उंदीर

उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या १३७ प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग,  सायाळ व घूस यांसारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो. अशा सर्व प्राण्यांचे पुढील दात पटाशीसारखे असतात. या दातांचा उपयोग सतत कुरतडण्यासाठी होतो. उंदराचे पुढील दात आयुष्यभर वाढत असतात.

इंग्रजी भाषेतील हाउस माउस हा लहान आकाराचा काळ्या रंगाचा असून त्याचे शास्त्रीय नाव मस मस्क्युलस आहे. याला मस उंदीर म्हणणे योग्य ठरेल. सामान्यपणे घरामधून आढळणार्‍या मस उंदराचे मूळ वसतिस्थान पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थलांतराबरोबर मस उंदीर जगभर स्थलांतरित झाला. एकाच अन्न स्त्रोतावर अवलंबून असण्याच्या आणि परस्परांबरोबर राहण्याच्या प्रकारास जीवशास्त्रामध्ये सहभोजिता असे म्हणतात. पण उंदराचे रूपांतर उपद्रवी सहभोजी प्राण्यांमध्ये झाले आहे.

मस उंदीर आकाराने लहान, वजन ३०-५० ग्रॅ., लांबी ८-१० सेंमी. आणि शेपूट बारीक व शरीराएवढ्या लांबीचे असते. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. कान मोठे व मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद सारख्या आकाराचे व आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या व संख्येने अधिक असतात. गर्भावस्था १९-२० दिवस दुग्धकाल १३-१४ दिवसांचा असतो. पिले जन्मत: केसहीन असून जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण केस येतात. पिलांचे डोळे तिसर्‍या दिवशी उघडतात.

इंग्रजी भाषेत हाउस रॅट या नावाने ओळखला जाणारा उंदीर मोठ्या आकाराचा असून त्याचे शास्त्रीय नाव रॅटस रॅटस आहे. याला रॅटस उंदीर म्हणणे योग्य ठरेल. हे उंदीर घरात व शेतात आढळतात. हा आकाराने मोठा, रंग काळा भुरकट व पोटाकडील भाग फिकट असतो. याची लांबी १८-२० सेंमी., वजन १५०-२०० ग्रॅ. आणि शेपूट शरीरापेक्षा थोड्या कमी लांबीचे व बारीक असते. कान लहान आकाराचे असतात. मुस्कट मोठे व बोथट आणि त्याच्या दोन्ही बाजूंस लांब आणि राठ दृढरोम असतात. अग्रपाद पश्चपादाहून लहान असतात. वृषणकोश आकाराने मोठे आणि ठळकपणे दिसतात. लेंड्या आकाराने मोठ्या आणि संख्येने कमी असतात. गर्भावस्था २१-२४ दिवस व दुग्धकाल २१ दिवसांचा असतो. पिले जन्मत: केसहीन असून जन्मल्यानंतर पंधऱाव्या दिवशी अंगावर पूर्ण केस येतात. पिलांचे डोळे सहाव्या दिवशी उघडतात.

प्रत्यक्षात मस उंदीर आणि रॅटस उंदीर या दोन्ही प्रजातींमध्ये आनुवंशिकता, प्रजनन, बाह्य रूप (उदा., लांबी आणि वजन) शारीरविज्ञान इत्यादींमद्ये फरक आहे. मस उंदरामधील गुणसूत्रांची संख्या वीस आणि रॅटस उंदरामधील गुणसूत्रांची संख्या बावीस आहे.

मस उंदराच्या जीनोममधील बेस जोड्यांची संख्या २.६ लक्ष आहे, तर रॅटस उंदराच्या जीनोममध्ये २.७५ दक्षलक्ष बेस जोड्या आहेत. दोन्ही उंदरांचा संकर होत नाही. सर्वांत महत्त्वाचा बाह्य फरक म्हणजे मस उंदरांमध्ये स्तनाग्रांच्या पाच, तर रॅटस उंदरामध्ये स्तनाग्रांच्या सहा जोड्या आसतात. एका विणीमध्ये मस उंदरास ५-१० पिले आणि रॅटस उंदरास ६-१२ पिल्ले होतात.

मस उंदीर आणि रॅटस उंदीर हे स्वत: खाण्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. एका अंदाजानुसार भारतीय साठवणगृहातील एकपंचमांश धान्याची नासधूस उंदरांमुळे होते. उंदरांनी सरकारी गोदामातील सु. ८२ हजार टन धान्य जानेवारी २००६ ते सप्टेंबर २००९ या कालावधीत फस्त केले. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरावर असलेल्या पिसवांमधून एके काळी प्लेगसारखा संसर्गजन्य रोग पसरलेला होता. उंदराच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होतो.

रॅटस नॉर्वेजिकस हे करड्या उंदराचे शास्त्रीय नाव असून या जातीमधील माणसाळविलेले पांढरे उंदीर (रॅटस नार्वेजिकस अल्बिनस) प्रयोगशाळेत वाढविले जातात. जगभरातील आनुवंशिकता, ऊतिसंवर्धन रोग उपचार, प्रतिपिंड निर्मिती, आहार कमतरतेचे आजार, मधुमेह यांच्या संशोधनासाठी त्यांचा वापर होतो.

उंदराच्या गंधजनुकांच्या शोधासाठी लिंडा बक आणि रिचर्ड अ‍ॅक्सल यांना २००४ सालचे शारीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. मानवी गंधजनुके आणि उंदीर गंधजनुके यांच्या साधर्म्यामुळे या संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. उंदीर जनुक प्रकल्प आणि मानवी जनुक प्रकल्प यांच्या अभ्यासानंतर नेमक्या जनुकीय उपचारपद्धतीचे नवे क्षेत्र खुले झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा