गिबन, गोरिला, ओरँगउटान आणि चिंपँझी या सस्तन प्राण्यांना ‘कपी’ अथवा ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. स्तनी वर्गाचा एक उपवर्ग अपरास्तनी (प्लॅसेंटॅलिया) असा आहे. या उपवर्गात १५-१८ गण असून त्यांपैकी एक गण नरवानर गण (प्रायमेट्स) आहे. या गणातील प्राणी सस्तन प्राण्यांत सर्वांत वरचे गणले गेले आहेत. यातील एक उपगण मानवानुगुण (अँथ्रोपॉयडिया) असून त्यात चार कुले आहेत. कुल सर्कोपिथेसिडीमध्ये माकडे आणि वानरे; कुल हायलोबेटिडीमध्ये गिबन; कुल पाँजिडीमध्ये चिंपँझी, गोरिला व ओरँगउटान; आणि कुल होमिनिडीमध्ये आधुनिक मानवाचा समावेश करण्यात आला आहे.
कपी या प्राण्यात आणि माणसात अनेक बाबतीत साम्य आढळून येते. हे साम्य प्रामुख्याने कवटी, मेंदू, ज्ञानेंद्रिये व दात यांत आहे. भ्रूणीय अवस्था व अपरा (वार) या मानवासारख्याच असतात. कपींना शेपूट नसते, चेहरा पसरट असतो आणि त्याच्या अनुषंगाने मस्तिष्ककोश मोठा असतो. बाह्यकर्ण लहान, धड ताठ ठेवण्याची पध्दत, हातापायांच्या बोटांना सपाट नखे ही लक्षणे माणसांच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. माणसांचे पाय हातांपेक्षा मोठे असतात; परंतु कपींचे हात त्यांच्या पायांच्या तुलनेत मोठे असतात. चेहर्याचे स्नायू, डोळे, ओठ यांच्या साहाय्याने कपी चेहर्यावर वेगवेगळे भाव प्रगट करतात. यांच्यात आंत्रपुच्छ असते. पायाचा अंगठा संमुख असतो. काही कपींत मनगटाचे हाड भ्रूणीय अवस्थेत माणसांप्रमाणेच असते. कपींच्या मेंदूमध्येही माणसाच्या मेंदूप्रमाणे सर्व भाग असतात; परंतु आकारमानाने हे भाग लहान असतात. कपींमध्ये ऋतुस्त्राव चक्र माणसासारखे असते. चिंपँझीमध्ये तर ऋतुस्त्रावातील अंतर माणसाप्रमाणेच २७-३० दिवसांचे असते. गोरिला, ओरँगउटान आणि चिंपँझी यांच्यात गर्भावस्थेचा काल सु. ९ महिन्यांचा असतो. ज्या रोगांची बाधा माणसांना होते, त्याच रोगाची बाधा कपींना होते. जॉर्ज नटाल या वैज्ञानिकाच्या प्रयोगावरून मानव व कपी यांचे रक्त समरूप आहे, हे सिध्द झाले आहे. यावरून कपी व माणूस यांत रासायनिक दृष्ट्याही साम्य आहे, हे दिसून येते.
कपींमध्ये अनेक भेदही आहेत. गिबन व ओरँगउटान वृक्षवासी आहेत. गोरिला आणि चिंपँझी अधिक काळ जमिनीवर वावरतात. चिंपँझी जमिनीवर राहणारा आहे. माणसाला २४ बरगड्या असतात. काही कपींत २४, तर काहींमध्ये २६ बरगड्या असतात.
शरीररचनाविज्ञान व शरीरक्रियाविज्ञान यांच्या दृष्टीने विचार केला असता माकडांपेक्षा गोरिला, ओरँगउटान व चिंपँझी हे माणसाला जवळचे आहेत. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रश्र्नाच्या दृष्टीने कपींना महत्त्वाचे स्थान आहे. याचा अर्थ एखाद्या कपीपासून माणूस उत्पन्न झाला अथवा उत्क्रांतीच्या मार्गावर असताना कोणत्या तरी कपीपासून माणसाची उत्पत्ती झाली, असा नव्हे. भूवैज्ञानिक कालगणनेनुसार फार प्राचीन नसलेल्या कोणत्या तरी काळात कपी व माणूस यांचा पूर्वज एक असावा, असे मानतात.