ब्लॅक होल स्मारक, कोलकाता.

कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली. १७५६ मधील एका घटनेमुळे ती अंधारकोठडी म्हणून इतिहासात महत्त्व पावली.

सिराजउद्दोला बंगालचा नबाब असताना बंगालचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने नबाबाच्या शत्रूंना आश्रय दिला. इंग्रजांनी नबाबाची परवानगी न घेता कलकत्त्यात तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले. नबाबाने हरकत घेऊनही ड्रेकने बांधकाम थांबविले नाही. त्या वेळी नबाबाने फोर्ट विल्यमवर हल्ला करून इंग्रजांकडून किल्ला घेतला. गव्हर्नर ड्रेक बायकामुलांसह पळाला. सिराजउद्दोला याने सेनाधिकारी हालविले व आणखी १४५ इंग्रजांना किल्ल्याच्या पूर्व दरवाज्याच्या दक्षिणेस तीस मी. अंतरावर असलेल्या ५·५ × ४·२५ × ३ घ.मी. च्या खोलीत डांबले. खोली कोंदट होती व तीत हवा येण्यास दोनच लहान झरोके होते. अशा ह्या कोठडीत १४५ माणसे दहा तास होती. त्यांपैकी १२३ गुदमरून मृत्यूमुखी पडली.

काही इतिहासकार अंधारकोठडीची कथा कपोलकल्पित समजतात, तर काहींच्या मते ती मुळात सत्यच आहे; फक्त अतिरंजित करून वर्णिली गेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content