नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.

अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी “थिएटर ऑफ नेशन” या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. थिएटर ऑफ नेशन अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेद्वारा जगासमोर ठेवले गेले. मानवजातीचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्याविष्कार, हे सशक्त माध्यम मानले गेले आहे. या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगाने झाला आहे. त्यामुळे नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (International Theatre Institute) या संस्थेने केली.

नाट्यकलेची सर्वव्यापी सैद्धांतिक व्याख्या, नाटकाचे दृश्यात्मक सामर्थ्य, नाट्यकलेसमोरील आव्हाने, नाट्याभ्यास व संशोधन आणि नाट्यकर्मींची कर्तव्ये या मुद्द्यांवरील विस्तृत चर्चा या संकल्पनेद्वारा मांडण्यात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यशस्वी झाली. २७ मार्च १९६१ ते २७ मार्च १९६२ या कालावधीत एकूण ८५ देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे २७ मार्च १९६२ पासून युनेस्कोने हाच दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला. आजमितीला थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेशी जगातील ९० देश जोडले गेले आहेत.

जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी एखाद्या मान्यवर नाट्यकर्मीचे नाट्यविषयक तात्त्विक विवेचन प्रसिद्ध केले जाते. १९६२ साली फ्रान्सच्या जीन काॅक्च्यू (Jean Cocteau) यांना आपले विचार मांडण्याचा पहिला मान मिळाला.

या व्यासपीठावरून पुढे आर्थर मिलर, हेराॅल्ड पिंटर यांसारख्या जगविख्यात नाटककार-रंगकर्मींनी नाटकाविषयीचे आपले चिंतन मांडले. शेक्सपिअरने ‘जग ही एक रंगभूमी आहे’ असे म्हटलेले आहे; परंतु रंगभूमीवरून जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेने दिला. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकास नाट्यसृष्टी आतून व बाहेरून पाहता येते. त्यामुळे नाट्याविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाटक या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्त्विक चिंतन आहे.

नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने वाचिक, आंगिक, आहार्य व सात्विक असे चार अभिनय प्रकार मांडले गेले आहेत. मात्र मागील २५ वर्षांच्या काळात विकसित झालेल्या मंचीय विचारांमुळे “तात्त्विक” हा नवा अभिनयप्रकार रुजण्यास थिएटर ऑफ नेशन या चळवळीने योगदान दिले. जागतिक पातळीवर सैद्धांतिक दृष्ट्या “तात्त्विकतेचे” विश्लेषण व विवेचनाचे काम नाट्यकर्मींद्वारा सुरू आहे. २७ मार्च १९६२ रोजी जागतिक पातळीवर नाट्यविचारांचा प्रवाह एकत्रितपणे सुरू झाल्याकारणाने हा दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जातो.

संदर्भ :