सापाचे खेळ दाखवून उदरनिर्वाह करणारी जमात. गारूडी म्‍हणजे जादूगार. ह्या जमातीतील लोक विषाचे दात काढलेले साप बाळगतात आणि त्‍या सापांद्वारे जनमाणसांसमोर खेळ करतात. साप हे त्‍यांचे जीवन जगण्‍याचे मुख्‍य साधन आहे. भारतभरात ही जमात आढळते. महाराष्‍ट्रातील ब-याच जिल्‍ह्यात ही जमात आढळते. ते विविध राज्‍यात भटकंती करताना आढळतात. मुख्‍यत: गारूडी हे मुस्लिमधर्मीय असतात. फोंड्रेके, तेत्‍यांके, पाडवाके तेजलॅनके, बिबिनके, पुनशिके अशा सहा कुळात महाराष्‍ट्रातील गारूडी समाज विभागलेला आहे. अतिविषारी अगर बिनविषारी साप पकडायचे आणि त्‍याआधारे भीतीयुक्‍त, विस्‍मयकारक पद्धतीने नजरबंदीचे खेळ दाखवायचे हा गारूडी लोकांचा परंपरागत व्‍यवसाय आहे. ह्या जादूच्‍या खेळानंतर ते जमलेल्‍या लोकांकडून पैसे मागतात. जमलेल्‍या लोकांवर अंधश्रद्धेच्‍या भितीचा पगडा बसवून अनेकदा जास्‍तीचे पैसे मिळविण्‍याचा गारूडी प्रयत्‍न करीत असतात.

गारूडी यांची विवाहपद्धतीतून सर्वसामान्‍य लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते. कुळ बघून विवाह जुळविले जातात. लग्‍नविधी काझी या मध्‍यस्‍थामार्फत पार पाडला जातो. गारूडी मुस्लिमधर्मीय असल्‍याने ते मुस्लिमाचे सण साजरे करतात. मुस्लिमांचा पीर आणि त्‍याची विविध रूपे गारूड्याचा देव असून हिंदूंच्‍या देवदेवताही त्‍यांना पूज्‍य असतात. इतर जमातीप्रमाणे सर्वसामान्‍य नवस,अंगारे धुपारे, अंगात येणे, भूतबाधा या अंधश्रद्धांचा पगडा या जमातीवरही आहे. जादूटोणा, भानामती आणि अघोरी विद्या हे प्रकार या जमातीत प्रबळ आहेत. बाळंत स्‍त्रीचा मृत्‍यू झाल्‍यास, तिच्‍या हाडाचा वापर करून बाहुली तयार केली जाते आणि त्‍या बाहुलीचा वापर अघोरीप्रकारे जादूटोणा, करणी अशा काही प्रकारात केला जातो. जातपंचायत ही न्‍यायव्‍यवस्‍था ह्या जमातीतही प्रचलीत आहे. अहमदनगर, करमाळा, पुणे या शहरात गारूडी समाजाच्‍या जातपंचायतीच्या जागा आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा