तावरे, चिंतामणी अंबादास : (२२ जून १९४६). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर. मराठवाडा विभागातील औरंगाबाद येथील रहिवासी ते होत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज शाहीरांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या तावरे यांच्या शाहिरीची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत झाली. शाहिरी कलेचे नैपुण्य आल्यावर त्यांनी अनेक समकालीन शाहिरांना परंपरा पुढे चालविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचा जन्म औरंगाबादमधील नायगव्हाण या गावी झाला. त्यांचे वडील काशिनाथ तावरे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यक्रमात तबला वादनाचे काम करायचे, यामुळेच वडिलांच्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मार्गदर्शनाने त्यांना आणि त्यांच्या भावंडांना या कलापरंपरेची देणगी मिळाली. परिस्थितीमुळे ३ री मध्येच शिक्षण सोडून दिले असताना वडिलांसोबत गायन-वादन कार्यक्रम सुरु होते. त्यावेळी हा बालशाहीर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचना, भजन, पोवाडे गायला शिकला आणि कार्यक्रम सादर करू लागला. या मेहनती मुलाचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला अध्यात्मिक कथाकार महादेव स्वामी पुराणिक यांनी दिला आणि आर्थिक अडचण लक्षात घेऊन रामायणाच्या सप्ताहातून जमा झालेली ६२४ रूपयांची रक्कम देणगी म्हणून त्यांनी शाहीर अंबादास तावरे व त्यांच्या बंधूंच्या शिक्षणासाठी दिली. तेंव्हापासून अंबादासजींचे शिक्षण आणि शाहिरीचा प्रवास सुरू झाला. शिक्षणाबरोबर त्यांनी आपली शाहिरी कला जोपासली, अंगीकारली आणि स्वतःच्या भावांना देखील शिकवली.
शिक्षणासाठी औरंगाबादेत आल्यावर दिवसा शाळा आणि रात्री गायन-वादनाचे कार्यक्रम करत असताना शहरातील ‘शाहीर शेळके’ कलापथकात त्यांनी हार्मोनियम वादकाचे काम केले आणि नंतर त्यांनी त्यांचे बंधू शाहीर देविदास तावरे, शाहीर भानुदास तावरे, आतेभाऊ शाहीर मनोहर हरणे आणि शाहीर गणपत पंडीत या सर्वांना एकत्र करून १६ नोव्हेंबर १९६४ ला स्वतःचा शाहिरी संच उभा केला. या संचाद्वारे स्वतंत्रपणे कार्यक्रम घेऊन सादरीकरण करणे सुरु झाले. पळशी गावात त्यांचा पहिला शाहिरी कार्यक्रम झाला आणि नंतर त्यांचे सातत्याने महाराष्ट्रभर शाहिरी कार्यक्रम सादर होत राहिले. याच दरम्यान त्या काळातील दिग्गज ज्येष्ठ-श्रेष्ठ शाहीरांचा त्यांना सहवास लाभल्यामुळे अंबादासजींची शाहिरी कलेतील प्रगती वाढली व पुढे त्यांची शाहिरी कला बहरतच गेली. त्यांची ही कला व शिक्षण पाहून त्यांना त्याकाळी कामगार कल्याण मंडळात केंद्र संचालक म्हणून नोकरी मिळाली. या माध्यमातून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार केला. नव्या कलाकारांना जोडून त्यांना शाहिरी व लोककलेचे कार्यक्रम दिले .
केंद्र संचालक पदावरून अंबादासजी जिल्हा दारूबंदी प्रचार अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी राज्यभरातील किर्तनकार, प्रवचनकार, वासुदेव, शाहीर, गोंधळी, भारूडकार यांचा शोध घेतला. संपर्क वाढवून त्यांना आपल्या शासनाच्या दारूबंदी विभागाचे कार्यक्रम दिले. यातून १९८९ मध्ये राज्यातील जालना जिल्हा साक्षरता अभियानासाठी निवडला गेला. यात त्यांनी सर्व नव्या लोककलावंतांना कामाला लावून, शासनाचे विविध कार्यक्रम लोककलावंतांच्या माध्यमातून गावागावात जनमाणसांसमोर सादर केले. यामध्ये रत्नाकर कुलकर्णी, सुरेश जाधव, आप्पासाहेब उगले, मीरा उमप, सुरडकर, मनोहर हरणे, ढोलकी वादक लक्ष्मण गवळी व भिक्कन गवळी इत्यादी शाहीर – कलाकारांचा समावेश होता. यातीलच कलाकारांना सोबत घेऊन आधुनिक युगाची सांगड घालत विविध कलाप्रकारांचा समावेश असलेल्या अक्षरधारा, अक्षरांची किमया आणि शाहिरी फुलोरा या ध्वनिफीत (ऑडिओ कॅसेट) त्यांनी प्रकाशित केल्या. याच कॅसेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सोपे झाले व त्यांची शाहिरी सर्वदूर पोहोचली .
पुढे ते महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी देखील विराजमान होऊन महाराष्ट्रभर शाहिरीचे कार्य करीत राहिले. नंतरच्या काही काळातच त्यांची शासनाच्या व्यसनमुक्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी पुण्यात पदोन्नती झाली. या काळात त्यांनी राज्यस्तरीय शाहीर आणि लोककलावंतांची एक मोट बांधली आणि १९९५ ते २००० दरम्यान व्यसनमुक्ती पहाट अभियान हे कार्यक्रम राबविले. यासाठी राज्यस्तरावरील एक आदर्श कलापथक असावे म्हणून राज्यातील दर्जेदार कलाकारांचा शोध घेतला. तरूण कलाकारांना सोबत घेऊन ‘लोकरंगमंच’ नावाने दर्जेदार लोककलावंतांचा संच स्थापन केला. त्याद्वारे राज्यभरातील लोक कलावंतांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. शाहीर शिबिरात तांत्रिक उणिवा, वाद्यांची सांगड, पोवाड्याच्या आवाजाचा पोत, कोरस, प्रभावी सादरीकरण कसे करावे या बाबींचे त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मराठवाडा आणि परिसरातून अनेक शाहिरांना त्यांनी एकत्र केले आणि ‘लोकरंग’ मंचाच्या माध्यमातून राज्यभरात शंभर कार्यक्रम सादर झाले. पुढे महाराष्ट्रातील तळागाळातील सर्व लोककलावंतांना एकत्रित करून पुण्यात १९९६ साली राज्यस्तरीय लोककला महोत्सव घेतला. विशेष म्हणजे वृद्ध लोककलावंतांचा आर्थिक प्रश्न सुटावा म्हणून त्याकाळी महाराष्ट्रातील शंभरच्या वर वृद्ध लोककलावंतांना वृद्ध कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
शाहीर अंबादास तावरे यांना शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. तावरे यांचे शाहिरी कलेवरील प्रेम, निष्ठा बघून आत्माराम पाटील यांनी त्यांना शाहीर चिंतामणी ही पदवी दिली. २०१० मध्ये ‘शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाची’ स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून शाहिरीतील नवे कलाकार घडावे या उद्देशाने शाहिरी प्रशिक्षण शिबीर, महिलांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबीर, ढोलकी प्रशिक्षण शिबीर, राज्यस्तरीय शाहिरी गायन स्पर्धा, शाहिरी पोवाडे व कवणे लेखन स्पर्धा, लोककला कार्यशाळा, लोककलावंत मेळावे, लोकशाहीर आपल्या भेटीला… हे मालीका पर्व आणि शाहिरीत पदार्पण करणाऱ्या बालशाहीरांना ‘शाहीरमहर्षी आत्माराम पाटील’ यांच्या नावाचा बालशाहीर पुरस्कार प्रदान करून नवकलाकारांना चेतना व प्रोत्साहित करण्याचे बहुमोल कार्य स्वखर्चातून ते आजतागायत करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने त्यांना २०१२-२०१३-२०१४ अशा सलग तीन वर्ष औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर येथे शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे संचालक पद मिळाले. हे शाहिरी शिबीरे घेऊन त्यांनी नवे शाहीर आणि नवशाहीरांचा फड महाराष्ट्रात उभा केला. शाहीर अंबादास तावरे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिकवणीमुळे शाहिरी मंचाच्या व शासनाच्या शिबीरांच्या माध्यमातून शाहिरीतील तिसरी पिढी पुढे आली. या पिढीतील युवाशाहीरांचा त्यांच्या शाहिरीमुळे आज महाराष्ट्रासोबतच समस्त भारतवर्षात नावलौकिक झळकताना दिसत आहेत.
शाहिरी साहित्यामध्ये योगदान देत त्यांनीआत्माराम पाटील यांच्या पोवाड्यांचे इंदीरायण, स्वरचित ०४ पोवाडे व ११ गीतांचे लोकरंग, मराठवाड्यातील ५० शाहिरांच्या परिचयाचे मराठवाड्याची शाहिरी, राज्यस्तरीय शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धेतील निवडक पोवाडे व गीतांचे शाहिरी ललकार, प्रभाकर ओव्हाळ यांचे आद्यशाहीर अज्ञानदास आणि धरतीनंदन शाहीरमहर्षी आत्माराम पाटील इत्यादी शाहिरी पुस्तकांचे प्रकाशन केले.
शाहिरीचे आणि लोककलेचे अलौकिक कार्य करत असल्यामुळे शाहीर अंबादास तावरे यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानाने गौरविण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, आत्मवेध पुरस्कार, कै.शाहीर तिलक किसनराव हिंगे स्मृती गौरव पुरस्कार, तपस्वी शाहीर पुरस्कार, शाहीर महाराष्ट्राचा पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दिला गेलेला मराठी भाषा गौरव पुरस्कार, शाहीरसम्राट बापूराव विभूते स्मृती गौरव पुरस्कार, आणि यासोबतच अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेतर्फे दिला जाणारा लोकशाहीर आत्माराम पाटील स्मृती गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे.
चीन आक्रमण, पाकिस्तान आक्रमण आणि बांगलादेश मुक्ती संग्राम अश्या घटनांनी भयभीत झालेल्या काळात अंबादासजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत संपूर्ण जनसमुदायासाठी, शाहीर अमरशेख यांच्या ‘बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला…’ या रचनेद्वारे सकारात्मक आवाहन केले होते.
आपल्या दमदार आणि पहाडी आवाजाच्या माध्यमातून आजतागायत शाहीर अंबादासजींनी केंद्र शासनाच्या गीत व नाटक प्रभागाद्वारे संपूर्ण भारतात तर राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात विविध ज्वलंत आणि सामाजिक विषयांवर जनजागृती व लोकप्रबोधन करत सुमारे २५०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणी या प्रसारमाध्यमाद्वारे लोककला या सत्रात सुमारे शंभर कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे.
सामाजिक कार्यांसोबतच कुटुंबाकडेही तेवढेच लक्ष देत अंबादासजींनी, ‘आदर्श व संस्कारक्षम’ वातावरणात आपल्या अपत्यांचे संगोपन केले. उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ असणारी त्यांची अपत्ये आपल्या संसाराचा गाडा नेटाने चालवीत आहेत. शाहीर अंबादास तावरे “अमृतमहोत्सवी” वर्षात पदार्पण करून देखील शाहिरी प्रती असलेली त्यांची निष्ठा व प्रेम अजूनही तेवढीच उत्स्फूर्त आहे. महाराष्ट्राप्रति, भारतभूमीप्रति आपले कर्तव्य समजून लोककलेच्या संगोपनासाठी योगदान देऊन या वयात देखील त्यांचे हे महनीय, निस्वार्थ, नवे कलावंत घडविण्याचे कार्य आजही नेटाने सुरू आहे.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन