पॅरान्थ्रोपस रोबस्टस ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. या प्रजातीचा शोध प्रिटोरियाच्या ट्रान्सवाल संग्रहालयात संशोधन करणारे पुरामानवशास्त्रज्ञ रॅाबर्ट ब्रूम (१८६६-१९५१) यांनी लावला.
स्टर्कफोन्तेन येथील गुहेत ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्मांचा शोध घेत असताना १९३८ मध्ये त्यांना मोठ्या आकाराचा एक जबडा क्रोमड्राय गुहेत (Kromdraai) मिळाला. त्यांनी त्याचे पॅरान्थ्रोपस रोबस्टस असे नामकरण केले. यांची उत्क्रांती मानवी उत्क्रांतीला समांतर असावी, असे लक्षात आल्याने त्यांनी पॅरान्थ्रोपस हे नाव दिले. या प्रजातीचे अनेक जीवाश्म फक्त दक्षिण आफ्रिकेत क्रोमड्राय, स्वार्टक्रान्स आणि ड्रायमोलेन या स्थळांवर मिळाले आहेत. पॅरान्थ्रोपस हे मानवसदृश प्राणी सुमारे १८ लक्ष ते १२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते.
रॅाबर्ट ब्रूम यांनी अभ्यास केलेला टीएम-१५१७ जीवाश्म हा या प्रजातीचा अधिकृत नमुना आहे. या प्राण्याचे वजन ३० ते ४० किग्रॅ. असून मेंदूचे आकारमान ५३० घ. सेंमी. होते. एसके-२३, एसके-४६, एसके-४८ आणि एसके-५० हे पॅरान्थ्रोपस रोबस्टसचे स्वार्टक्रान्स येथे मिळालेले इतर महत्त्वाचे जीवाश्म आहेत. हे प्राणी कठीण आवरण असलेले आणि भरपूर वेळ चघळणे गरजेचे असणारे वनस्पतिजन्य अन्न खात असावेत, हे या प्रजातीच्या दातांचा आकार, दातांच्या लुकनची (इनॅमल) जाडी आणि जबड्यांची रचना यांवरून स्पष्ट होते. त्यांच्या आहारात मांस असले तरी ते कमी प्रमाणात होते. पॅरान्थ्रोपस रोबस्टस हे नियमितपणे दोन पायांवर चालत होते आणि त्यांचा झाडांमधला वावर कमी होता.
संदर्भ :
- Broom, R., ‘The Pleistocene anthropoid apes of South Africaʼ, Nature : 142, pp. 377-379, 1938.
- White, T. D. Ed., Hartwig, W. C. ‘Earliest hominids, in The primate fossil recordʼ, pp. 407-417, Cambridge, 2002.
समीक्षक – शौनक कुलकर्णी