कॅक्टेसी फुलातील फड्या निवडुंग

कॅक्टेसी हे काटेरी वनस्पतींचे कुल असून त्यात मोठ्या, पर्णहीन, लांब, विविध आकार आणि आकारमानाच्या वनस्पतींचा समावेश होतो. बहुतांशी या वनस्पतींची खोडे रसाळ व मांसल ऊतींची असतात. ऊतींमध्ये पाणी सामावलेले असल्याने त्या फुगलेल्या असतात.

सामान्यपणे रखरखीत भागातील वनस्पतींचे रसाळपणा हे एक वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात या वनस्पती पुरेसे पाणी साठवून ठेवत असल्याने उन्हाळ्यात त्या तग धरून राहतात. पाण्याशिवाय या वनस्पती दीर्घकाळ जगू शकतात, मात्र मांसल खोडातील पाणी संपले की या वनस्पती मरतात. त्यांच्या वाढलेल्या खोडात किंवा पानांत पाणी साठवणा-या पेशी असतात. या पेशींवर तेलकट पदार्थांचे आवरण असते. त्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. या वनस्पतींची मुळेही दीर्घकाळ कोरड्या वातावरणात तग धरून राहतात. ही मुळे तंतुमय, खोल जाणारी आणि लांबवर पसरतात. त्यामुळे जमिनीत थोड्या प्रमाणात मुरलेले पाणी या वनस्पती शोषून घेतात.

कोरड्या वातावरणाशी या वनस्पतींचे अनुकूलन झालेले असल्याने या कुलातील वनस्पती इतर सपुष्प वनस्पतींहून वेगळ्या आहेत. ह्या कुलामध्ये सु. ९० प्रजाती असून अंदाजे २,००० जाती आहेत. बहुतेक जाती अमेरिकेतील (विशेषतः मेक्सिको व ब्राझील) आणि काही इतर खंडांतील रुक्ष प्रदेशांत आढळतात. काही अपिवनस्पती आहेत. कॅक्टेसी कुलाची विभागणी पेरेस्कीऑइडी, ऑप्युन्टीऑइडी आणि कॅक्टॉइडी या तीन उपकुलांत होते. कॅक्टॉइडी उपकुलात या वनस्पतींचे वैविध्य आणि त्यांची सर्वाधिक संख्या आढळते.

कॅक्टेस वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील क्षेत्रिका. क्षेत्रिका म्हणजे पर्णतलावर येणारी कळी होय. क्षेत्रिकेतून काटे, पाने, केस आणि फुले येतात. त्यांचे काटे आणि अंकुशलोम हे पानांच्या रूपांतरणातून निर्माण झालेले असतात. फुले हासुद्धा या कुलाचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. फुले सामान्यपणे मोठी, द्विलिंगी, बहुधा एकएकटी किंवा फुलो-यात येतात. त्यात अनेक पुंकेसर असतात. फुले पांढरी, पिवळी, लाल व जांभळी अशी विविधरंगी असतात. दले आणि निदले यांच्या संयोगातून फुलांच्या तळाशी पुष्पनलिका तयार झालेली असते. अंडाशय खालच्या बाजूला असते आणि ते उघडे असते किंवा खवले, केस वा या दोहोंनी झाकलेले असते. वनस्पतीची पूर्ण वाढ झाली की, दरवर्षी फुले येतात. पिकलेली फळे मांसल किंवा शुष्क असतात. सर्व फळांत अनेक बिया असतात. प्रामुख्याने पक्ष्यांद्वारे त्यांचा प्रसार होतो.

या वनस्पतींच्या आकारात तसेच रचनेत विविधता आढळते. काही जातींच्या खोडांचा व्यास १.५ सेंमी.पेक्षा कमी असून त्या उंचीनेही लहान असतात. काही जाती उदा., कार्नेजिया जायगँटिया २० मी.पर्यंत उंच असून वजनाने जड असतात. काहींची खोडे १ मी. पेक्षा अधिक व्यासाची असतात. काटेदेखील रंग, लांबी, पोत इ. बाबतींत वेगवेगळे असतात. काही थोड्या जातींमध्ये काटे नसतात. स्तंभाप्रमाणे उंच असलेल्या वनस्पतींची खोडे पावसाळ्यात फुगतात. उदा., सॅग्युरासारख्या ६ मी.पर्यंत उंच वाढणा-या वनस्पतीच्या खोडात पावसाळ्यात जवळजवळ ३५० लि. पाणी साठते. काही तंतुमय मुळे असलेल्या वनस्पतींमध्ये पाणी साठविण्याची क्षमता जास्त असते. सामान्य वनस्पतींप्रमाणे या वनस्पती सूर्यप्रकाशात पर्णछिद्रे उघडत नाहीत. त्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. या वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण वेगळ्या प्रकारे होते. रसाळ खोडांच्या बाहेरील हिरव्या पेशींमध्ये ही क्रिया घडते. रात्री थंड हवेत या वनस्पतींची पर्णरंध्रे उघडतात. यावेळी कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषला जाऊन त्याचे त्वरित कार्बनी आम्लात रूपांतर होते आणि हे आम्ल वनस्पतीत साठले जाते. दुस-या दिवशी या आम्लाचे पुन्हा कार्बन डाय-ऑक्साइडामध्ये रूपांतर होऊन तो प्रकाशसंश्लेषणासाठी वापरला जातो.

खोडातील विविधतेमुळे व सुंदर फुलांमुळे अनेक जाती शोभेकरिता लावतात. काहींची फळे व खोडे खाद्य आहेत. पेरेस्किया अ‍ॅक्युलिअ‍ॅटा ( बार्बाडोस गुझबेरी ) या वनस्पतीची फळे विशेष प्रसिद्ध आहेत. वनस्पतीची चपटी खोडे जनावरांना खाद्य म्हणून देतात. काही वनस्पतींची फळे आंबवून त्यांपासून मद्यही तयार करतात. मोठ्या जाती उदा., लिमॅरोसेरियस मार्जिनाटा  कुंपणाकरिता लावतात. नोपालिया कॉक्सिनेलिफेरा या वनस्पतीवर कोचिनीयल कीटक पोसले जातात. या कीटकांपासून तांबडा रंग मिळतो. त्यासाठी उष्ण कटिबंधीय प्रदेशांत मुद्दाम याची लागवड करतात. भारतात मात्र याची लागवड यशस्वी झालेली नाही. सेरियस, सेलेनिसेरियस, पेरेस्किया, र्‍हिप्सॅलिस, एपिफायलम इ. प्रजाती बागेत शोभेकरिता लावतात.

भारतात विपुल प्रमाणात आढळणा-या कॅक्टेसी कुलातील वनस्पती खालीलप्रमाणे आहेत :

१) नागफणा (ऑपन्शिया डायलेनाय ), २) फड्या निवडुंग (ऑपन्शिया इलॉटिअर; ऑपन्शिया नायग्रिकन्स ),
३) बिनकाट्याचा निवडुंग (ऑपन्शिया फायकस-इंडिका ), ४) पाचकोनी निवडुंग (सेरियस ग्रँडिफ्लोरस; नाईट ब्लूमिंग कॅक्टस ).