अ) भारतातील काही उल्लेखनीय पूल :
- भूपेन हजारिका सेतू किंवा धोला-सादिया नदी पूल, आसाम व अरुणाचल प्रदेश : दोन प्रदेशांना जोडणाऱ्या ह्या तुळई पुलाची एकंदर लांबी ९.१५ किमी. (५.६९ मैल) असून सध्या तो भारतातील सर्वांत लांब पूल आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी लोहित नदीवरील ह्या पुलाची रुंदी १२.९ मी.(४२ फूट) आहे. सीमेच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या अवजड लष्करी रणगाड्यांसाठी (वजन १३०,००० पौंड) हा पूल सक्षम आहे. सर्वात लांब गाळा ५० मी.(१६० फूट) आहे, तर गाळ्यांची संख्या १८३ आहे. हा पूल मे २०१७ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
- राजीव गांधी सागरी सेतू किंवा वांद्रे – वरळी सागरी सेतू, मुंबई, महाराष्ट्र : मुंबई शहरातील वांद्रे आणि वरळी ह्या दोन भागांना जोडणाऱ्या पुलाची एकंदर लांबी ४.७ किमी. (२.९२ मैल) असून पाण्यावरील लांब पुलांत भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ह्या जुळ्या (Twin) पुलाची रुंदी १८.१ मी.(५९ फूट) असून त्यावरून प्रत्येकी चार वाहनमार्ग जातात. मुख्य गाळा लांबी २५० मी.(८२० फूट) आहे, तर त्याच्या मनोऱ्याची उंची १२५ मी.(४१०फूट) आहे. दोन्ही पूल मार्च २०१० मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
- विद्यासागर सेतू, कोलकाता, पश्चिम बंगाल : हुगळी नदीच्या काठावरील कोलकाता आणि हावडा ह्या दोन शहरांना जोडणारा हा भारतातील पहिला केबल-आधारित पूल होय. पुलाची एकंदर लांबी ८२३ मी. (२७०० फूट) असून सर्वांत लांब गाळ्याची लांबी ४५७.२ मी.(१५०० फूट) आहे. ३५ मी.(११५ फूट) रुंदीच्या ह्या पुलावरून दोन्ही दिशांना जाणारे तीन-तीन असे एकंदर सहा वाहनमार्ग आहेत. जलवाहतुकीसाठी निष्कासन २६ मी.(८५ फूट) आहे. पुलाचे मनोरे १२२ मी. (४०० फूट) उंच आहेत. हा पूल १९९२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९९९ पर्यंत पुलाची गणना आशियातील सर्वात लांब गाळ्याच्या केबल – आधारित पुलात तर जगात तिसऱ्या क्रमांकावर गणना होती.
- दिघा-सोनपूर सेतू किंवा जयप्रकाश सेतू, बिहार : बिहारच्या उत्तर-दक्षिण भागांना जोडणारा हा गंगा नदीवरील पूल पोलादी तुळई तसेच इंग्रजी आद्याक्षर K च्या आकाराच्या कैच्यांनी बनविलेला आहे. पूल रस्तामार्ग तसेच रूळमार्गासाठी असून त्याची लांबी ४.५५६ किमी (२.८३ मैल) आहे. भारतातील हा सर्वांत लांब रस्ता – रूळ मार्ग पूल आहे. ह्या दुमजली पुलाची रुंदी १० मी.(३३ फूट) असून खालच्या मजल्यावरून दोन रूळमार्ग तर वरच्यावरून दोन वाहनमार्ग जातात. सर्वांत लांब गाळा २२३ मी. (४४० फूट) असून एकूण ३६ गाळे पुलामध्ये आहेत. रूळमार्ग मार्च २०१६ मध्ये तर रस्तामार्ग जून २०१७ मध्ये, अशा दोन टप्प्यांत पूल वाहतुकीसाठी उघडण्यात आला.
- गोदावरी कैची पूल किंवा कोव्वूर – राजमुंड्री पूल, आंध्र प्रदेश : राजमुंड्री व कोव्वूर ह्या दोन शहरांना जोडणारा गोदावरी नदीवरील हा पूल रस्ता तसेच रूळमार्गासाठी आहे. पुलाची एकंदर लांबी ४.१ किमी.(२.५ मैल) असून तो रस्ता-रूळ मार्ग पुलात भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ह्या दुमजली कैची पुलाच्या वरच्या मजल्यावर दोन वाहन मार्ग तर खालच्या मजल्यावर एका रुळमार्गाची सोय आहे. सर्वांत लांब गाळा ९१.५ मी.(३००फूट) असून पुलाची एकंदर गाळा संख्या २७ आहे. पूल १९७४ मध्ये बांधून पूर्ण झाला.
- हावडा पूल किंवा रविंद्र सेतू, कोलकाता, पश्चिम बंगाल : कोलकाता आणि हावडा ह्या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या, हुगळी नदीवरील पुलाची एकंदर लांबी ७०५ मी. (२,३१३ फूट) आहे. सर्वांत लांब गाळ्याची लांबी ४५७.२ मी. (१,५०० फूट) असून त्याची उभारणी संतुलित प्रक्षेपी (Balanced Cantilever) पद्धतीने केली गेली. ह्या पोलादी पुलासाठी इंग्रजी आद्याक्षर K आकाराच्या कैच्यांचा उपयोग करण्यात आला. पुलाची रुंदी २१.६ मी. (७१ फूट) असून त्यावर चार वाहन मार्ग तसेच दोन्ही बाजूंना ४.६ मी. (१५ फूट) रुंदीच्या पादचारी मार्गांची सोय आहे. पुलाखालून जाणाऱ्या बोटींसाठी निष्कासन ८.८ मी. (२९ फूट) आहे. पूल १९४३ मध्ये उघडण्यात आला.
- निवेदिता पूल, कोलकाता, पश्चिम बंगाल : कोलकाता शहरातील दक्षिणेश्वर काली मंदिराजवळील हुगळी नदीवरचा हा केबल-आधारित पूल एकंदर ८८० मी. (२,४९० फूट) लांब आहे. १९३२ साली बांधण्यात आलेला विवेकानंद सेतू वाहतुकीसाठी कमजोर झाल्याने त्यापासून अवघ्या ५० मी. (१६४ फूट) अंतरावर हा नवा पूल २००७ मध्ये पूर्ण करण्यात आला. पुलासाठी सात केबल-आधारित गाळे आहेत. ह्या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील हा पहिला पूल की ज्यात प्रत्येक गाळ्याची तक्तपोशी एका १४ मी. (४६ फूट) उंचीच्या मध्यवर्ती मनोऱ्यावरून सोडलेल्या आधार केबलाद्वारे पेलत आहे. (त्याउलट विद्यासागर सेतूमध्ये पूल तक्तपोशीची दोन टोके बाजूच्या दोन मनोऱ्यांवरून सोडलेल्या आधार केबलांवर विसावली आहेत.) एकंदर २५४ पूर्व-प्रतिबलित काँक्रिट तुळयांवर तक्तपोशी आधारलेली आहे परंतु जास्त आधारासाठी आधारित-केबलांचा उपयोग करण्यात आला आहे. पुलाची रुंदी २९ मी. (९५ फूट) असून एका बाजूला तीन वाहनमार्ग म्हणजेच दोन्ही बाजूंना एकंदर सहा वाहनमार्गांची पुलावर सोय आहे.
- चिनाब पूल, जम्मू काश्मीर राज्य : जम्मू व बारामुल्ला ह्या दोन शहरांना रूळमार्गाने जोडणाऱ्या मार्गातील चेनाब नदीवरचा हा, पोलाद व काँक्रिटच्या साहाय्याने उभारण्यात येत असलेला, कमानी पूल आहे. ह्याची एकंदर लांबी १,३१५ मी. (४,३१४ फूट) असून सर्वांत लांब गाळा आहे. ४६७ मी. (१,५३२फूट) एकंदर गाळ्यांची संख्या १७ आहे. पूल नदीपासून ३५९ मी. (१,१७८ फूट) उंचीवर असल्याने २०१९ मध्ये बांधून पूर्ण झाल्यावर जगातील सर्वांत उंच रूळमार्गावरील पुलांत पहिला क्रमांक त्याचा असेल.
आ) जगातील सर्वांत उंच दोन पूल : पुढील दोन पुल हे उंचीचा उच्चांक गाठणारे जगातील उल्लेखनीय पुल आहेत. पहिला जलदमार्गासाठी तर दुसरा पादचाऱ्यांसाठी.
- सी डू नदी पूल, चीन : शांघाय ते चेंगडूपर्यंतच्या जलदमार्गावरील हुबै (Hubai) प्रांतातील सी डू नदीवरील ह्या पोलादी कैचीच्या निलंबी पुलाची एकंदर लांबी १,२२२ मी. (४,००८ फूट) आहे. सर्वांत लांब निलंबी गाळ्याची लांबी ९०० मी.(२,९५२) आहे. नदीपात्रापासून पुलाची उंची ४७२मी. (१,५४८ फूट – अंदाजे १६६ मजली) असल्याने सध्या तो जगातील सर्वांत उंच पुलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ह्या पुलाच्या उभारणीचे वैशिष्ट्य म्हणजे निलंबकांसाठी मुख्य केबलांची उभारणी! मुख्य केबल जागेवर बसविण्यासाठी प्रथमतः मार्गदर्शक (Pilot) केबलचा उपयोग करण्यात येतो. एखाद्या खाडीवरील किंवा नदीवरील पुलाच्या मार्गदर्शक केबलसाठी बोटींचा किंवा हेलिकॉप्टरचा वापर करता येतो. परंतु येथील खोल दरी, दाट झाडी व वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरामुळे अशा नेहमीच्या पद्धतीचा उपयोग करणे अशक्य होते. त्यासाठी एक अभिनव पद्धतीचा म्हणजे सैनिकी रॉकेटचा उपयोग केला गेला. खास क्षेपण पद्धत (Launching System) वापरून ही केबल दरीच्या एका भागापासून पलीकडच्या भागापर्यंत फेकण्यात आली. पुलाची रुंदी २४.५ मी. (८० फूट) असून त्यावर सहा वाहनमार्गांची सोय करण्यात आलेली आहे. वाहतुकीसाठी पूल २००९ साली खुला करण्यात आला.
- झरमॅट-ग्राचेन पादचारी पूल किंवा चार्ल्स कुओनेन पादचारी पूल, स्वित्झर्लंड : झरमॅट (Zermatt) व ग्राचेन (Grachen) ह्या दोन शहरांना जोडणाऱ्या निलंबी पादचारी पुलाची लांबी ४९४ मी. (१,६२१ फूट) असून तो जुलै २०१७ मध्ये उघडण्यात आला. त्याच्या आधीचा कमी लांबीचा तसेच उंचीचा पादचारी पूल हिमलोटामुळे (Avalanche) २०१० मध्ये कोसळला होता. आता त्या जागी लांब व उंच जमिनीपासून ८५ मी. (२७९ फूट – जवळजवळ ३० मजले) उंच पूल बांधण्यात आला. सध्या तो सर्व पादचारी पुलांत लांबीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेला आहे.
समीक्षक : विनायक सूर्यवंशी