अख्तर, जावेद : (१७ जानेवारी १९४५). भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कथा-पटकथाकार, गीतकार आणि कवी. हिंदी चित्रपटसृष्टीत सत्तरऐंशीच्या दशकात जावेद अख्तर यांनी सलीम खान यांच्यासोबत लिहिलेल्या यशस्वी कथा-पटकथांमुळे सलीम-जावेद ही जोडी जनमानसात प्रसिद्ध झाली. जावेद अख्तर यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे वडील जान निसार खान हेदेखील हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार आणि कवी होते. जावेद यांचे शालेय शिक्षण लखनौ येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण भोपाळमधील सोफिया कॉलेजमध्ये झाले.

जावेद अख्तर यांनी सुरुवातीच्या काळात कैफी आझमी यांचे साहाय्यक म्हणून काम पाहिले. तसेच याकाळात एका चित्रपटाकरिता संवादही लिहिले; पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. सरहदी लुटेरा या चित्रपटाच्या कामावेळी त्यांची सलीम खान यांच्याशी भेट झाली. सलीम-जावेद या जोडीने अधिकार (१९७१) आणि अंदाज या चित्रपटासाठी प्रथमतः एकत्र कथा-पटकथा संवाद लिहिले. सलीम खान हे कथा लिहीत असत आणि जावेद अख्तर त्यांना संवादलेखनात मदत करीत असत.

अंदाज आणि अधिकार या चित्रपटानंतर सलीम-जावेद यांनी सीता और गीता (१९७२), यादों की बारात (१९७३), जंजीर (१९७३), हाथ की सफाई (१९७४), दीवार (१९७५), शोले (१९७५), चाचा भतिजा (१९७७), डॉन (१९७८), त्रिशूळ (१९७८), दोस्ताना (१९८०), क्रांती (१९८१), जमाना (१९८५), मिस्टर इंडिया (१९८७) या आणि अशा एकूण २२ हिंदी आणि दोन कन्नड चित्रपटांच्या कथा-पटकथा आणि संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेल्या चोवीस चित्रपटांपैकी आखरी दाँव, इमान धरम, काला पत्थर आणि शान हे चार चित्रपट सोडल्यास बाकीच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर उत्तम यश संपादन केले.

जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीमुळे ‘सिने पटकथाकार’ या भूमिकेला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. चित्रपटाच्या जाहिरात पृष्ठावर कथा-पटकथालेखक तसेच संवादलेखक यांचे नाव यायलाच हवे असा त्यांचा आग्रह असे. १९८२ नंतर मात्र सलीम-जावेद जोडीत बेबनाव होऊन ते वेगवेगळे झाले. यानंतर जावेद अख्तर कथा-पटकथालेखक आणि त्याचबरोबर गीतकार म्हणूनही स्वतंत्रपणे उदयास आले. त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या चित्रपटांत बेताब (१९८३), मशाल (१९८४), सागर (१९८५), अर्जुन (१९८५), मेरी जंग (१९८५), डकैत (१९८७), लक्ष्य (२००४) आणि डॉन – द चेस बिगिन्स अगेन (२००६) हे चित्रपट उल्लेखनीय समजले जातात. त्यांनी ८० हून अधिक चित्रपटांकरिता गाणी, कथा-पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

गीतकार म्हणून जावेद अख्तर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जनसामान्यांसाठी सहज, सोपी आणि उडत्या चालींची गाणी तर त्यांनी लिहिली आहेतच; पण त्याचबरोबर अत्यंत तरल आणि अर्थगर्भ गीतेही लिहिली आहेत. ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘संदेसे आते है’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘पंछी, नदियाँ, पवन के झोंके’ या आणि अशा अनेक गीतांमधून त्यांनी मानवी मनातील भावभावनांचा कोलाज उभा केला आहे. साज (मेलडी, १९९७), बॉर्डर (१९९७), गॉडमदर (१९९९), रेफ्युजी (२०००) आणि लगान (२००१) या चित्रपटांतील माणसाच्या जगण्याचा तळ शोधणाऱ्या गीतांसाठी जावेद यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच तरकश आणि लावा हे त्यांचे कवितासंग्रह देखील रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यातील लावा या कवितासंग्रहास उर्दू भाषेतील ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी आहे. हनी इराणी याही पटकथा लेखिका आहेत. या दोघांना फरहान आणि झोया ही दोन मुले झाली. फरहान अख्तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता आहे. तर झोया अख्तर याही यशस्वी चित्रपटनिर्माती व दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. जावेद अख्तर यांनी हनी इराणींपासून विभक्त झाल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी विवाह केला. जावेद यांनी फरहान यांच्याबरोबर दिल चाहता है, लक्ष्य, रॉक ऑन आणि मुलगी झोया बरोबर जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटांवर काम केले आहे.

जावेद अख्तर यांना भारत सरकारने चित्रपटातील उत्कृष्ट कारकीर्दीसाठी १९९९ साली ‘पद्मश्री’ आणि नंतर २००७ साली ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच जावेद अख्तर यांनी त्यांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट गीत, संवाद आणि कथेसाठी अनेक फिल्मफेअर पुरस्कारही मिळवले आहेत.

बुद्धिवादाला सदैव साक्षी ठेवणाऱ्या आणि पारंपरिक, श्रद्धाळू विचारसरणीला धिक्कारणाऱ्या जावेद अख्तर यांनी आपल्या जाहीर वक्तव्यांतून आणि साहित्यकृतींतून धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या लोकशाही मूल्यांचा निर्भिडपणे पुरस्कार केला आहे. २०२० साली ‘रिचर्ड डॉकीन्स’ पुरस्काराने त्यांच्या या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. कलात्मकतेला जोपासत व्यावसायिकता सांभाळणाऱ्या आणि भारतीय समाजातील विविधतेवर  प्रेम करणाऱ्या या मनस्वी कलावंताला भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान आहे.

समीक्षक : संतोष पाठारे