा उपयोग होतो. या वृक्षापासून मिळणारे लाकूड कठीण, मजबूत असल्यामुळे ते घरबांधणी, रेल्वे-स्लीपर्स आणि जहाजबांधणी इत्यादींसाठीही वापरतात. बियांचे तेल स्थिर, न सुकणारे गर्द हिरवे असते. त्वचारोग आणि सांधेदुखी यांवर ते गुणकारी असते. सौदर्यप्रसाधनांमध्ये या तेलाचा वापर करतात. बियांचे तेल जर्मनी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) या देशांत जैवइंधन म्हणून सर्व कसोट्यांना उतरले आहे. महाराष्ट्रतील कोंकण कृषी विद्यापीठात याबाबतीत संशोधन चालू आहे.