वाकोडे, मधुकर रूपराव :  (१ जानेवारी १९४३). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक, ललित लेखक, कादंबरीकार आणि वक्ते म्हणून लौकिक. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसोद या गावी झाला. तेथेच प्राथमिक शिक्षण. अकोट येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात मॅट्रिक आणि पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण. नागपूर विद्यापीठातून १९६८-६९ मध्ये खाजगीरीत्या पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६९ च्या जुलै मध्ये अंजनगाव सुर्जी येथील सारडा महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून रुजू. १९७७ मध्ये लोकसाहित्य आणि जानपद साहित्यावरील संशोधनाबद्दल विक्रम विश्वविद्यालय, उज्जैन येथून त्यांनी आचार्य पदवी (पीएच.डी) प्राप्त केली. सारडा महाविद्यालयात स्नातक- स्नातकोत्तर मराठी विषयाचे प्रपाठक या पदावर अध्यापन कार्य. एक अभ्यासू, चिंतनशील, व्यासंगी, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून ख्याती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कलाशाखेचे अधिष्ठाता, विद्यापीठ कार्यकारिणीचे सदस्य या नात्याने शैक्षणिक कार्य. सारडा महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख पदावरून २००२ साली निवृत्त. त्यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनुयायी आणि शाहीर अमरशेख यांचे स्नेही होते. आई गृहिणी होती, तिला लोकगीत गायनाची आवड होती. घरातील या प्रगल्भ वातावरणाचा प्रभाव बालवयातच त्यांच्यावर पडलेला होता.

मधुकर वाकोडे यांची साहित्य संपदा : कादंबरी – झेलझपाट (१९८९), सिलीपशेरा (१९९८), पान सरवा (२००६); ललित लेखन – काळी माती निळी नाती (२००१); समीक्षण – लोकप्रतिभा आणि लोकतत्वे (१९९४), लोकधाटीच्या वहिवाटी (२००५), मातृकाल यातील लामण दिवे (२०२०); संपादन – काया मातीत मातीत (१९९१- विठ्ठल वाघ यांच्या कविता), मराठी लोककथा (१९९२), मौखिकता आणि लोकसाहित्य (२००१), मौखिक परंपरेतील बालगीते (२००४); नाट्य – गोंधळी राजा आंधळी प्रजा (१९९५- जनवाद).

मधुकर वाकोडे यांच्या लेखनामध्ये लोकजीवन हे एक प्रधान सूत्र आहे. प्राध्यापक पेशामध्ये असताना त्यांनी केलेले संशोधन आणि अध्ययन यामध्ये लोकजीवनाचा एक व्याप आढळतो. लोकप्रतिभेच्या दृष्टीने श्रेष्ठ असणाऱ्या मौखिक साहित्यातील अधोरेखिते त्यांच्या ललित आणि संशोधकीय साहित्यात पाहायला मिळतात. झेलझपाट  ही त्यांची आदिवासींच्या जीवनावरील वास्तव अशी लोकप्रिय कादंबरी आहे. आदिवासींच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक जीवनाचे पारदर्शी चित्रण करणारी ही एक लोकधर्मीय कादंबरी मानली जाते. आदिवासींचा जीवनानुभव मुखर करणारी, त्यांच्या जीवन समस्या आणि जीवन संघर्षाची पटलं उकलत जाणारी ही एक तलस्पर्शी साहित्यकृती आहे. सिलीपशेरा  या कादंबरीमध्ये भटक्या झिंगाभोई समाजाचे खडतर जीवनदर्शन घडते. झेलझपाट आणि सिलिपशेरा या दोन्ही कादंबऱ्यांचा रूपबंध अत्यंत रेखीव चकचकीत, घोटीव आणि गोळीबंद आहे. पान सरवा  ही सुद्धा ग्रामीण परिवेश सादर करणारी कादंबरी आहे. काळी माती निळी नाती  या ललित लेखनात वर्‍हाडी प्रांतातील दुर्मिळ ग्रामीण व्यक्तिचित्रणे आली आहेत. या संग्रहातील सर्व व्यक्तिरेखा पुस्तकी न वाटता अगदी चालत्या-बोलत्या जीवंत व्यक्ती वाटतात. माणसा माणसातील संबंध, त्यांचे परस्परावलंबित्व, लैंगिकतेच्या संदर्भातील त्यांचे मूल्यनिष्ठ भाबडेपण आणि सगळ्या गावाला बांधून ठेवणारा सौहार्दतेचा धागा या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून अधोरेखित होतात. भारतीय ग्रामव्यवस्थेचे इतके नेटके, नमुनेदार रूप रेखाटतांना मधुकर वाकोडेंनी वर्‍हाडची काळी माती निवडली आहे; कारण ते या मातीतील आहेत.

लोकप्रतिभा आणि लोकतत्वे  या त्यांच्या समीक्षाग्रंथातील लेखांचा बाज संशोधनपर आहे. भूमी-पर्जन्य-समृद्धी व सर्जनाशी संबंधित विधी-उत्सव या सर्वांनी प्रभावित त्यांच्या जीवनधारणा, सर्व प्रकारच्या कलामूल्य व्यवस्था या सर्वांचे लोकव्यवहारात जसे अतूटपण व थेटपण दिसते त्याच थेटपणाने मधुकर वाकोडे या ग्रंथाद्वारे लोकसंस्कृतीशी भिडतात. लोकधाटीच्या वहिवाटी  या ग्रंथातील लेख लोकवाङ्मयातील प्रथा-परंपरांच्या वहिवाटीचा शोध आणि वेध घेण्याचा प्रयत्न करतात. मातृकाल यातील लामण दिवे  हा लेखसंग्रह म्हणजे अनामिकांच्या विदग्ध पातळीवरील रचनांचा वर्गीकरणानुसारी वेध घेऊन त्यांच्या भावभावना- कल्पनांच्या अनुषंगाने केलेले भाष्य आणि विविध स्तरीय समाजदर्शनाच्या गवाक्षातून घेतलेल्या वास्तवाचा शोध होय. गोंधळी राजा आंधळी प्रजा  या वगनाट्यातून त्यांनी राज्यसंस्था ज्या ढोंगावर, दंभावर उभी आहे तिला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खोटेपणाची कीड लागली आहे हे दर्शविले आहे. या वगनाट्याने त्या दंभाचा स्फोट करण्याचे कार्य पार पाडले.

मधुकर वाकोडे यांची संपादने अतिशय नेटकी आणि नजरेत भरणारी आहेत. मराठी लोककथा, मौखिकता आणि लोकसाहित्य आणि मौखिक परंपरेतील बालगीते  हे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले त्यांचे ग्रंथ होत. मराठी लोककथा  या ग्रंथातील कथांची निवड अत्यंत साक्षेपाने चोखंदळपणे केली आहे त्यातून त्यांची मराठी लोककथेची सूक्ष्म समज आणि प्रगल्भ जाण दिसून येते.

मधुकर वाकोडे यांचे सर्वच लेखन बहुजननिष्ठ असल्याने त्यांनी यासाठी साहित्याचे विचारपीठ नव्या दमाच्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी समविचारी लेखक-कलावंतांच्या सहकार्याने काहीकाळ विदर्भात बहुजन साहित्य परिषद ही वाङ्मयीन चळवळ चालविली आहे. शैक्षणिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन कार्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या समित्यांवर अशासकीय सदस्य या नात्याने विविध समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या दलित ग्रामीण शब्दकोश प्रकल्पात महत्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर अभिजात मराठी भाषा समिती सदस्य (२०१३), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००४), तसेच केंद्रशासन पुरस्कृत विविध प्राधिकरणावरील मधुकर वाकोडे यांचे कार्य दखलपात्र आहे. साहित्य अकादमी (१९९५-२०००), मुंबई दूरदर्शन कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य (२००३), पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर या क्षेत्रातही त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या संपादन कार्यात त्यांनी कार्य केले  आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर संपादक सदस्य, अमरावती विद्यापीठाच्या अनिवार्य मराठी विषयाच्या संपादनात महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे.

मधुकर वाकोडे यांच्या या सर्व कार्याची पावती त्यांना विविध पुरस्कारांनी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार (२००६), महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा ह. ना. आपटे पुरस्कार (१९८८), यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांचा श्रेष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार (१९९९), प्रसाद बन प्रतिष्ठान, नांदेड यांचा जीवन गौरव पुरस्कार (२००५), स्व. माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार (२०१०), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराने (२०१०), संत गाडगेबाबा मिशन यांचा समाज प्रबोधन पुरस्कार आणि पद्मश्री मनिभाई देसाई पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. याशिवाय लोकसाहित्यातील लोकतत्त्वीय संशोधनाबद्दल विदर्भ संशोधन मंडळ, नागपुर तर्फे संशोधन महर्षी ही पदवी (२०१९) त्यांना बहाल करण्यात आली आहे. नागपूर येथे संपन्न झालेल्या ५३ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२००२), अंजनगाव येथे संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा विदर्भ साहित्य संघ आयोजित नवलेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८५-२००७) ही सन्माननीय पदे त्यांनी भूषविली आहेत.

संदर्भ : 

  • तायवाडे, शरयू, डॉ.मधुकर वाकोडे साहित्य दर्शन, नागपूर, २०११.
  • पुंडकर,पंजाब, झेलझपाट आणि सिलिपशेरा : एक आकलन, अमरावती, २०१२.
  • हावरे, राजेंद्र, लोकसाहित्य :चर्चा आणि चिंतन, डॉ. मधुकर वाकोडे गौरव ग्रंथ, अमरावती, २०१५.