अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. त्यांचे आडनाव घोलप. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने यांचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. त्यांची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ हा त्यांचा  उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून ते कीर्तन करू लागले, अशी आख्यायिका आहे. त्यांनी श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची यांच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या यांच्या काही लावण्या आहेत. त्यांचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा