सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षिकुलात केलेला आहे. कबूतरांच्या सु. ३०० वन्य आणि पाळीव जाती आहेत. या जाती पारव्यापासून (कोलंबा लिव्हिया) उत्पन्न झालेल्या आहेत, हे पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी लक्षात आणून दिले. सामान्यपणे आकाराने मोठ्या असणार्‍या जातीला कबूतर म्हणतात, तर लहान आकाराच्या जातीला होला म्हणतात. उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश वगळता कबूतरे जगभर सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशात ती विपुल असतात.
कबूतराचे अंग गुबगुबीत व आटोपशीर असून त्याच्या शरीरावरील पिसे दाट व मऊ असतात. डोके शरीराच्या मानाने लहान असते. पंख आखूड किंवा लांब असतात. शेपटी टोकदार, गोल किंवा बोथट असून लांबीला कमी-जास्त असते. कबूतराची चोच काहीशी लहान व टोकाला कठिण मात्र बुडाला मऊ असते. पाय बहुधा आखूड असतात. डोळ्यांचा रंग गुंजेसारखा लाल असतो. बर्‍याच जातींचे नर आणि माद्या दिसायला सारख्याच असतात. मात्र काही जातींत नराचा रंग मादीच्या रंगापेक्षा वेगळा असतो

कबूतरांचे मुख्य अन्न म्हणजे धान्य, कळ्या व छोटी फळे होय. मात्र पुष्कळ जाती कीटक व लहान गोगलगायी खातात. धान्यासोबत कबूतरे बारीक खडेही खातात. कबूतराच्या अन्ननलिकेत अन्नपुट आणि पेषणी असे वैशिष्ट्यपूर्ण भाग असतात. पेषणी ही स्नायूंची लहान आकाराची पिशवी असून, या भागात गिळलेले अन्न खड्यांच्या मदतीने बारीक केले जाते. पाणी पिताना कबूतरे पाण्यात चोच बुडवून पाणी सरळ ओढून घेतात.

कबूतरांचे प्रियाराधन चालू असताना ते एकमेकांना ‘गुटरगुऽऽ’ असा आवाज काढत आणि मान तुकवत एकमेकांना प्रतिसाद देतात. कबूतर हा समूहात राहणारा पक्षी आहे. प्रजननाचा हंगाम सोडून इतर काळात ते गटाने राहतात. काहींचे तर फार मोठे थवे असतात. काही जाती मात्र प्रजननाच्या काळात निवारा तयार करतात आणि तेथेच त्यांची वीण होते. बहुतेक सर्व कबूतरे काट्याकुटक्यापासून बेताचेच घरटे बांधतात. घरासाठी नर साहित्य जमवितो तर मादी एकटीच घर बांधते. सर्व जातींच्या माद्या एक किंवा दोन पांढरी अंडी घालतात. अंडी उबविण्याचे काम दिवसा नर, तर रात्री मादी असे दोघेही आळीपाळीने करतात. १७-१८ दिवसांनंतर पिले अंड्यातून बाहेर येतात.

नर आणि मादी या दोघांच्याही अन्नपुटात कपोतक्षीर निर्माण होते. पिलांच्या जन्मानंतर काही दिवस कपोत-क्षीर हेच पिलांचे मुख्य अन्न असते. हा पदार्थ सस्तन प्राण्याच्या दुधासारखा असून त्यात १५ %  प्रथिने आणि १० % मेद पदार्थ असतात. अन्नपुटाच्या पेशीस्तरापासून कपोत-क्षीर तयार होते. मानवी दुधाची निर्मिती जशी प्रोलॅक्टिन संप्रेरकामुळे होते तशी कपोत-क्षीराची निर्मितीही या संप्रेरकामुळे होते. कबूतराच्या पिलांची वाढ झपाट्याने होते. दहा दिवसांनंतर पिले नेहमीचे अन्न खाऊ शकतात. काही जातींची पिले दोन आठवड्यांत उडू शकतात.

पुष्कळ लोक छंद म्हणून कबूतरे पाळतात. अनेक जणांनी कृत्रिम निवडीच्या तत्त्वावर कबूतराच्या विविध प्रकारांची निपज केली आहे. उदा., गिर्रेबाज, लक्का, जॅकोबिन, कागदी, शिराजी, खैरी, लोटन, पायमोजी, चुडेल, बुदबुदा इत्यादी.

माणसाने कबूतरांचा अनेक कारणांसाठी उपयोग करून घेतला आहे. प्राचीन काळापासून पाळण्यात आलेल्या प्राण्यांपैकी कबूतर हा एक आहे. कबूतरांचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे खाण्यासाठी उपयोग करतात. पाश्चात्य देशांत तर हल्ली यांच्या मांसाचा पुरवठा करण्याकरिता कबूतरसंवर्धन हा एक मोठा उद्योग झालेला आहे. रोमन लोकांनी त्याचा अन्न म्हणून वापर करण्याबरोबरच संदेश पाठविण्यासाठी प्रथम उपयोग केला. संदेशवहनासाठी कबूतरांची एक विशिष्ट जातीची निपज केली जाते. ख्रिस्ती लोकांच्या धर्मयुद्धात कबूतरेच संदेश घेऊन जात असत. अकबराजवळ वीस हजार संदेशवाहक कबूतरे होती असे म्हणतात. दोन्ही महायुद्धांत कबूतरांचा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्यात आला. काही देशांत कबूतरांच्या वेगाने उडण्याच्या शर्यती लावतात. जगात बेल्जियमइतका कबूतरांचा शौकीन देश दुसरा क्वचितच असेल. बेल्जियममध्ये कबूतरांचे अनेक क्लब आहेत. तेथे कबूतरांच्या शर्यतीवर लोक पैसे लावतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा