प्राचीन वनस्पतींचा उगम अब्जावधी वर्षांपूर्वी झाला हे सर्वमान्य असले, तरी निरनिराळ्या प्रजातींचे उगम केव्हा आणि कोठे झाले याबद्दल शास्त्रज्ञांच्या मनात उत्सुकता कायम आहे. खंडांचे स्थलांतर होण्यापूर्वी भारत द्वीपकल्प हे ६६ दशलक्ष वर्षे दक्षिण गोलार्धातील टेथिस महासागरातील एक बेट होते. त्या काळात दख्खन पठारातील (Deccan Traps) वनात जीव-वैविध्य मोठ्या प्रमाणावर होते. तेथे उगम पावलेले अनेक जीव खंडांच्या स्थलांतराबरोबर पृथ्वीवरील दुसऱ्या खंडांवर पसरले असावे, याचे पुरावे जीवाश्म रूपात संशोधनांती प्राप्त होत आहेत.

द्राक्ष बीचे ६६ दशलक्ष वर्षे जुने बी.              (Indovitis chitaleyae )

नागपूरच्या डॉ. श्यामला चितळे यांच्या प्रयोगशाळेत सन १९४८ पासून जीवाश्मांवर संशोधन सुरू आहे. दख्खनच्या पठारातील भूस्तरात सापडलेल्या वनस्पती बियाणांच्या अवशेषांचे काही नमुने अमेरिकेतील क्लिव्हलँड म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी येथे साठविले आहेत. उत्तर गोलार्धात द्राक्षाच्या अनेक जातींच्या अवशेषांचे नमुने सापडतात. क्लिव्हलँड म्यूझीयमच्या वनस्पती विभागात द्राक्ष अवशेषांचे हे नमुने सन २००५ मध्ये साठविले गेले, फ्लॉरिडाच्या नॅचरल हिस्टरी म्यूझीयममधील स्टीव्ह मँचेस्टर या संशोधकाने हे अवशेष सर्वात जुन्या द्राक्षाच्या जातीच्या बियांचे असल्याचे मत सन २०१३ मध्ये मांडले. त्यांनी या अवशेषांना डॉ. चितळे यांच्या सन्मानार्थ Indovitis chitaleyae असे नामाभिधान केले.

या अश्मीभूत बियांचा आकार द्राक्षांच्या बियांच्या आकाराशी मिळताजुळता असून त्या बी मध्ये दशलक्ष वर्षे जुने रेझीनही आहे. डीएनए पुराव्याप्रमाणे द्राक्ष कुटुंब सु. ८० दशलक्ष वर्षांपूर्वी अलग गुलाब  कुटुंबापासून (सफरचंद, अक्रोड, इ.) झाले, परंतु आजपर्यंत सापडलेले जुने  द्राक्ष अवशेष सुमारे ५८ दशलक्ष जुन्या (पॅलिओसीन) काळातील आहेत.म्हणजेच द्राक्ष-कुटुंबातील वनस्पती प्रजातींचा उगम भारतात झाला असावा. ५० दशलक्ष वर्षांपूर्वी युरेशियाशी संपर्क झाल्यानंतर पक्ष्यांद्वारे या प्रजातींचे बी यूरोपमध्ये पोचले आणि आज मिळणाऱ्या द्राक्षांची प्रजाती निर्माण झाली.

संदर्भ :

  • Stephanie Livingston,  New museum study describes World’s oldest known grape fossils  found in India. Florida Museum of Natural History News Letter, 15 Nov.2013.
  • Machestar, Steve. American Journal of Botany, Sept. 2013.
  • Chitaley Memorial Volume.,Ed. Dr. Mrs.A.A.Saoji;Reproduced from. The Botanique, : 17 (1-2) pp.32-33,2013.

समीक्षक बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा