प्राण्यांच्या शरीराला संरक्षण देणार्‍या लहान, कठिण व चकत्यांसारख्या संरचना. त्या त्वचेपासून उत्पन्न झालेल्या असतात. बहुतांशी मासे आणि अनेक साप व सरडे यांच्या बाह्यत्वचेवर खवले असतात. खवल्यांचे आकार, आकारमान, ते कसे रचले आहेत आणि ते कसे तयार होतात यांबाबतीत प्राण्यांच्या जातीजातींनुसार भिन्नता आढळते.

माशांमधील खवले

माशांमधील खवले रंगहीन असतात; माशांचे रंग खवल्यांखाली किंवा खवल्यांना जोडून असलेल्या संरचनांमुळे उठून दिसतात. माशांच्या सर्व जातींना खवले नसतात. काही माशांच्या शरीरावरील खवले एवढे लहान असतात की, ते मासे खवलेहीन वाटतात. काही माशांच्या शरीराच्या अत्यंत थोड्या भागावरच खवले असतात. माशांमधील खवले हाडांप्रमाणे कॅल्शियमयुक्त असतात. ते त्वचेपासून उत्पन्न होतात आणि अधित्वचेखाली असतात. काही माशांमध्ये खवल्यांची रचना कौले रचल्याप्रमाणे असते, तर काहींमध्ये फरश्या बसविल्याप्रमाणे असते.

संरचनेनुसार खवल्यांचे चार प्रकार करता येतात :

माशांच्या खवल्यांचे प्रकार

(१) प्लॅकॉइड खवले : शार्क आणि रे माशांच्या शरीरावर आकाराने पट्टीप्रमाणे (पट्टिकाभ) खवले असतात. हे खवले रचनेने दाताप्रमाणे असतात. वस्तुत: शार्क माशाचे दात हे पट्टिकाभ खवल्यांचे रूपांतर आहे. हे खवले एनॅमल सारख्या काचाभदंतिन नामक पदार्थाचा वरचा स्तर, दंतिनाचा खालचा स्तर, मज्जा पोकळ आणि त्वचेत रुतलेली चकतीसारखी आधारपट्टिका यांचे बनलेले असतात. पट्टिकाभ खवल्यांचा आकार माशांचा आकार वाढला तरीही वाढत नाही, मात्र शार्कची जशी वाढ होते तशी खवल्यांची संख्या वाढते.

(२) कॉस्मॉइड खवले: खवले हे सिलॅकँथ या अस्तंगत अस्थिमाशाच्या शरीरावर असत.   एनॅमलसारख्या काचाभदंतिनाचा वरचा स्तर, दंतिनासारख्या कॉस्मीन नावाच्या पदार्थांचा दुसरा कठिण स्तर, स्पंजासारख्या अस्थीचा तिसरा स्तर आणि चौथा स्तर भरीव अस्थिमय असतो. फुप्फुसमिनामध्येही खवले असतात. मात्र त्यांत रूपांतर घडून आलेले असून ते एकस्तरीय आहेत.

(३) गॅनॉइडी खवले : हे गार माशांच्या (लेपिडोस्टिडी कुल) आणि रीड माशांच्या (पॉलिप्टेरिडी कुल) त्वचेवर आढळतात. आकाराने समचतुर्भुजी असतात. त्यांत एक अस्थिमय स्तर, एक कॉस्मीनचा स्तर आणि त्यावर एनॅमलसारख्या अत्यंत कठिण गॅनॉइडचे आवरण असते.

(४) लेप्टॉइड खवले : हे गॅनॉइड खवल्यांतील गॅनाइन स्तराच्या र्‍हासामुळे निर्माण झाले असावेत, असे मानतात. त्यांत अस्थींचा केवळ एक स्तर असतो. मोठ्या अस्थिमाशांच्या शरीरावर लेप्टॉइड खवले आढळतात. त्यांचे दोन प्रकार आहेत; चक्राभ (सायक्लॉइड) आणि कंकताभ (टेनॉइड). चक्राभ खवले वर्तुळाकार असून ते रोहू माशात आढळतात; तर कंकताभ खवले दातेरी असून ते अ‍ॅनाबास माशात आढळतात.

इतर प्राण्यांतील खवले 

सरपटणार्‍या  प्राण्यांच्या त्वचेचे दोन भाग पडतात; बाहेरील अधित्वचा आणि त्याखालील त्वचा. अधित्वचेपासून वरच्या बाजूला (पाठीवर) केराटिनमय काटेरी खवले उत्पन्न होतात. हे खवले माशांमध्ये आढळणार्‍या खवल्यांहून वेगळे असतात.

सरपटणार्‍या प्राण्यांमधील खवले त्यांच्या त्वचेची जलरोधी क्षमता वाढवितात. त्यामुळे त्वचेतील ओलसरपणा (आर्द्रता) टिकून राहतो. काही खवल्यांचे खास कार्यासाठी रूपांतर झालेले दिसते; उदा., सुसरीचे संरक्षक जाड खवले काही सरपटणार्‍या प्राण्यांचे (उदा., सरडा) खवले लहान आणि एकावर एक असतात, तर काहींचे (उदा., कासव) मोठे आणि एकाशेजारी एक असतात. सुसर, कासव आणि काही सरडे यांच्या अधित्वचेवरील खवल्याच्या खाली अस्थिमय चकत्या असतात. या चकत्या माशांच्या खवल्याप्रमाणे दिसतात. त्यांना वरूथिका म्हटले जाते. कासवात या अस्थिमय चकत्या एकत्र येऊन ढालीसारखे कवच बनते. साप आणि काही सरडे यांच्यात या अस्थिमय चकत्या नसतात.

सरडे आणि सापांसारखे प्राणी जसे वाढतात तसे त्यांचे खवले वाढत नाहीत. ठराविक काळानंतर हे खवले गळून पडतात आणि त्यानंतर किंचित मोठ्या आकाराचे खवले तयार होतात. बाहेरील त्वचा खराब झाल्यास किंवा अधिक अन्न खाल्यास कात टाकली जाते. कात टाकताना जुनी खवलेदार त्वचा सैल पडते आणि त्याखाली नव्याने तयार झालेल्या त्वचेपासून वेगळी होते. कासव आणि सुसरींसारखे प्राणी कात टाकत नाहीत. याउलट त्यांचे खवले टिकून राहतात आणि आकाराने वाढतात. त्याचबरोबर त्वचेखालील केराटिनाच्या स्तरामुळे हे खवले अधिक जाड होत जातात. मात्र या कवचाचा बाहेरील भाग कालांतराने किंवा अन्य कारणांनी मोकळा होऊ शकतो.

पक्ष्यांच्या फक्त पायांवरच खवले असतात. ते मुख्यत: केराटिनाचे बनलेले असतात. आर्मडिलो आणि खवल्या मांजर यांच्या संपूर्ण शरीरावर कठिण केराटिनाचे खवले असतात. काटेरी मुंगीखाऊ या प्राण्याच्या खवल्याचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते.

पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे काही अपृष्ठवंशी प्राण्यांतही (खास करून कीटकांत) खवले दिसतात. फुलपाखरे आणि पतंग यांच्या लेपिडोप्टेरा या गणाचे नाव त्यांनी खवले धारण करण्यामुळे पडले आहे. हे खवले केराटिनापासून बनलेले असतात. यांच्या पृष्ठभागावर रंगछटा निर्माण करणारी रंगद्रव्ये असल्याने त्यांवरून प्रकाशाचे परावर्तन होऊन विविध आकर्षक रंग दिसतात. काही लहान कीटकांचे संपूर्ण शरीर एकाच खवल्याने आच्छादलेले असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा