अवकाश ही एक मूलभूत संकल्पना आहे. भौतिक विश्वासंबंधीच्या मूलभूत संकल्पना सुस्पष्ट, नेमक्या करीत जाणे, त्यांचे परस्परांशी असलेले तार्किक संबंध रेखाटणे, हे कार्य तत्त्वज्ञानातही मोडते आणि विज्ञानातही मोडते. अवकाशाच्या स्वरूपासंबंधी भारतीय तत्त्वज्ञानात झालेल्या विचाराचा, स्वीकारण्यात आलेल्या विविध भूमिकांचा आढावा ह्या नोंदीच्या प्रथमार्धात घेण्यात आला आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील विचारांचा व भूमिकांचा आढावा उत्तरार्धात घेतला आहे.
भारतीय विचार : भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानात अवकाश ह्यास ‘आकाश’ व ‘दिक्’ हे दोन पर्याय वापरले आहेत. उपनिषदे व सांख्य तत्त्वज्ञान यांत अवकाशास ‘आकाश’ अशी संज्ञा आहे, तर न्यायवैशेषिक दर्शनांमध्ये अवकाश म्हणजेच ‘दिक्’ किंवा ‘दिशा’ असे गृहीत धरले आहे.
आकाशात सर्व जग भरलेले आहे आणि आकाशाच्या आधाराने सर्व मूर्त वस्तूंची रचना झाली आहे; म्हणजेच सर्व मूर्तामूर्त ज्ञेयविश्व आकाशाच्याच आधाराने ओतप्रोत रचले गेलेले आहे, असा विचार प्रथम प्राचीन उपनिषदांमध्ये विशेषतः बृहदारण्यक उपनिषदात सांगितला आहे. आकाश हेच भूत, भविष्य, वर्तमान या कालक्रमाचेही नियामक तत्त्व आहे. परंतु उपनिषदातील अध्यात्मवाद याहीपुढे जाऊन असे म्हणतो की, हे आकाश ज्यावर आधारित आहे, ते अंतिम, अविनाशी, अक्षर सत् तत्त्वच मूलभूत आहे.
‘आकाश’ हे तत्त्व ब्रह्मातून परिणत झाले आहे, असे प्राचीन उपनिषदे मानतात व सांख्य तत्त्वज्ञान प्रकृती द्रव्याची ती क्रमाने झालेली परिणती आहे, असे मानतात. सांख्यांच्या प्रमाणे ‘आकाश’ हे मूलतः शब्दतत्त्व आहे.
वैशेषिकांनी म्हणजे कणाद व त्याचे अनुयायी यांनी आकाश हा शब्द शब्दगुणाचे आश्रयभूत द्रव्य म्हणून स्वीकारला असून पूर्व-पश्चिम इ. दिशाविभाग अलीकडे व पलीकडे असण्याचा मूर्त द्रव्यांचा गुण निर्माण किंवा निर्धारित करणारे अखंड व विभू किंवा अनंत जे द्रव्य, त्यास ‘आकाश’ ही संज्ञा न देता ‘दिक्’ ही संज्ञा ते देतात. मराठीत ‘दिक्’ शब्द ‘दिशा’ या पर्यायाने दर्शित करावा. दिक् किंवा दिशा सर्व मूर्त द्रव्यांचा आधार आहे. हा आधार व त्याच्यावर आधारलेल्या मूर्त वस्तू यांचा संबंध पृथ्वीवर दगड किंवा वृक्ष आहे अशा तऱ्हेचा नसून एक निराळा संबंध आहे. किंवा घट आणि त्यांतील जल यांचा जो समावेशनात्मक संयोग-संबंध आहे, तोही येथे विवक्षित नाही. या विशिष्ट संबंधास ‘दैशिक विशेषणता’ म्हणतात. दिक् किंवा दिशा ही सर्व उत्पद्यमान वस्तूंचे कारण आहे आणि ती कारणता म्हणजे आधारता होय.
पाश्चात्त्य विचार : वस्तू एका स्थानाहून दुसऱ्या स्थानाकडे स्थलांतर करू शकतात. तेव्हा ज्याच्यात वस्तूंना स्थाने असतात व त्या स्थानांतर करू शकतात, असे वस्तूंहून भिन्न असे काहीतरी असले पाहिजे, हा अवकाश ह्या संकल्पनेमागचा मूळ विचार दिसतो. अवकाशाचा धर्म वस्तूंना सामावून घेणे, स्वतःमध्ये स्थान देणे, त्यांचे स्थलांतर शक्य करणे, हा असला पाहिजे. पण वस्तूंहून वेगळ्या असलेल्या ह्या अवकाशाचे स्वरूप काय असू शकेल? एक विचार असा की, अवकाश म्हणजे अतिशय सूक्ष्म असे द्रव्य आहे. उदा., कित्येक पायथॅगोरियन तत्त्ववेत्त्यांनी रिक्त अवकाश म्हणजे वायू, असे मत व्यक्त केले होते. छांदोग्य उपनिषदातही (४·२) वायू हे समावेशक तत्त्व आहे, असा विचार आलेला आहे. परंतु हे द्रव्यही अवकाशात असले पाहिजे, ही गोष्ट उघड आहे. त्यामुळे अवकाश म्हणजे केवळ पोकळी, रिक्तता, असेही मत पुढे आले. ग्रीक अणुवाद्यांचे मत असे होते. फक्त अणू आणि ते जिच्यात असतात ती पोकळी ह्यांनाच अस्तित्व आहे, असा अणुवादाचा सिद्धांत होता. पण पोकळी म्हणजे जर केवळ अभाव असेल, तर अभावाला अस्तित्व कसे असू शकते, हा प्रश्नही उपस्थित होतो.
प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे अवकाश हे सर्व भौतिक वस्तूंचे पात्र आहे. म्हणजे कुठलीही भौतिक वस्तू अवकाशात सामावलेली असते, तिला अवकाशात स्थान असते आणि तिने अवकाश व्यापलेला असतो. पण प्लेटोच्या मताप्रमाणे भौतिक वस्तू म्हणजे वेगवेगळ्या आकारांच्या पृष्ठभागांनी बंदिस्त अशी पोकळीच असते. तेव्हा अवकाश आणि जड द्रव्य यांत भेद कसा करायचा, हा प्रश्न निर्माण होतो. ॲरिस्टॉटलने वेगळे मत स्वीकारले होते. अवकाश म्हणजे ज्याच्यात जड द्रव्य सामावू शकते असे पात्र नाही; तर जड वस्तूच्या लगतच्या सीमा म्हणजे अवकाश. अवकाशात जड वस्तू नसते. तर जड वस्तूला अस्तित्व असते आणि तिच्या सीमांनी अवकाश निश्चित होतो. ह्याचा अर्थ असा की, जड वस्तूच नसली, तर तिच्या सीमा असणार नाहीत व म्हणून अवकाशही असणार नाही. जेथे जेथे अवकाश आहे, तेथे तेथे जड वस्तू असली पाहिजे. म्हणजे अवकाश द्रव्याने ओतप्रोत भरला आहे, असे मानले पाहिजे.
आधुनिक काळात देकार्तने विस्तार हेच जड द्रव्याचे सार आहे, हे मत स्वीकारले होते. आता अवकाशाच्या अंगी विस्तार असतोच. तेव्हा विस्तार जर जड द्रव्याचे सार असेल, तर अवकाशाचा कोणताही भाग म्हणजे जड वस्तू असणार. म्हणजे अवकाश हे सूक्ष्म द्रव्याने ओतप्रोत भरलेले अस्तित्व आहे, हा सिद्धांत देकार्त स्वीकारतो. देकार्तच्या ह्या भूमिकेपासून जे प्रश्न निर्माण होतात, ते असे : एक विवक्षित जड वस्तू एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी गेली, ह्या प्रकारच्या विधानाचा अर्थ आपण कसा लावणार? किंवा जड द्रव्याचे सार जर केवळ विस्तार असेल, तर अवकाशाचा एक भाग दुसऱ्या भागापेक्षा अधिक दाट रीतीने व्यापला आहे, ह्या विधानाचा तरी अर्थ कसा लावणार? अवकाश सर्वत्र, एकरूप, एकाकार आहे असे जर मानले आणि विस्तार हेच जड द्रव्याचे सार आहे असे मानले, तर ह्या विधानांचा उलगडा करता येणार नाही. पण अवकाश सर्वत्र एकरूप आहे असे मानायचे कारण नाही, हे आधुनिक विज्ञानाने दाखवून दिले आहे.
लायप्निट्सने अवकाशाच्या स्वरूपासंबंधी एक वेगळीच उपपत्ती पुढे मांडली. अवकाश म्हणजे कोणत्याही प्रकारचे द्रव्य किंवा वस्तू नव्हे, तर एकाच वेळा अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंना एकाच व्यवस्थेत ओवणाऱ्या परस्परसंबंधीची वीण म्हणजे अवकाश. अवकाश हे एक प्रकारचे सूक्ष्म द्रव्य आहे किंवा भौतिक वस्तूंहून वेगळ्या स्वरूपाची, पण वस्तू आहे, ह्या उपपत्तीला ‘केवल अवकाशाची उपपत्ती’ म्हणतात. अवकाश म्हणजे फक्त परस्परसंबंधांची व्यवस्था आहे, ह्या उपपत्तीला ‘सापेक्ष आवकाशाची उपपत्ती’ म्हणतात. ह्या दोन उपपत्तींतील वाद अजून निकालात निघालेला नाही (अवकाशाची सापेक्ष उपपत्ती व सापेक्षतावादाचा सिद्धांत यांतील भेद ध्यानी घेतला पाहिजे).
कांटने अवकाशाच्या केवल आणि सापेक्ष ह्या दोन्ही उपपत्ती नाकारल्या आणि एक वेगळीच उपपत्ती पुढे मांडली. अवकाश म्हणजे इंद्रियानुभवात आपल्याला जी वेदने प्राप्त होतात त्यांचा आवश्यक असा आकार आहे, अशी ती उपपत्ती आहे. अवकाश वेदनांचा आकार असल्यामुळे जर वेदने नसतील, तर अवकाश पण असणार नाही. ह्याचा अर्थ अवकाश व्यक्तिनिष्ठ ठरतो. उलट तो वेदनांचा आवश्यक आकार असल्यामुळे कोणतीही इंद्रियगोचर वस्तू अवकाशात असणे आवश्यक ठरते. कांटने ही भूमिका स्वीकारली, त्याचे एक कारण म्हणजे तिला फक्त एकच पर्याय आहे, असे त्याला वाटत होते आणि तो म्हणजे अवकाश ही एक अनंत आणि जिचे अनंत विभाजन करता येईल, अशी एक वस्तू आहे असे मानणे. पण अशी अनंत आणि जिच्या ठिकाणी अनंत विभाज्यता आहे अशी वस्तू मानली तर अनेक व्याघाती द्वंद्वे निष्पन्न होतात, असे त्याला वाटत होते. पण अशी व्याघाती द्वंद्वे निष्पन्न होत नाहीत, हे आधुनिक गणिताने सिद्ध केले आहे.
संदर्भ :
- Jammer, M. Concept of Space, Cambridge, 1969.
- Reichenbach, H. The Philosophy of Space and Time, New York, 1958.
- बृहदारण्यकोपनिषत्, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९३२.