वज्रबोधी : (६७१–७४१). भारतीय बौद्ध भिक्षू. तो आठव्या शतकात चीनला गेला व अखेरपर्यंत तेथेच राहिला. त्याचा पिता ईशानवर्मन हा मध्य भारतातील एक क्षत्रिय राजा होता. वज्रबोधी हा त्याचा तिसरा मुलगा. वयाच्या दहाव्या वर्षीच त्याने घरदार सोडून नालंदा विद्यापीठात बौद्ध भिक्खू होण्याकरिता प्रवेश घेतला. तेथे सुरुवातीची चार-पाच वर्षे शांतिज्ञान नामक शिक्षकाकडून त्याने व्याकरणाचे अध्ययन केले. त्यानंतर गुजरातमध्ये प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ धर्मकीर्तीच्या ग्रंथांचे अध्ययन केल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी तो नालंदात परतला. तेव्हा त्याला भिक्खुसंघात पूर्ण प्रवेश देण्यात आला. त्याने पुढची सहा वर्षे महायान व हीनयान पंथांतील विनय ग्रंथांचे स्थान, त्या सोबतच प्रज्ञादीप, शतकशास्त्र, द्वादशमुखशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अध्ययन केले. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने कपिलवस्तू शहरातील जिनभद्र नामक शिक्षकाच्या हाताखाली मध्यांतविभाग, विज्ञप्तिमात्रतासिद्धी  इ. ग्रंथांचे अध्ययन केले.

वज्रबोधी तमिळनाडूत नागज्ञान नामक साधूचा शिष्य म्हणून सात वर्षे राहिला. या काळात त्याने वैरोचनसूत्र, योगसूत्र, महायानसूत्र  आणि अभिषेक पद्धतीचा अभ्यास केला. यानंतर त्याने गौतम बुद्धांच्या आयुष्यातील आठ महत्त्वाच्या घटना घडलेल्या ठिकाणांना व तेथील स्तूपांना भेट दिली. त्याच सुमारास तमिळनाडूतील पल्लव साम्राज्याधिपती नरसिंहपोतवर्मन याने आपला दूत त्याच्याकडे पाठवून त्याला दक्षिणेत येण्याची विनंती केली. तेथे तीन वर्षे सतत दुष्काळ पडलेला होता. वज्रबोधीने पावसाकरिता अभिषेक करून प्रार्थना केल्यास काहीतरी फरक पडेल, या आशेवर त्याला निमंत्रण दिले होते. ते स्वीकारून वज्रबोधी पल्लव राज्याची राजधानी कांचीपुरमला गेला. तेथे त्याने अभिषेक केला आणि योगायोगाने नेमका योग्य वेळी पाऊस पडला. त्यामुळे राजा व दरबाऱ्यांनी वज्रबोधीच्या सन्मानार्थ एक मोठा विहार बांधला. पुढे पल्लव राजाने त्याला आठ भिक्खू व सेवकांसोबत श्रीलंकेला पाठवले.

श्रीलंकेत अनुराधापुरामधील अभयगिरी विहारात तो सु. सहा महिने राहिला. पुन्हा तो तमिळनाडूला गेला. पल्लव राजाला लंकेतील वास्तव्याबद्दल सांगून आपण चीनला जाणार असल्याचे सांगितले. राजाने परवानगी दिली आणि सोबत मिझुण्णा नामक आपला एक सरदारही पाठवला. त्या सोबत चीनमधील तत्कालीन थांग सम्राटासाठी महाप्रज्ञापारमितासूत्राची एक संस्कृत प्रत, सात रत्ने जडवलेले एक सोन्याचे कडे, कर्णभूषणे, सुवासिक पदार्थ, इ. भेटवस्तू दिल्या. दिवसभरात समुद्र पार करून त्याचा काफिला लंकेत पोहोचला. तेथील श्रीशील नामक राजाने वज्रबोधीचे स्वागत केले. एक महिनाभर राजवाड्यात ठेवूनही वज्रबोधीचा चीनप्रवासाचा निश्चय कायम असल्याचे दिसल्यावर त्याला परवानगी दिली. रत्नांच्या व्यापारासाठी आलेल्या इराणी व्यापाऱ्यांच्या काफिल्यासोबत वज्रबोधी चीनला निघाला. महिन्याभरात हा ताफा लंकेहून श्रीविजय राज्यात, म्हणजेच सध्याच्या मलेशियात पोहोचला. तेथून चीनचा किनारा वीस दिवसांच्या अंतरावर होता. वाटेत अचानक वादळी वारे येऊन भर समुद्रात धुके पडले आणि बाकीची सर्व इराणी जहाजे अचानक दिसेनाशी झाली. खुद्द वज्रबोधीचे जहाज तीन वर्षे समुद्रावर भटकत राहिल्याची नोंद सापडते. यात अतिशयोक्ती असाव;, परंतु चीनमध्ये पोहोचायला नेहमीपेक्षा बराच जास्त काळ लागला. पुढे चीनमध्ये गुआंगफू येथे पोहोचल्यावर तेथील सुभेदाराने तब्बल दोनतीन हजार लोक पाठवून वज्रबोधी, मिझुण्णा यांचे स्वागत केले. अखेरीस थांग साम्राज्याची पूर्वेकडील राजधानी असलेल्या लुओयांगमध्ये इ. स. ७२० साली थांग सम्राट स्युआन जुंग उर्फ मिंग ह्वांग याच्याशी वज्रबोधीची पहिल्यांदा भेट झाली.

त्यानंतर शेवटपर्यंत वज्रबोधीला राजाश्रय होता. थांग (तांग) साम्राज्याची मुख्य राजधानी शिआन (मध्य चीन) आणि लुओयांग (पूर्व चीन) यांदरम्यान सम्राट ये-जा करताना वज्रबोधीलाही त्या सोबत नेले जाई. ७२३ साली त्याने शिआनमधील झिशेंग व जिनफू नामक विहारांमध्ये राहून संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर करणे सुरू केले. वज्रबोधीने भाषांतरित केलेल्या काही प्रमुख ग्रंथांची चिनी नावे चिआनशू-चिआनयान-ग्वानशिआन-पूसा-दाशेन-झूबेन, बूदोंग-शिझे-तुओलुओनी-बिमि-फा अशी आहेत. यथावकाश त्याला चिनी बौद्ध वर्तुळात ‘त्रिपिटकपंडित आणि श्रमण वज्रबोधी ऊर्फ जिनगांगझीʼ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याने भाषांतरित केलेले ग्रंथ म्हणजे महावैरोचनसूत्र, सर्वतथागततत्त्वसंग्रह  इ. असून त्यांच्या भाषांतरांचा समावेश तत्कालीन बौद्ध धर्माच्या कैयुआन  नामक कोशात करण्यात आला. यांपैकी सर्व तथागत तत्त्वसंग्रह  या ग्रंथाची मूळ संस्कृत प्रत ही वज्रबोधी समुद्रप्रवासात असताना समुद्रात फेकली जाऊन त्याचा सारांशरूप ग्रंथच काय तो त्याच्याजवळ राहिला. त्यामुळे याचे तपशीलवार चिनी भाषांतर पूर्णत: वज्रबोधीच्या स्मरणशक्तीवर अवलंबून केले गेले, हे विशेष. ७४१ साली वज्रबोधीला भारतात परत जाण्याची परवानगी देणारा आदेश सम्राट स्युआन जुंगने काढला, परंतु पूर्वेकडची राजधानी लुओयांगला पोहोचल्यावर वज्रबोधीची तब्येत बिघडली आणि तेथेच त्याचे निधन झाले.

त्याच्या स्मरणार्थ लुओयांगच्या जवळच लोंगमेन येथे एक स्तूप उभारण्यात आला. मरणोत्तर त्याला ग्वोशी म्हणजेच अखिल जगाचा शिक्षक अशी उपाधीही देण्यात आली.

चीनमधील वज्रबोधीच्या शिष्यांमध्ये भारतीय भिक्षू अमोघवज्र, कोरिअन भिक्षू ह्येचो हे सर्वांत प्रसिद्ध होत. त्यांच्या हस्ते व तसेच नंतरही वज्रबोधीची अनेक चरित्रे लिहिण्यात आली. सांप्रत चीनमध्ये झेनयांग व जपानमध्ये शिंगॉन नामक वज्रयान बौद्ध पंथ प्रचलित असून त्यांत वज्रबोधीसह अनेक भारतीय बौद्ध भिक्षूंना महत्त्वाचे स्थान आहे. चीनमधील बौद्ध धर्मावर आठव्या शतकापासूनच वज्रयान पंथाचा खूप प्रभाव पडू लागला होता. चीनहून जपान, कोरिया इत्यादी देशांत तो पसरला. कूकाइ या जपानी भिक्षूचा जपानमधील वज्रयान पंथाच्या प्रसारात मोठा हात होता. अमोघवज्राच्या शिष्यांमध्ये चिनी राजपरिवार व भिक्षूंसोबत जावा बेटातील बिआनहोंग नामक भिक्षूही होता. जावा बेटातील केलुराक गावात मिळालेल्या शिलालेखानुसार तिथे मंजुश्रीरूपी बुद्धाला अर्पण केलेले एक देऊळ बांधण्यात आले होते. शिलालेखातील ब्रह्मा-विष्णू-महेश आदी हिंदू देवतांचा उल्लेख वज्रयान प्रभावाचा सूचक आहे. या मागे वज्रबोधी किंवा त्याच्या शिष्यांचा शैलेंद्र राजसत्तेवर प्रभाव असावा, असा काही संशोधकांचा तर्क आहे.

संदर्भ :

  • Payne, Richard, K. Tantric Buddhism in East Asia, Masachussets, USA, 2006.
  • Sundberg, Jeffrey; Giebel, Rolf, The Life of the Tang Court Monk Vajrabodhi as Chronicled by Lü Xiang : South Indian and Śrī Laṅkān Antecedents to the Arrival of the Buddhist Vajrayāna in Eighth-Century Java and China, Pacific World (3rd Series) 13, California, USA, 2011.

                                                                                                                                                                                समीक्षक : प्रमोद जोगळेकर