बैलाचा खेळ दाखवून, लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील जमात. ही जमात तमीळनाडूमधून महाराष्ट्रात आली. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ढवळा नंदीवाले म्हणतात तर इतर भागात तिरमाळी वा तिरमल म्हणतात. तिरूपती देवस्थानच्या डोंगराला “तिरुमैल” असे नाव आहे. नंदीवाले मूळचे तिकडचे असल्यामुळे त्यांना “तिरमल” हे नाव मिळालेले असावे. त्यांची मातृभाषा तेलगूसदृश्य असून त्यांच्या भाषेत मराठी, हिंदी शब्दांचे मिश्रण आढळते. व्यवहारासाठी ते सांकेतिक भाषेचाही वापर करतात. पाटील नंदीवाले, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले आणि भांडी विकणारे नंदीवाले या चार प्रकारात नंदीवाल्यांचा समाज विभागला आहे. प्राचीन काळी धर्म तारण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने नंदीचे रुप घेतल्याचे दिसून येते. एकनाथांनी एका भारुडात धर्मोद्धारासाठी अवतार धारण करणारा लीलालाघवी परमेश्वरच नंदीच्या रूपात नटविला आहे. नंदी हे शंकराचे वाहन असल्याने आपल्या खळावर साक्षात परमेश्वर शंकर आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होते.

नंदीवाल्यांचा मुख्य व्यवसाय नंदीबैलाचा खेळ करून दाखविणे हा आहे. नवीन खरेदी केलेल्या बैलाला नंदीबैलाचे शिक्षण देणे, नवीन बैलाला त्यांना हवे त्या इशाऱ्यावर, ढोलकीच्या ठेक्यावर नाचायला शिकविणे ह्या बाबी शिखर शिंगणापूर येथील गुरव करतात. शिक्षण देऊन बैल तयार झाला म्हणजे त्याला सजवतात, गळ्यात घंटांची माळ, पायात झांजरे, शिंगाला पितळी शेंब्या व रंगीबेरंगी कपड्याचे लोंबते गोंडे, पाठीवर झूल अथवा पडशी झाकून टाकण्यासाठी रंगीत कपडे आणि कपाळावर गणपतीचा, मारुतीचा किंवा महादेवाचा पितळी टाक अशा प्रकारे सजवलेल्या बैलाला नंदीबैल म्हणतात. हा नंदीबैल घेऊन गावोगाव भटकंती करीत ह्या जमातीचे लोक फिरतात. नंदीवाल्याने अंगात अंगरखा घातलेला असतो. काहींनी त्या अंगरख्यावर कोट घातलेला असतो. कंबरेला एक पंचा शेल्यासारखा गुंडाळलेला असतो. डोक्याला रंगीत फेटा बांधून पाठीवर त्याचा सोगा सोडलेला असतो. गावाच्या चौकात तेथील लोकांना नंदीबैलाचे कला कौशल्य ते दाखवतात. गुबूगुबू असा आवाज करीत ते नंदीबैलाला मन हलवून, उजवा किंवा डावा पाय उचलून होय नाही असे भाकित वर्तवण्यास सांगतात.हवामान, पीकपाणी यासंदर्भात होरा प्रकट करण्याचे कामही नंदीबैलवाले करतात. नंदीबैल पोटावर उभा राहतो, एखादया सुचविलेल्या नावाच्या माणसास ओळखतो. नंदीबैलाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आस्था असते. या आस्थेपोटी ते नंदीवाल्याला दान देतात. नंदीबैलाच्या पोटाखालून लहान मूल गेलं तर त्याचं आयुष्य वाढतं अशी समजूत आहे.

https://youtu.be/d5P2tx5cNag

नंदीबैलवाले भविष्य सांगण्याचा व्यवसायही करतात. नंदीवाल्यांच्या बायका गोधडी शिवतात. कंगवे, फण्या, सुया, बिंब, काळंमणी, लहान मुलासाठी वाळे-मनगट्या व काजळाच्या डब्या विकण्याचा व्यवसाय करतात. लग्न जमवताना हुंडा देणे अथवा घेणे या समाजाला मान्य नाही. सर्व लग्न पावसाळ्यात होतात. पावसाळ्यात वडापुरी येथे नंदीवाल्यांची अनेक कुटुंबे येऊन राहतात. या काळात त्यांची लग्नकार्य होतात. एकदा पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीला कसल्याही सबबीवर सोडून दिले जात नाही. नंदीवाले गुढीपाडवा, नागपंचमी, बेंदूर, शिमगा व दिवाळी हे सण प्रामुख्याने साजरे करतात. हसोबा, नाथबाबा, धावजीबाबा आणि महाकाली ही त्यांची प्रमुख कुलदैवते आहेत. नंदीवाल्यांच्यात जातपंचायतीला महत्वाचे स्थान आहे. भटकंतीच्या काळात माणूस मेल्यानंतर अडचण येते; त्यामुळे तीन दिवसापेक्षा जास्त दिवस एका गावावर नंदीवाल्यांना राहता येत नाही.

संदर्भ :

  • पाटील, पंढरीनाथ, भटके भाईबंद, पुणे, १९९०.

This Post Has One Comment

  1. Ravi

    Nandiwale and Tirmal both are different castes .Tirmal is devotee of balaji and nandiwale devotee of mahadev .

प्रतिक्रिया व्यक्त करा