एक लोकोत्सव. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने ह्या लोकत्सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअवरून शिग्मा हा शब्द आला आणि वर्णविपर्यासाने त्याला शिमगा हे नाव पडले. ते महाराष्ट्रात रूढ आहे. याशिवाय ह्या उत्सवाला हुताशनी महोत्सव आणि दोलायात्रा, कामदहन अशीही नावे आहेत.
शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा महिना जो फाल्गुन त्यात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव करावा, असे म्हटले जाते. फाल्गुन शुक्ल नवमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, असे ऋग्वेदी ह्यांनी त्यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ह्या ग्रंथात नमूद केले आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो, अशी ह्या सणाची एक उत्पत्ती दिली जाते. काहींच्या मते होलाका, ढूंढा, पूतना ह्यांसारख्या लहान मुलांना घातक ठरणाऱ्या राक्षशिणींशी ह्या उत्सवाचा संबंध आहे. कृष्णाचा वध करायला आलेल्या पूतनेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. होळी ही एका मुद्दाम खणलेल्या खड्ड्यात गवत, लाकूड, गोवऱ्या पेटवून केली जाते. पूतनेला स्वतः कृष्णाने ठार मारले तथापि होलाका, ढूंढा ह्या राक्षशिणींचे दहन केल्याच्या पुराणोक्त कथा आहेत. मदनाचे शिवाने दहन केल्याच्या कथेशीही होळीच्या उत्सवाचा संबंध जोडण्यात येतो.
होळीच्या संदर्भातला धार्मिक विधी असा : होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रत कर्त्याने शुचिर्भूत होऊन ‘ढूंढा राक्षशिणीच्या पिडेचा परिहार व्हावा, म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो’, असा संकल्प प्रकट करावा. नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा ठोकाव्यात.
ह्या सणाच्या संदर्भात भविष्यपुराणात ढूंढा राक्षशिणीची कथा आलेली आहे. ती अशी : ही राक्षशिण गावात शिरून मुलांना त्रास देत होती. गावकऱ्यांनी तिला घाणेरड्या शिव्या देऊन मोठा अग्नी पेटवला आणि तिला पळवून लावले. होळीच्या उत्सवात बोंबा मारून अश्लील शब्द उच्चारतात, ह्याचे मूळ ह्या कथेत सापडते.
माघी पौर्णिमा, म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी एरंडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या, पेंढा इ. जमा करावयास आरंभ होतो. हे सर्व जळाऊ साहित्य चोरून आणायचे असते. होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धूळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो.
वेगवेगळ्या राज्यांत होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला उत्सव सुरू होतो. त्याला दोलायात्रा म्हणतात. घरचा यजमान त्या दिवशी उपास करतो. सकाळी कृष्णाची आणि सायंकाळी अग्नीची पूजा तो करतो. नंतर उत्सवासाठी आलेल्या लोकांवर फल्गू (गुलाल) उधळतात. घराबाहेर एक गवताची मनुष्याकृती तयार केलेली असते. ती जाळतात.
ओडिशात कृष्णमूर्ती पालखीतून मिरवीत नेतात. घराघरातले लोक बाहेर येऊन कृष्णमूर्तीला अत्तर लावतात आणि गुलाल उधळतात. महाराष्ट्रात सामान्यतः फाल्गुनी पौर्णिमेला होळी पेटवली जाते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य करतात. दुसऱ्या दिवशी होळीवर तापवलेल्या पाण्याने स्नान केले जाते.
गोव्यात होळीच्या उत्सवात बीभत्सपणा फारसा नसतो. लोक नाचतात, गातात. होळीसाठी एक १५–२० हात उंचीचा वृक्ष पाडून ठेवलेला असतो. होळीच्या रात्री ढोलकी वाजवीत लोक वृक्षाकडे जातात. त्याची पूजा करून त्याच्या फांद्या तोडतात. मग तो सोट खांद्यावर घेऊन देवळाकडे जातात. तेथे होळीसाठी खड्डा खणून ठेवलेला असतो. त्यात तो सोट उभा करून आंब्याच्या पालवीने सजवितात. त्याच्या डोक्यावर एक असोला नारळ ठेवतात. होळीला हळदकुंकू वाहतात. नारळ फोडतात. ह्या वेळीमात्र बोंबा मारून अश्लील शब्द बोलतात.