अशोककुमार : (१३ ऑक्टोबर १९११ – १० डिसेंबर २००१). हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते व निर्माते. त्यांचे मूळ नाव कुमुदलाल (कुमुदकुमार) कुंजलाल गांगुली. चित्रपटसृष्टीत त्यांना आदराने दादामुनी (दादामोनी) म्हणत असत. त्यांचा जन्म बिहार राज्यातील भागलपूर येथे एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील कुंजलाल हे व्यवसायाने वकील होते. तर आई गौरीदेवी या सधन कुटुंबातील होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व अभिनेते किशोरकुमार व अभिनेते अनूपकुमार हे अशोककुमार यांचे लहान बंधू. त्यांच्या बहिणीचे नाव सतीदेवी. वडिलांच्या वकिली व्यवसायामुळे गांगुली कुटुंब खांडवा (मध्य प्रदेश) येथे स्थायिक झाले. तेथेच अशोककुमार यांचे प्राथमिक शिक्षण झाले. कलकत्त्याच्या (आताचे कोलकाता) प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.

अशोककुमार यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करण्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते. अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री शशधर मुखर्जी यांच्याशी झाली. नंतर मैत्री नात्यात बदलली. अशोककुमार यांच्या बहिणीचा विवाह शशधर मुखर्जी यांच्याशी झाला. १९३४ च्या सुमारास न्यू थिएटरमध्ये  प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करीत असतानाच निर्माते शशधर मुखर्जी यांनी अशोककुमार यांना बाँबे टॉकीज या चित्रपट निर्मिती संस्थेत बोलावून घेतले. तेथे सहायक तंत्रज्ञ म्हणून काम करत असताना बाँबे टॉकीजचे मालक हिमांशू रॉय यांनी अशोककुमार यांना जीवन नैय्या  या चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला (१९३६). हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटामध्ये त्यांनी त्यावेळच्या पद्धतीनुसार अभिनयासोबतच गाणेही गायले होते. १९३६ ला बाँबे टॉकीजचीच निर्मिती असलेल्या अछूत कन्या या चित्रपटात त्यांनी ब्राह्मण युवकाची भूमिका केली. या युवकाचे एका अस्पृश्य मुलीवर प्रेम जडते. सामाजिक आशय असलेला हा चित्रपट रसिकांना चांगलाच भावला आणि अशोककुमार यांना अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली. त्यानंतर अशोककुमार यांनी बाँबे टॉकीजच्या इज्जत (१९३७), सावित्री  (१९३८), निर्मला (१९३८) अशा अनेक चित्रपटांत अभिनेत्री देविका राणी यांच्यासोबत काम केले. हे चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री लीला चिटणीस यांच्यासोबत कंगन (१९३९), बंधन (१९४०)आणि झूला (१९४१) या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी केलेल्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली. यामुळे ते चित्रपटसृष्टीत स्थिरावले.

बाँबे टॉकीज निर्मित किस्मत (१९४३) या चित्रपटातून अशोककुमार यांनी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यात त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अभिनेत्याची (अँटी हीरोची) भूमिका पहिल्यांदाच साकारत रसिकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. त्यात ते यशस्वीही ठरले. त्यावेळी किस्मतने उत्पन्नाचे सर्व विक्रम तोडले. हा चित्रपट कलकत्त्याच्या चित्रा सिनेमागृहात सुमारे तीन वर्षे चालला. हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर १९४३ साली अशोककुमार बाँबे टॉकीज सोडून फिल्मिस्तान स्टुडिओत दाखल झाले. पण पुन्हा १९४७ साली बाँबे टॉकीजमध्ये निर्मिती प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मशाल, जिद्दी, मजबूर  यांसह बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली. यातील एक चित्रपट महल  खूपच लोकप्रिय झाला (१९४९). या चित्रपटाने अभिनेत्री मधुबाला तसेच पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनाही खूप प्रसिद्धी मिळाली.

