करंजाची फुले व पाने

करंज ही वनस्पती लेग्युमिनोजी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पाँगॅमिया पिनॅटा आहे. मूळची आशिया खंडातील ही वनस्पती फिलिपीन्स, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व मध्य अमेरिकेतील उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात वाढते. कमाल २७०-३८० से. व किमान १०-१६० से. तापमान आणि ५०० – २,००० मिमी. पाऊस मानवणारी ही वनस्पती पडीत, रेताड, खडकाळ व निचर्‍याच्या तसेच क्षारयुक्त जमिनीतही चांगली वाढते. पूर्ण वाढ झालेले करंजाचे झाड पूर व हिमपातही सहन करू शकते.

मध्यम आकाराची ही वनस्पती ४-५ मी. उंचीपर्यंत वाढणारी असून तिचे खोड खुजे असते. फांद्या जाडजूड असून झाडाचा आकार छत्रीसारखा असतो. पाने, संयुक्त, पिसासारखी, लांब व टोकदार असतात. झाडाची सावली दाट असल्याने बाष्पीभवनाने जमिनीतील पाणी कमी होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते. फुलोरे पानांच्या बगलेत असून गुलाबी किंवा जांभळट छटा असलेली पांढरी फुले एप्रिल ते जूनमध्ये येतात. फुलांत भरपूर मकरंद असतो. शेंगा ३-६ सेंमी. लांब तर २-३ सेंमी. रुंद असतात. शेंगेत १-२ बिया असतात. बी साधारण १-२ सेंमी. लांब, चपटी व लाल-करड्या रंगाची असते. याचे मुख्य मूळ सोटमूळ असून त्याला अनेक उपमुळे असतात. मुख्य मूळ जमिनीत खूप खोलवर जाते, तर उपमुळे लांबपर्यंत पसरलेली असतात. मुळांच्या अशा रचनेमुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.

करंजाच्या बियांपासून पिवळसर करड्या रंगाचे अखाद्य तेल मिळते. या तेलाचा वापर भिंतीला देण्याच्या रंगात, साबण व कीटकनाशके बनविण्यासाठी, कातडी कमाविण्यासाठी तसेच वंगण म्हणून करतात. हे तेल बायोडीझेल किंवा डीझेलला पर्याय म्हणूनही वापरले जाते. तेलाचा वापर खरूज, नायटे, पुरळ इ. त्वचारोग तसेच संधिवात, खोकला यांवर करतात. मुळे व बी मत्स्यविष आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यासाठी करतात. पाने गुरांना चारा म्हणून वापरतात, तसेच जमिनीत गाडून चांगले खतही तयार होते. या खतामुळे शेतातील वाळवीचा उपद्रव कमी होतो. लाखेचे कीटक पोसण्यासाठी करंजाची लागवड करतात.

भारतात इंधन तेल उपलब्ध व्हावे म्हणून जट्रोपा या वनस्पतीसह करंजाची वाढ केली जाते. भारत सरकारने अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या निर्मितीसाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पांतर्गत सु. २ कोटी करंजांची रोपे देशात लावण्यात आलेली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा