एक रुपकाश्रयी कथनप्रकार. तो गद्य वा पद्य रुपात असतो. ‘फेबल’ या इंग्रजी संज्ञेचा शब्दकोशातील अर्थ कल्पित वा रचलेली गोष्ट असा होतो. ती बोधपर, नीतिपर असावी, हे अभिप्रेत असते. मूळ लॅटिन शब्द ‘Fabula’ असून त्याचा अर्थ नाट्यपूर्ण कहाणी असा होतो. रुपककथा, पुराणकथा , अद्भुतकथा, प्राणीकथा आणि बोधकथा यांतील भेद काटेकोरपणे सांगता येत नाही. दृष्टांतकथा (पॅरॅबल) हा बोधकथेशी खूपच साधर्म्य असणारा प्रकार आहे. कित्येकदा तर हे दोन्ही प्रकार अभिन्नच मानले जातात. मात्र जरी दृष्टांतकथा ही छोटी बोधप्रद कथा असली, तरी त्यातील संदेश हा बहुधा आध्यात्मिक व पारलौकिक स्वरुपाचा असतो. बायबलमध्ये अशा काही कथा आढळतात. उदा., पॅरॅबल ऑफ लॉस्ट शीप . महानुभाव ग्रंथकार केसोबासकृत (तेरावे शतक) दृष्टांतपाठ ही रचनाही या दृष्टीने उल्लेखनीय आहे. शिवाय दृष्टांतकथेत सामान्यपणे मानवी पात्रे व वास्तववादी दृष्टीकोन दिसून येतो. या उलट बोधकथेमध्ये प्रामुख्याने प्राण्यांचा उपयोग करून बोधतत्त्व सांगितलेले असते. या कथेत माणसे येऊ शकतात ; पण मुख्यत्वे प्राणीच माणसांसारखे गुण दाखवितात. या कथांतून प्राण्यांबरोबर वारे, पाणी, पर्वत यांसारख्या निसर्गशक्तीचेही मानवीकरण केले जाते. नीतित्त्व सांगणाऱ्या रंजक प्राणीकथा असे बोधकथांचे स्थूल स्वरुप आहे. हा बोध धार्मिक अगर आध्यात्मिक प्रकारचा नसून नित्य, लौकिक जीवनाशी संबंधित व व्यवहारोपयोगी असा असतो. कथेत एका प्रसंगातून एक बोधतत्त्व ठसविण्याचा प्रयत्न असतो. बोधकथेचा घाट हा चतुरोक्तिपूर्ण, अत्यंत मितभाषी व आशयघन असतो. व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती यांसारख्या कथाघटकांच्या तपशीलपूर्वक विस्तारास त्यात फारसा वाव नसतो.
अतिप्राचीन काळी या प्रकारच्या कथांचा समावेश साहित्यप्रकारात केला जात नसावा, कारण त्यांची रचना पद्यात केलेली नव्हती. पूर्वीपासून लोकशिक्षणासाठी आणि लोकरंजनासाठी या कथांचा उपयोग होत आला आहे. ग्रीकांच्या काळात बोधकथांचा एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून विकास झाला, असे दिसते. त्याची जडणघडण तत्कालीन समाजातील सुसंस्कृत व चिंतनशील व्यक्तींनी केली असावी, ह्यात शंका नाही. भारतातील विष्णुगुप्त आणि ग्रीसमधील इसाप (इ. स. पू. सहावे शतक) हे प्राचीन काळातील आद्य बोधकथाकार मानले जातात. बोधकथांचा उगम भारतात झाला, असेही एक मत आहे. इ. स. दुसऱ्या वा तिसऱ्या शतकातील संस्कृत पंचतंत्र हा बोधकथांचा आद्य संग्रह मानला जातो. तेथून या कथांचा जगभर प्रसार झाला, असे मानण्यात येते. या अगोदरही प्राणीकथा अस्तित्वात असाव्यात ; मात्र त्यांच्या कर्त्यांची नावे उपलब्ध नाहीत. सर्वांत जुन्या कथा महाभारतात सापडतात. या प्राणीकथा आदर्श मानवी व्यवहाराचे दिग्दर्शन करतात. प्राणीकथांतील पशुपक्षी आपापल्या वर्गांचे संकेत पाळतात कोल्ह्याची, कावळ्याची धूर्तता, माकडाची चौकसबुध्दी इत्यादी. इसापच्या काही कथा भारतीय संभवाच्या वाटतात. या कथांच्या भारतीय उगमाविषयीचा सिद्धांत आज मान्य केला जात नाही. उलट असे मानले जाते, की प्रत्येक संस्कृतीमध्ये प्राणीकथांतून तत्त्वबोध सांगण्याची सहजप्रेरणा वसत असावी. प्राचीन ग्रीक कवी हेसिअडच्या वर्क्स अँड डेजमधील ‘बहिरी ससाणा आणि बुलबुल’ ही उपलब्ध साहित्यातील सर्वांत जुनी बोधकथा असावी (इ. स. पू. सु. आठवे शतक). जुन्या बोधकथांत ‘मधमाशीची कथा’, ‘मुंगी आणि टोळ’ या कथांचाही उल्लेख येतो. इसापच्या कथा इ. स. पू. सहाव्या शतकात मोडतात. फीड्रस (इ. स. पू. सु. १५ – इ. स. सु. ५४) हा प्रख्यात रोमन बोधकथाकार होय. लॅटिन साहित्यात त्याने बोधकथा या प्रकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्या बोधकथांचे ५ खंड असून त्याने मुख्यत्वे इसापच्या बोधकथांना लॅटिन पद्यरुप दिले. बेब्रिअस या ग्रीक बोधकथाकारानेही इसापच्या बोधकथांना पद्यरुप दिले. मध्ययुगात (सु. ११०० ते १४००) रेनर्ड द फॉक्सच्या पशुकथा लोकप्रिय होत्या. इंग्लंडमध्ये पंधराव्या शतकात जॉन लीडगेट याने बोधकथांचा प्रकार समर्थपणे हाताळला. इसापकथांचे पहिले इंग्रजी भाषांतर १७२२ साली प्रसिद्ध झाले. आधुनिक काळात फ्रान्समध्ये या प्रकारच्या कथांचा विकास झाला. सतराव्या शतकातील ला फॉन्तेन याच्या फ्रेंच भाषेतील बोधकथांमध्ये उपरोध आणि नाट्य हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. जर्मन बोधकथाकार लेसिंग याने फॅबेलन (१७५९) ह्या संग्रहाद्वारे या प्रकारातील इसापप्रणीत साधेपणा व प्रत्यक्ष परिणाम यांवर भर दिला. फॉन्तेनच्या बोधकथांतील साहित्यगुणांचे अवाजवी महत्त्व त्यास अमान्य होते. जोएल चांड्लर हॅरिस (१८४८-१९०८) या अमेरिकन कथाकाराच्या, निग्रो गुलामांच्या लोकसाहित्यावर आधारलेल्या व ‘अंकल रेमस’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या कथा (१८८०) या आधुनिक बोधकथाच होत. रड्यर्ड किपलिंग याच्या द जंगल बुक (१८९४) व जस्ट सो स्टोरीज (१९०२) यांचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. अमेरिकन विनोदी कथाकार जेम्स थर्बर (१८९४-१९६१) यानेही फेबल्स फॉर अवर टाइम (१८४०) नामक आधुनिक बोधकथा लिहिल्या. जॉर्ज ऑर्वेलने आपल्या ॲनिमल फार्म (१९४५) या राजकीय उपरोधप्रचुर कादंबरीमध्ये बोधकथेच्या वाङ्मयीन गुणधर्माचा अत्यंत प्रभावी आविष्कार घडवला आहे. वॉल्ट डिझ्नीच्या व्यंगपटांतूनही बोधकथेच्या आशयाला एक आगळेवेगळे चित्ररुप दिल्याचे दिसून येते.
संदर्भ :
- Auchincloss, Louis, Ed. Fables of Wit and Elegance, New York, 1972.
- Gardner, John Dunlap, Lennis, Ed., The Forms of Fiction, New York, 1962.
- Murray, E. T. Selected Fables, 1920.