ज्ञानमीमांसेतील एक उपपत्ती. एका विवक्षित प्रकारच्या विधानांच्या सत्याचे ज्ञान आपल्याला कसे होते, ह्याचा उलगडा करण्यासाठी ही उपपत्ती मांडण्यात आली आहे. विधानांतील एक मूलभूत प्रकारभेद म्हणजे विश्लेषक विधाने व संश्लेषक विधाने हा भेद. एखादे विधान, ते ज्या वाक्यात मांडलेले असते त्या वाक्यातील शब्दांच्या आणि पदांच्या अर्थामुळेच जर खरे ठरत असेल, तर त्या विधानाला विश्लेषक विधान म्हणतात. उदा., ‘रामाच्या काकाला एकतरी भाऊ असला पाहिजे’ ह्या वाक्यातील ‘काका’, ‘भाऊ’, ‘एकतरी’ इ. शब्दांचा अर्थ आपण ध्यानी घेतला, तर हे विधान खरे असलेच पाहिजे हे आपल्या ध्यानी येते. विश्लेषक विधान नाकारले, तर आत्मव्याघाताचा तर्कदोष पदरी येतो व म्हणून ते सत्य म्हणून स्वीकारावे लागते. उलट संश्लेषक विधान, ते व्यक्त करणाऱ्या वाक्यातील शब्दांच्या केवळ अर्थावरून खरे ठरत नाही व म्हणून त्या विधानाचा अर्थ समजल्यानंतर ते खरे आहे की नाही, हे ठरवावे लागते. आता संश्लेषक विधान सत्य आहे की नाही, हे कसे ठरविता येते? ह्याचे स्वाभाविक उत्तर असे की, ज्या वस्तूविषयी, वस्तुस्थितीविषयी ते विधान केलेले असते तिचे निरीक्षण करून, म्हणजे इंद्रियानुभवाच्या आधारावर. उदा., ‘हे फूल तांबडे आहे’ हे विधान संश्लेषक आहे. म्हणजे ह्या विधानाचा अर्थ समजला, तरी केवळ त्याच्यावरून ते खरे आहे की खोटे आहे, हे ठरविता येत नाही. हे ठरविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या फुलासंबंधी हे विधान करण्यात आले आहे, त्याचे निरीक्षण करणे. आता निरीक्षणाने किंवा इंद्रियानुभवाने ज्यांचे सत्य ज्ञात होते, अशा विधानांना एक मर्यादा आहे. ती अशी : निरीक्षणाच्या आधारावर आपल्याला काय सांगता येते? तर निरीक्षित वस्तूच्या ठिकाणी अमुक अमुक गुण आढळून आले व म्हणून हे गुण त्या वस्तूच्या ठिकाणी आहेत, एवढीच गोष्ट निरीक्षणाच्या आधारावर सांगता येते. पण अमुक वस्तूच्या ठिकाणी किंवा अमुक प्रकारच्या वस्तूच्या ठिकाणी अमुक गुण असलेच पाहिजेत अशा प्रकारची, आवश्यकतेने सत्य असल्याचा दावा करणारी विधाने अनुभवाच्या किंवा निरीक्षणाच्या आधाराने करता येत नाहीत. पण आता पुढील विधाने घ्या : ‘प्रत्येक घटनेला कारण असलेच पाहिजे’, किंवा ‘ज्या वस्तूला रूप आहे, त्या वस्तूला विस्तार असलाच पाहिजे’ ही विधाने विश्लेषक नाहीत. ‘घटना’ ह्या पदाच्या अर्थात ‘कोणत्यातरी कारणामुळे घडून येणे’ हा अर्थ अंतर्भूत नाही किंवा ‘रूप’ ह्या संकल्पनेचा ‘विस्तार’ ही संकल्पना एक घटक नाही. तेव्हा ही विधाने नाकारली, तर आत्मव्याघाताचा दोष पदरी येणार नाही. उदा., ‘ही घटना घडली पण तिला कोणतेही कारण नव्हते’, असे म्हणणे खोटे असेल, पण ते आत्मव्याघाती असणार नाही. तेव्हा ही विधाने विश्लेषक नाहीत; ती संश्लेषक आहेत. केवळ तर्कशास्त्राच्या नियमांच्या साहाय्याने त्यांचे सत्य सिद्ध करता येणार नाही. पण ती आवश्यकतेने सत्य असण्याचा दावा करणारी, वस्तुस्थिती अशी असलीच पाहिजे असे सांगणारी विधाने असल्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे निरीक्षणाच्या किंवा इंद्रियानुभवाच्या आधाराने ती सिद्ध करता येणार नाहीत. ज्या विधानांचे सत्य आपण स्वीकारतो, परंतु जी इंद्रियानुभवाच्या आधारावर सत्य ठरविता येत नाहीत, अशा विधानांना पूर्वप्राप्त विधाने म्हणतात. उलट जी विधाने खरी आहेत की खोटी आहेत हे इंद्रियानुभवाच्या आधारावर ठरविता येते, अशा विधानांना उत्तरप्राप्त विधाने म्हणतात. ‘हे फूल तांबडे आहे’ हे विधान संश्लेषक व उत्तरप्राप्त आहे. उलट ‘प्रत्येक घटनेला कारण असलेच पाहिजे’ किंवा ‘ज्या वस्तूला रूप आहे, त्या वस्तूला विस्तार असलाच पाहिजे’ ही विधाने संश्लेषक व पूर्वप्राप्त आहेत.

अशा संश्लेषक-पूर्वप्राप्त विधानांच्या सत्याचे ज्ञान आपल्याला कसे होते? ते इंद्रियानुभवाच्या साहाय्याने होत नाही किंवा तर्कशास्त्राच्या नियमांवर ते आधारलेले नसते. अंतःप्रज्ञावादाच्या मते अशी संश्लेषक-पूर्वप्राप्त विधाने सत्य आहेत, हे ज्ञान आपल्याला एका साक्षात बौद्धिक दर्शनाने होते. उदा., ‘घटना’ ही संकल्पना (किंवा ‘रूप’ ही संकल्पना) आणि ‘कोणत्यातरी कारणामुळे घडून येणे’ ही संकल्पना (किंवा ‘विस्तार’ ही संकल्पना) ह्यांच्यामध्ये आवश्यक असा एक संबंध आहे, हे आपल्याला एका साक्षात बौद्धिक दर्शनामुळे आढळून येते, अशी ही भूमिका आहे. अशा संश्लेषक आणि पूर्वप्राप्त विधानांचे साक्षात बौद्धिक दर्शन घेण्याच्या मानसिक शक्तीला ‘अंतःप्रज्ञा’ म्हणतात.

अंतःप्रज्ञेला विधानांच्या सत्याचे जे ज्ञान होते ते साक्षात असते; अनुमानाने इतर विधानांपासून निष्पन्न करून घेतलेले असे ज्ञान नसते. हे साक्षातपण अंतःप्रज्ञेपासून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. अशा साक्षात ज्ञानाला उद्देशून ‘इंट्यूइशन’ हा शब्द इंग्रजीत वापरतात आणि असे ज्ञान प्राप्त करू देणाऱ्या शक्तीलाही इंट्यूइशन म्हणतात. अंतःप्रज्ञेला प्राप्त होणारे ज्ञान ह्या स्वरूपाचे आहे. पण ह्याशिवाय इंट्यूइशन शब्दाचे पुढील दोन प्रमुख पारिभाषिक अर्थ आहेत : (१) कांटप्रणीत अर्थ. इंद्रियगोचर वस्तूचे आपल्याला जे प्रत्यक्षज्ञान होते, ते साक्षात असल्यामुळे ह्या ज्ञानाला कांट इंट्यूइशन म्हणतो. ह्या इंट्यूइशनमध्ये अर्थात वेदनेचा घटक असतो. परंतु ‘अवकाश’ व ‘काल’ ह्यांचेही आपल्याला साक्षात दर्शन होते, परंतु त्याच्यात वेदनेचा घटक नसतो म्हणून ही शुद्ध दर्शने इंट्यूइशन्स आहेत, असे कांटचे म्हणणे आहे. (२) इंट्यूइशन ह्या ज्ञानशक्तीचे बेर्गसाँ ह्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने एक स्वरूप कल्पिले आहे, त्याचा उलगडा पुढे करण्यात आला आहे. ह्या पारिभाषिक अर्थांशिवाय व्यवहारात एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुमानाचा किंवा तर्काचा आधार घ्यावा न लागता चटकन बोध झाला, तर हे इंट्यूइशनने झाले अशा अर्थानेही हा शब्द वापरण्यात येतो. अंतिम वास्तवतेचे ज्ञान साक्षात गूढानुभूतीने होते असे एक मत आहे आणि ह्या ज्ञानालाही इंट्यूइशनने प्राप्त झालेले ज्ञान असे म्हणण्यात येते. ज्ञानाचे साक्षातपण हा ह्या सर्व अर्थांना जोडणारा धागा आहे.

काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर एखादी वस्तू तांबडी आहे असे जर आपल्याला दिसून आले, तर ‘ती वस्तू तांबडी आहे’ हे विधान सत्य ठरवायला हा अनुभव ज्याप्रमाणे पुरेसा आधार आहे, त्याप्रमाणे साक्षात बौद्धिक दर्शनाने एखादे संश्लेषक विधान सत्य आहे असे जर आढळून आले, तर ते विधान निश्चितपणे सत्य आहे हे ठरवायला हे दर्शन पुरेसा आधार असते; अन्य आधार आवश्यक नाही व शक्यही नाही, असे अंतःप्रज्ञावादाचे म्हणणे आहे.

आधुनिक काळात जी. ई. मूर ह्याने ‘मूलभूत मूल्यविधाने अंतःप्रज्ञेने, साक्षात बौद्धिक दर्शनाने सिद्ध होतात’ ही भूमिका समर्थपणे मांडली आहे. ‘चांगुलपणा’ ह्या गुणाशी आपला परिचय होतो तो त्याचे साक्षात बौद्धिक दर्शन झाल्यामुळे, आणि कित्येक प्रकारच्या वस्तूंच्या ठिकाणी ‘चांगुलपणा’ वसतो हे ज्ञान ‒ म्हणजे ‘प्रेम चांगले असते’, ‘सौंदर्याच्या आस्वादाचा अनुभव चांगला असतो’ इ. विधाने सत्य आहेत हे ज्ञान ‒ आपल्याला अंतःप्रज्ञेने होते, असे त्याचे म्हणणे आहे.

संश्लेषक परंतु पूर्वप्राप्त विधानांच्या प्रामाण्याचा उलगडा करण्यासाठी अंतःप्रज्ञावाद पुढे आला. ह्या भूमिकेतील कमकुवत भाग असा : आपला नेहमीचा डोळ्यांनी पाहण्याचा जो अनुभव आहे, त्या नमुन्यावर बौद्धिक दर्शनाची संकल्पना करण्यात आली आहे. परंतु एखादी वस्तू जर दोन माणसांना वेगवेगळी भासली, तर ह्या भेदाचे निरसन करण्याचे जे ठरलेले मार्ग आहेत (उदा., ती वस्तू स्वच्छ सूर्यप्रकाशात पाहणे, अधिक जवळून पाहणे, डोळे तपासून घेणे इ.), तशा प्रकारचे मार्ग बौद्धिक दर्शनाच्या बाबतीत उपलब्ध नाहीत. तेव्हा दोन बौद्धिक दर्शनांत जर भेद आला, तर त्याचे निरसन करणे अशक्य होते. म्हणून संश्लेषक परंतु पूर्वप्राप्त अशा स्वरूपाची विधानेच अनेक तत्त्ववेत्ते नाकारतात व सर्व विधानांची व्यवस्था (१) विश्लेषक आणि (२) उत्तरप्राप्त, म्हणजे अनुभवाधिष्ठित संश्लेषक विधाने ह्या दोन प्रकारांत लावण्याचा प्रयत्न करतात. उदा., तार्किक प्रत्यक्षार्थवादी. उलट संश्लेषक पण पूर्वप्राप्त विधाने आहेत, असा आग्रह कांट धरतो; परंतु त्याचे प्रामाण्य बौद्धिक दर्शनावर आधारित नाही. आपल्या अनुभवाची तार्किक चौकट निश्चित करण्यात ह्या विधानांना एक आवश्यक कार्य असते; म्हणून त्यांचे सत्य स्वीकारणेही अपरिहार्य असते, असे दाखवून देण्याचा प्रयत्न तो करतो. व्हिटगेन्श्टाइन व त्याचे अनुयायी ह्यांची भूमिकाही साधारण अशीच आहे.

सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता आंरी बेर्गसाँ ह्यानेही ‘आपल्याला काही ज्ञान अंतःप्रज्ञेने होते’ ही भूमिका स्वीकारली आहे. पण बेर्गसाँने अंतःप्रज्ञेचे जे स्वरूप कल्पिले आहे, ते अंतःप्रज्ञेच्या वर दिग्दर्शित केलेल्या स्वरूपाहून वेगळे आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धीची प्रवृत्ती ज्ञेय वस्तूचे विश्लेषण किंवा पृथक्करण करण्याची असते; ज्ञेय वस्तू अनेक, भिन्न, पृथक घटकांची बनलेली असते आणि त्यांच्या परस्परसंबंधातून तिचे स्वरूप सिद्ध झालेले असते, ह्या दृष्टिकोनातून बुद्धी आपल्या विषयाकडे पाहते. त्यामुळे विश्व हे अनेक पृथक परंतु एकमेकांशी ज्यांचा बाह्य संबंध आहे अशा वस्तूंचा समुदाय आहे, असे विश्वाचे स्वरूप बुद्धीला प्रतीत होते. परंतु बुद्धीशिवाय अंतःप्रज्ञा ही एक दुसरी ज्ञानशक्ती माणसाच्या ठिकाणी असते. ती ज्ञेय वस्तूचे विश्लेषण करीत नाही. ज्ञेय वस्तूशी समरस, तद्रूप होण्याची ही शक्ती आहे. प्राण्यांच्या ठिकाणी जी सहजप्रवृत्ती असते, तिचेच अंतःप्रज्ञा हे विकसित, प्रगल्भ व सुजाण असे स्वरूप आहे. अंतःप्रज्ञेला होणारे ज्ञान हे आंतरिक, मर्मग्राही ज्ञान असते व म्हणून बुद्धीला प्राप्त होणाऱ्या बाह्य, विश्लेषणात्मक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते, असे बेर्गसाँचे म्हणणे आहे.

अंतःप्रज्ञेने आपल्याला एक प्रकारचे ज्ञान ‒ आत्मतत्त्वाचे ज्ञान ‒ होते, ही भूमिका भारतीय तत्त्वज्ञानातही स्वीकारण्यात आली आहे. आपल्या सर्व वासनांचा क्षय झाला आणि आपले चित्त किंवा बुद्धी पूर्णपणे शुद्ध झाली की, तिच्यात आत्मतत्त्वाचे ज्ञान आपोआप स्फुरते, अशी ही भूमिका आहे. केवळ तर्काच्या किंवा बुद्धीच्या साहाय्याने हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तर विशुद्ध अशा बुद्धीमध्ये ते स्फुरावे लागते; परंतु तर्क व शब्द (श्रुती) ह्यांचे साहाय्य त्याला आवश्यक असते.

गणिती विधाने आणि गणितातील सिद्धी ह्यांच्या स्वरूपाविषयीची एक उपपत्ती अंतःप्रज्ञावाद ह्या नावाने ओळखली जाते.

संदर्भ :

  • Heyting, Arend, Intuitionism : An Introduction, Amsterdam, 1956.

प्रतिक्रिया व्यक्त करा