कसर

कसर हा लहान कीटक १.२ ते १.८ सेंमी. लांब, चपळ व पंखहीन असतो. त्याच्या पोटाच्या शेवटच्या खंडापासून तीन शेपटासारखे अवयव फुटलेले असतात. थायसान्यूरा गणाच्या लेपिझ्माटिडी कुलात याचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव लेपिझ्मा सॅकॅरिनाआहे. या कीटकाची मुखांगे अन्न चावण्यासाठी बनलेली असतात. स्पृशा लांब आणि शरीरावर खवले असतात. याचा रंग चांदीसारखा चकाकणारा असल्याने त्याला ‘सिल्व्हर फिश’ असे नाव आहे. ज्या ठिकाणी वर्दळ नाही अशी थंड व अंधारी जागा तो पसंत करतो व उजेड पडल्यास जलद गतीने हालचाल करतो.

कसराची मादी प्रजातीनुसार दररोज एक ते पन्नास अंडी घालते. अंडी पांढरट व लांबट गोल असतात, अंड्यातून पिले बाहेर पडणे तापमानावर अवलंबून असते. सामान्यपणे ३३-३९० से. तापमान व ७०-८० टक्क्यांपर्यंत हवेतील आर्द्रता त्याला पोषक ठरते. अंड्यापासून पूर्ण वाढ होण्यास सु. सहा महिने लागतात. वाढीच्या काळात कसर ३ ते ४ वेळा कात टाकतो. विशेष म्हणजे याच्या जीवनचक्रात कोशावस्था नसते.

प्रथिने आणि कर्बोदके हे कसराचे मुख्य अन्न असून ते मिळविण्यासाठी तो अंधारात भटकतो. गुळगुळीत पृष्ठभाग असलेला कागद कसर विशेष करून खातो. हा कीटक पुस्तके, कागद व तत्सम पदार्थ, सुती व रेयॉन कपडे असलेल्या कपाटांत व पेट्यांत आढळतो. तो त्यातील वस्तूंचे नुकसान करतो. मात्र खरे रेशीम आणि लोकर असे पदार्थ शक्यतो खात नाही. पुस्तकाच्या बांधणीसाठी वापरलेली खळ, डिंक आणि गोंद अशा पदार्थांवर कसर उपजीविका करतो.

कसराचे आयुष्य तीन ते साडेतीन वर्षांचे आहे. इतर कीटकांच्या तुलनेत कसर तसा दीर्घायुषी आहे. एकदा अंड्यामधून बाहेर पडला की आयुष्यभर कसर एकाच परिसरात जे अन्न खाण्यास सुरुवात करतो त्याच पद्धतीच्या अन्नावर जगतो. एवढेच नाही तर अन्नाशिवाय कसर एक वर्षभर राहू शकतो.

उष्णकटिबंधात दरवर्षी जुने कपडे, पुस्तके व लाकडी सामान यांना उन्हाळ्यात उन्हे देण्याची पद्धत आहे. त्यामुळे कसरीचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. परंतु, शीत कटिबंधात, याचा उपद्रव दूर करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. कसरीचा उपद्रव झालेले जुने फर्निचर तसेच पुस्तके, पुठ्ठयांची खोकी, जुने लाकूड इत्यादींची खरेदी टाळल्यास कसरीचा प्रसार नियंत्रित करता येतो.