साबळे, शाहीर : (३ सप्टेंबर १९२३–२० मार्च, २०१५) ). ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे परंतु शाहीर साबळे ह्या नावानेच ते परिचित आहेत. सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माळकरी होते.वारकरी पंथाचे भजन-कीर्तन ते करीत असत. त्यांची आई निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. बालवयात त्यांना बासरीवादनाचाही छंद जडला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र अमळनेरला त्यांना साने गुरुजीं चा सहवास लाभला.गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय -सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले. धुळ्याचे शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे ह्यांचा आदर्श त्यांनी स्वतःसमोर ठेवला होता. पुढे १९४२ साली शाहीर शंकरराव निकम ह्यांच्या प्रभावाखाली ते आले. निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरु झालेल्या राजकारणाचा संदर्भ ह्या पोवाड्याला होता. त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे आधुनिक मानवाची कहाणी (१९५२ पुस्तकरुपाने प्रसिद्घ, १९७७). त्यात त्यांनी साम्यवादाचा विचार मांडला आहे. १९४८ मध्ये भानुमती बारसोडे या सुविद्य युवतीशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. त्या चांगल्या कवयित्री असल्यामुळे त्यांची शाहिरांना उत्तम साथ मिळाली मात्र हा विवाह टिकला नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा, म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्या वेळी शाहिरांनी आपल्या पथकासह ह्या मंदिरप्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करुन अनुकूल वातावरण निर्माण केले. तसेच पसरणीच्या भैरवनाथ मंदिरात साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांचा प्रवेश घडवून आणला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन ह्यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे ह्यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले. ह्या गाण्याने त्यांना अमाप कीर्ती लाभली. महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले तसेच आंधळं दळतंय हे मुक्तनाट्य लिहून रंगभूमीवर आणले. त्यातून शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली. आरंभापासून शाहीर शिवसेनेसोबत होते पण ह्या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून काम करावयास आरंभ केल्यावर शाहीर त्या संघटनेपासून दूर झाले.
आंधळं दळतंय पूर्वी त्यांनी अनेक प्रहसने रंगभूमीवर आणली होती. त्याचप्रमाणे यमराज्यात एक रात्र ह्या मुक्तनाट्याचा बंदिस्त नाट्यगृहात प्रयोग करुन (१६जानेवारी १९६०) व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पहिले पाऊल टाकले. त्यानंतर माकडाला चढली भांग (१९६९, चिं. त्र्यं. खानोलकर), शेतात मोती, हातात माती (१९६९), फुटपायरीचा सम्राट (१९७०, विजय तेंडुलकर ), एक तमाशा सुंदरसा (१९७१, सई परांजपे), कोंडू हवालदार (१९७६, पां. तु. पाटणकर) ह्यांसारखी मुक्तनाट्ये सादर केली. त्यांची एकूण १४ मुक्तनाट्ये असून त्यांतील नऊ त्यांनी, तर पाच इतर लेखकांनी लिहिली आहेत. शाहिरांनी त्यांच्या सर्व मुक्तनाट्यांतून समाजप्रबोधनाला योग्य असे विषय प्रभावीपणे सादर केले.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती. कार्यकमाचे मूळ नाव ‘महाराष्ट्र (स्व) भावदर्शन’ असे होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे नाव नंतर देण्यात आले. देवदत्त, वसुंधरा, यशोधरा आणि चारुशीला ह्या शाहिरांच्या चार मुलांनी ह्या कार्यकमासाठी अपार कष्ट घेतले. देवदत्ताने कार्यकमाचे संगीतदिग्दर्शन केले.चारुशीला साबळे हिने प्रत्येक कलाप्रकारामागच्या परंपरेचा मागोवा घेऊन ह्या कार्यकमात विविधता आणली. कलाविष्कारातील लयबद्घता, नृत्याविष्कार,वेशभूषा, कलावंतांची योजना यांचे नेमके भान ठेवून सादरीकरणात तोचतोपणा येणार नाही ह्याची काळजी घेतली. यशोधरा हिनेही ह्या कार्यकमाच्या निर्मितीत पडद्यामागच्या व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा उचलला होता.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा ), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.
प्रेक्षकांच्या सोयीसाठी आणि प्रयोगकर्त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शाहिरांनी फिरत्या नाट्यगृहाची (मोबाइल थिएटर) संकल्पना साकार केली. प्रसिद्घ नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर ह्यांनी तांत्रिकदृष्ट्या लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य त्यांना दिले. फिरता रंगमंच वाहून नेणारे वाहन कोल्हापूरचे यंत्रमहर्षी म्हादबा मेस्त्री यांनी बांधून दिले. विस्तृत रंगमंच १,५०० ते २,५०० खुर्च्या टाकण्याची सोय रंगमंचाच्या भोवती कनाती लावून तयार होणारे प्रेक्षागृह इ. ह्या फिरत्या नाट्यगृहात होते. ही सर्व व्यवस्था घडीची (फोल्डिंग) होती. हा उपकम उत्तम असला, तरी अनेक कारणांमुळे तो पुढे बंद करावा लागला.
वृद्घ व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली (१९८९). ह्या प्रतिष्ठानासाठी त्यांनी पसरणीजवळची वडिलापार्जित ८ एकर जमीन दिली. ह्यातूनच पुढे वृद्घ, निराधार कलावंतांसाठी ‘तपस्याश्रमा’ची कल्पना फलद्रूप झाली.
शाहिरांचे कुटुंब हे कलावंतांचे कुटुंब आहे. उदा., देवदत्त (प्रसिद्घ गीतकार-संगीतकार ), चारुशीला साबळे-वाच्छानी ( उत्कृष्ट नर्तिका आणि चित्रपट-रंगभूमीवरील अभिनेत्री) तसेच त्यांचा नातू केदार शिंदे (रंगभूमी व दूरदर्शनवरचे ख्यातनाम लेखक-दिग्दर्शक).
शाहिरांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार (१९८४), शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी (१९८८), अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९९०), अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपद (१९९०), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), संत नामदेव पुरस्कार (१९९४), साताराभूषण पुरस्कार (१९९७), शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार (१९९७), महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार (१९९७), महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार (२००१), कविश्रेष्ठ पी. सावळाराम पुरस्कार (२००२), शाहीर फरांदे पुरस्कार (२००२), महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र–भूषण पुरस्कार (२००५), महाराष्ट्ररत्न पुरस्कार (२००६), लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार (२०१२) इ. प्रमुख होत. भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविण्यात आले (१९९८).
भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी रशियाचा दौरा केला (१९८२), तसेच जागतिक मराठी परिषदेसाठी अन्य कलाकारांसह मॉरिशसचा दौरा केला (१९९१). माझा पवाडा (२००७) हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
वृद्धापकाळाने मुंबईत त्यांचे निधन झाले.