१९५०च्या दशकात बाँबे टॉकीज सोडल्यानंतर अशोककुमार यांनी स्वत:ची ‘अशोककुमार प्रॉडक्शन’ ही निर्मितिसंस्था स्थापन केली. तसेच प्रसिद्ध ‘ज्यूपिटर’ चित्रपटगृहही विकत घेतले. या संस्थेची निर्मिती असलेला पहिला चित्रपट समाज  होय. त्यानंतर त्यांनी परिणीता या चित्रपटाची निर्मिती केली (१९५३). मात्र सलग तीन वर्षे चित्रपट निर्मितीत तोटा झाल्यामुळे त्यांनी आपली निर्मितीसंस्था बंद केली. परिणीता चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी काही काळ रॉय यांच्यासोबत काम करणे थांबवले. मात्र, अभिनेत्री नूतन यांच्या मध्यस्थीनंतर अशोककुमार यांनी पुन्हा रॉय यांच्यासोबत बंदिनी या चित्रपटात काम केले (१९६३). हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका अशोककुमार यांनी साकारली आहे. एका सामान्य स्त्रीच्या असामान्य धैर्याची ही कहाणी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. १९६७ साली प्रदर्शित ज्वेलथीफ या चित्रपटात अशोककुमार यांनी पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारली. भूमिका आणि अभिनयात तोचतोपणा येऊ नये याची दक्षता अशोककुमार यांनी घेतली. म्हणूनच चरित्र अभिनेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका स्वीकारणे सुरू केले. १९६८ साली प्रदर्शित झालेला आशीर्वाद  हे त्याचे उदाहरण. तत्त्वनिष्ठ पण मुलीच्या प्रेमापोटी अनेक संकटे सोसणारा मायाळू वडील-जोगी ठाकूर ही भूमिका अशोककुमार यांनी यात साकारली आहे. या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील त्यांनीच गायलेले ‘रेल गाडी, रेल गाडी’ हे गीत लहान मुलांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचे दोन लहान भाऊ किशोरकुमार व अनूपकुमार यांच्यासोबत त्यांनी केलेला विनोदी धाटणीचा चलती का नाम गाडी  हा चित्रपटही खूप लोकप्रिय झाला (१९५८).

दूरदर्शनच्या इतिहासातील पहिली मालिका हमलोगमध्ये (१९८४) अशोककुमार यांनी सूत्रधाराची भूमिका केली. मालिकेच्या शेवटी त्यांनी विशिष्ट आवाजात केलेली टिप्पणी खास असे. दूरदर्शनसाठीच त्यांनी भीमभवानी, उजाले की ओर आणि शेवटचा मोगल बादशाह याच्यावर आधारित मालिका बहादूर शाह जफर यांमधून अभिनय केला.

संयतपणा आणि परिपक्वता हे त्यांच्या अभिनयाचे विशेष गुण. जातीयतेमुळे प्रेमात येणारे अडथळे, त्यामुळे होणारी तगमग याचा अभिनय त्यांनी अछूत कन्यामध्ये लीलया साकारला. त्यांच्या अभिनयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संवादफेक. दृश्याचा विशिष्ट परिणाम साधण्यासाठी त्यांचे संवादकौशल्य परिणामकारक ठरायचे.

अशोककुमार यांचा विवाह शोभा देवी यांच्याशी झाला. त्यांना भारती गांगुली-जाफरी, रूपा गांगुली-शर्मा, अरूपकुमार व प्रीती गांगुली ही चार मुले. त्यांच्या तीनही मुलींनी अनेक चित्रपटांमधून कामे केलेली आहेत.

अशोककुमार यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांतील काही पुढीलप्रमाणे – संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९५९), राखी (१९६२) व आशीर्वाद (१९६९) या दोन चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ अभिनेता या वर्गवारीतील फिल्मफेअर पुरस्कार, अफसाना या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्यासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार (१९६७), आशीर्वाद या चित्रपटाकरिता सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (१९६९). भारत सरकारने कलाक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला(१९८८). तसेच त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९९).

तब्बल सहा दशके आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे ‘दादामुनी’ यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी ह्रदयविकाराने मुंबई येथे निधन झाले. ते चित्रकारही होते. तसेच अनेक भाषांचा त्यांचा अभ्यास होता. हिंदीसहित काही बंगाली व मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. त्यांना होमिओपॅथी या वैद्यक शाखेतही रस होता. त्यांनी अनेक चित्रपटात गाणी गायिली आणि ती रसिकांच्या पसंतीसही उतरली. १९९७ साली प्रदर्शित झालेला आँखो में तुम हो हा त्यांचा शेवटचा चित्रपट होय.

https://www.youtube.com/watch?v=j4GuxhxgJE4

समीक्षक – संतोष पाठारे

#किशोरकुमार #हिंदी चित्रपटसृष्टी

प्रतिक्रिया व्यक्त करा