रस्तामार्ग तसेच रूळमार्ग यांवर येणारे विविध अडथळे पार करण्यासाठी बांधलेली संरचना (Structure) म्हणजे पूल होय. नाले, ओढे, नद्या, दऱ्या, तलाव, सरोवरे, खाड्या, कालवे, आडवे  रस्ते व लोहमार्ग असे मार्गात येणारे विविध प्रकारचे अडथळे ओलांडण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुलांचा वापर करण्यात येतो.

मानवी इतिहासात पुलांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.  ही कामगिरी चार मुख्य प्रकारांत पुढीलप्रमाणे सांगता येते : (१) प्रदेशाच्या संरक्षणासाठी किंवा आक्रमक पवित्र्यासाठी; (२) अंतर्गत भागातून माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुलभ होण्यासाठी; (३) आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांचे आदानप्रदान सुकर करण्यासाठी; ४) स्वाक्षरी (Signature) पुलांमुळे पर्यटनाला उत्तेजन.

आ. १. आदिमानवाचा तुळई पूल

जगातील पुलांचा इतिहास पाहिला असता सुरुवातीला पूल संकल्पना (Design) व बांधकामासाठी लागणारी सामग्री (Material) मानवाने निसर्गाकडून घेतल्याचे दिसून येईल.

ओहोळाच्या काठावरील झाडाची फांदी पलीकडच्या काठापर्यंत पसरल्याचे पाहून आदिमानवाला लाकडाचा ओंडका पात्रावर टाकून ओहोळ पार करण्याची कल्पना सुचली असावी. हा झाला पहिला तुळई (Beam or Girder) पूल.

डोंगराळ प्रदेशातील उतारांमुळे ओढे किंवा नद्यांच्या प्रवाहाला चांगलीच ओढ असते.  अशा स्थितीत पात्रात आधार उभारणे अवघड जाते. त्या ठिकाणी दोन्ही काठांवरून लाकडाचे ओंडके एकावर एक रचून प्रक्षेपित (Cantilever) करायचे व त्या दोन्ही प्रक्षेपित भागांवर मधे ओंडके ठेवून पूल पूर्ण करण्याची (किंवा मधले अंतर भरण्याची) युक्ती योजली.  अशा प्रकारच्या प्रक्षेपी पुलाचा उदय प्रथम भारतात झाल्याची नोंद आहे.  आजही जम्मू व काश्मीर राज्यात असे प्रक्षेपी लाकडी पूल पहावयास मिळतात.

आ. २. प्रक्षेपी तुळई पूल

ओढ्याच्या दोन्ही काठांवरून झाडाच्या वेली एकमेकांशी गुंतल्याचे लक्षात येताच, मानव माकडाप्रमाणे, त्याला लोंबकळत पात्र ओलांडू लागला. त्यावरून निलंबी (Suspension) पुलाची कल्पना मानवाला सुचली.  पुढे दोरखंड वळण्याचा शोध लागल्यावर खोल दरी पार करण्यासाठी त्यांच्या उपयोगाने मानव निलंबी पूल उभारू लागला. ह्या पूल प्रकाराचे जनकत्वही भारताकडेच जाते. असे दोरखंडी झुलते पूल उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात बांधले गेले. अलीकडे बांधण्यात आलेला हरिद्वारमधील ‘लक्ष्मण झूला’ हा प्रसिद्ध आहे.

 

चित्र ३. हरिद्वारमधील लक्ष्मण झूला

 

 

ओढा तसेच नदी रुंद असल्यास दोन्ही काठांच्या आधाराखेरीज पात्रात मधला आधारस्तंभ (Pier) बांधणे आवश्यक ठरल्यामुळे दोन गाळ्यांचे (Spans) पूल बांधले गेले. काही इतिहासकारांच्या मते, कमानी (Arch) पुलाची कल्पना मानवाला प्रक्षेपी पुलावरून मिळाली तर काही जण असे मानतात की, नैसर्गिक झीजेमुळे निर्माण होणाऱ्या डोंगरातील कमानींवरून मानवाला ह्या प्रकारच्या पुलांची स्फूर्ती मिळाली असावी.

 

 

चि. ४. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उटा (Utah) राज्यातील एक नैसर्गिक कमान असलेले छायाचित्र (सौजन्य : सुधीर शं. कुलकर्णी)

 

ऐतिहासिक काळात रोमन साम्राज्य बहुतांशी यूरोपभर पसरलेले होते.  त्याच्या संरक्षणासाठी तसेच दळणवळणासाठी रोमच्या सैन्याधिकाऱ्यांची अर्धवर्तुळाकार दगडी कमानीचे पूल बांधण्यास सुरुवात केली. अर्धवर्तुळाकार कमानींचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाळा किंवा कमान शेजारील दुसऱ्या कमानीवर अवलंबून नसणे. हे बांधलेले पूल, आज २००० वर्षांनंतरही फ्रान्स, इटली व स्पेन या देशांत पहावयास मिळतात.  नंतर बाराव्या शतकात दीर्घवर्तुळाकार दगडी कमानी बांधण्यात येऊ लागल्याने मधले आधारस्तंभ अरुंद होऊन कमानी उंच होऊ लागल्या. त्यामुळे पुराच्या पाण्यापासून रस्त्याला धोका उरला नाही. चौदाव्या शतकात कंसाकार कमानींच्या पूल उभारणीला गती मिळाली. ह्या आकाराच्या कमानींचे दोन प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे  होते : (१) गाळ्यांची लांबी वाढल्याने नदीपात्रातील आधारस्तंभांची संख्या कमी झाली. (२) पूल बांधकाम खर्चात बचत होऊ लागली.

आ. ५. दगडी कमाणी बांधणीचा विकास : (अ) रोमन काळ – अर्धवर्तुळाकार, (आ) बारावे शतक – दीर्घवर्तुळाकार, (इ) चौदावे शतक – कंसाकृती.

पूल-बांधणी तंत्राच्या विकासाच्या दृष्टीने पाहता अर्धवर्तुळाकार कमानींची जागा दीर्घवर्तुळाकार व कंसाकार कमानींनी घेतलेली आढळते. आकृती ५ मध्ये दगडी कमानी पूल बांधणीचा विकास दर्शविला आहे.

वरील चार मुख्य प्रकारांखेरीज उपप्रकारांत कैची व केबल आधारित यांचा समावेश होऊ शकेल. (आकृती ६).

आ. ६. पुलांचे उपप्रकार

प्राचीन काळापासून मानव तुळई पूल वापरत आहे.  रोमन काळात दगडी कमानी पूल उभारणीचा विकास होऊ लागला.  आधुनिक कमानी (पोलाद किंवा काँक्रिट) पुलांचे प्रकार आकृती ७ मध्ये दाखविले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोहमार्गांची बांधणी प्रथम इंग्लंड व नंतर अमेरिकेत सुरू झाली. त्याकरिता मार्गातील दऱ्या, नद्या वगैरे अडथळे ओलांडण्यासाठी कैची पुलांचा वापर सर्रास करण्यात येत होता.  पोलादाच्या शोधानंतर निलंबी पुलांच्या बांधकामाला चालना मिळाली.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलाद प्रचलित झाल्यावर लांब गाळ्यांच्या लोहमार्गावरील पुलांसाठी प्रक्षेपित पूल बांधण्याची प्रथा इंग्लंड, अमेरिका व कॅनडा या ठिकाणी सुरू झाली.

आ. ७. कमानी पुलांचे काही प्रकार : (अ) कमानी तक्तपोशी (Deck Arch), (आ) कोयताकृती आरपार (Through Arch), (इ) धनुष्याकृती (Bowstring Arch).

केबल-आधारित पूल हा निलंबी पुलाचा उपप्रकार आहे.  ह्या नवीन उपप्रकारांची वाढ दुसऱ्या महायुद्धानंतर होऊ लागली.  आकृती ८ मध्ये ‘पंखा’ कृती केबल मनोऱ्याच्या सर्वांत उंच जागी जोडलेल्या आहेत.  आकृती ८ मध्ये केबल ‘हार्प’ वाद्याच्या तारांसारख्या एकमेकांना समांतर आहेत. आकृती ८ मध्ये वरील दोन्ही पद्धतींचे मिश्रण (पंखा व हार्प एकत्रित) दाखविले आहे.

आ. ८. केबल आधारीत पुलाचे काही प्रकार : (अ) बहुकेबल ‘पंखा’कृती (Fan Type Cable-Stay ), (आ) बहुकेबल ‘हार्प’कृती (Harp Type Cable-Stay), (इ) बहुकेबल पंखा व हार्पकृती (Fan & Harp Type Cable-Stay).

पुलांचे आणखी काही प्रकार : चल सेतू (Movable Bridge). यात दोन प्रकार आहेत : (१) स्थायी स्वरूपाचे पूल, (२) तात्पुरते पूल.

(१) स्थायी चलसेतू  : काही ठराविक प्रमाणात – सतत नव्हे – बोटी, जहाजे व उंच पडाव (बार्ज) यांची वाहतूक चालू असते त्या ठिकाणी ‘स्थायी चलसेतू’ उपयोगी पडतात.  यांचा फायदा म्हणजे नदी किंवा कालवा पात्रामध्ये प्रस्तंभ (Pier) तसेच बाजूला लांब पोचमार्ग (Approach) बांधण्याची जरूरी नसते.  त्यामुळे बांधकामाचा वेळ व खर्च वाचतो.  मात्र गैरफायदा म्हणजे पूल परत आपल्या मूळ जागेवर आल्याशिवाय वाहनातील प्रवाशांना दोन्ही तीरांवर ताटकळत, वाट बघत बसावे लागते.  काही प्रमुख प्रकारच्या स्थायी चलसेतूंचे वर्णन खाली दिले आहे.

(अ) खेच पूल (Bascule Bridge) : फक्त एक बाजूचा खेचपूल खंदक ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ऐतिहासिक काळापासून उपयोग करीत असत.  आधुनिक काळातील दोन्ही बाजूंनी वर उचललेल्या पुलात लंडनचा टॉवर ब्रिज प्रख्यात आहे. (आकृती ९ ).

(आ) उचल पाळणापूल (Lift bridge) : दोन्ही बाजूंच्या प्रस्तंभांवर उंच मनोरे बांधून त्यांच्यावर ठेवलेल्या यंत्रणेद्वारे पुलाचा मधला भाग उद्वाहनासारखा (लिफ्टसारखा) वर उचलला जातो.  जलवाहतूक संपल्यावर मधला भाग आपल्या मूळ जागेवर बसविण्यात येतो. (आकृती ९ ).

(इ) फिरता पूल (Swing Bridge) : पात्रातील प्रस्तंभाचा आधार घेऊन संतुलित प्रक्षेपी (Balanced Cantilever) पूल बनवितात.  पुलाचे दोन गाळे, मधल्या प्रस्तंभ आधारावर फिरवून रस्त्याच्या काटकोनात किंवा प्रवाहाला समांतर उभे करतात.  त्यायोगे प्रस्तंभाच्या दोन्ही बाजूंनी जलवाहतूक होऊ शकते.  विशेषतः उंच जहाजे किंवा सागरनौका सहज रीत्या जाऊ शकतात.  जलवाहतूक पूर्ण झाल्यावर दोन्ही गाळे प्रवाहाला काटकोन करून परत आपल्या मूळ जागेवर येतात. (आकृती ९ ).

आ. ९. स्थायी स्वरूपाच्या चलसेतूचे प्रकार : (अ) खेच पूल – लंडनच्या थेम्स नदीवरील, (आ) उचल पाळणा पूल, (इ) फिरता पूल.

(२) तात्पुरता चलसेतू  : यामध्ये दोन प्रकार आहेत.

  • पाँटून पूल (Pontoon Bridge) – मोठी तरंगणारी लोखंडी पिंपे एकमेकांना जखडून तराफे करायचे. त्या तराफ्यांच्या पुलाचा उपयोग सैन्य वाहतुकीसाठी करतात. मात्र त्यानंतर लोखंडी पिंपाऐवजी लाकडी होड्यांचा वापर करण्यात येऊ लागला. हल्लीच्या काळात लाकडी होड्यांऐवजी रबरी होड्यांचा उपयोग करायला सुरुवात झाली. कारण रबरी होड्यांमध्ये हवा भरता येते तसेच त्यातून काढताही येते. त्याकारणाने पूल उभा करायला किंवा हटवायला फारसा वेळ लागत नाही. चित्र १० मध्ये जर्मनीत अमेरिकन सैन्याने मार्च १९४५ मध्ये उभारलेला ऱ्हाईन नदीवरील पाँटून पूल दाखविला आहे.
आ. १०. तात्पुरता चलसेतू : (अ) अमेरिकन सेनेने उभारलेला ऱ्‍हाईन नदीवरील पाँटून पूल, जर्मनी, मार्च १९४५.
आ. १०. तात्पुरता चलसेतू : (आ) ब्रिटिश रॉयल इंजिनियर उभारत असलेला बेली पूल इटली, सप्टेंबर १९४३.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  • बेली पूल (Bailey Bridge) : दुसऱ्या महायुद्धकाळात डॉनल्ड बेली ह्या ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्याच्या ह्या कल्पनेचा लढाईसाठी फार उपयोग झाला. पूल उभारणीसाठी वापरण्यात आलेले लाकूड व पोलादी पूर्वरचित भाग वजनाने हलके असल्याने योजनास्थळी नेण्यास सुलभ जात होते.  तसेच ह्या कैची पुलाची उभारणी हाताने होत असल्याने त्यासाठी वजनदार यारीची (क्रेन) जरूरी पडत नसे.  ताकदीने बळकट असलेल्या ह्या पुलावरून लष्करी रणगाडे सहज जाऊ शकतात. चित्र १० मध्ये ब्रिटिश रॉयल इंजिनियर उभारत असलेला बेली पूल दाखविला आहे.  सैनिक लाकडी फळ्या रस्त्याला समांतर असलेल्या तुळयांवर बसवीत आहेत. या लाकडी फळ्यांच्या तक्तपोशीवरून (Deck) रणगाडे व इतर वाहने जाऊ शकतात.

शांतता काळात नैसर्गिक आपत्ती – महापूर, त्सुनामी, भूकंप इत्यादी किंवा इतर कारणांमुळे कोसळलेल्या स्थायी पुलांच्या जागी तात्पुरते बेली पूल दळणवळण राखण्यासाठी उपयोगी पडतात.  भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर राज्यातील लडाख भागात जगातील सर्वांत उंच जागी बेली पूल बांधण्याचा विक्रम १९८२ मध्ये केलेला आहे.  हा पूल ३० मी. (९८ फूट) लांबीचा असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५६०२ मी. (१८३७९ फूट) आहे.

संदर्भ :

  •  मराठी विश्वकोश खंड ९, पूल, पृष्ठ १०१६ ते १०४१, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई १९८०.
  •  प्रगती पुलांची, सुधीर शं. कुलकर्णी, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई २००७.
  •  जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या, सुधीर शं. कुलकर्णी, ग्रंथायन प्रकाशन, मुंबई २००९.
  •  कथा जगप्रसिद्ध पुलांच्या … , सुधीर शं. कुलकर्णी, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई २०१२.

समीक्षक – विनायक सूर्यवंशी

प्रतिक्रिया व्यक्त करा