आले (मुळक्षोड)

आले हे त्याच नावाच्या लहान बहुवर्षायू ओषधीचे मूलक्षोड (जमिनीलगत आडवे वाढणारे मांसल खोड) आहे. हे मूलक्षोड (आल्याचे गड्डे) शाखित असून हाताच्या पंजासारखे असतात. त्यांची बोटे जवळजवळ व एकमेकांना चिकटलेली असतात. ही वनस्पती सिटॅमिनी गणाच्या झिंजीबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झिंजीबर ऑफिसिनेल आहे. भारत, इंडोनेशिया, वेस्ट इंडीज, उत्तर व पश्चिम आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या उष्णकटिबंधातील प्रदेशांत प्रामुख्याने आल्याची लागवड होते. भारतात विशेषत: दक्षिणेकडील भागात आल्याची लागवड केली जाते. दमट व उष्ण हवामानात आल्याची वाढ होत असल्यामुळे मे-जूनच्या दरम्यान आल्याची लागवड होते.

आल्याच्या मूलक्षोडाला असलेल्या डोळ्यांपासून जमिनीवर सु. ६० ते ९० सेंमी. उंच फांद्या येतात. त्यालाच खाली मुळ्या येतात. पाने साधी, लांबट, २० X १.८ सेंमी. आकाराची जिव्हिकाकार आणि रोमहीन असतात. फुले अनियमित, द्विलिंगी व पिवळट हिरवी असून मार्च-एप्रिलमध्ये कणिशावर येतात. फुलातील मोठी पाकळी जांभळट असून तिच्यावर पिवळट ठिपके असतात. फळे क्वचित येतात. लागवडीसाठी निरोगी, भरीव व कमीत कमी एक डोळा असलेले आल्याचे तुकडे बेणे म्हणून वापरतात.

सुकविलेल्या आल्याला ‘सुंठ’ म्हणतात. सुंठ तयार करण्यासाठी आल्याच्या गडड्यांना चिकटलेली माती, मुळ्या व त्यांवरील साल काढून टाकतात. नंतर ते धुवून ७-८ दिवस वाळवितात. अशा प्रकारे सामान्य प्रतीची व भुरकट रंगाची सुंठ तयार करतात. चांगल्या प्रतीची सुंठ तयार करताना आले काही वेळ पाण्यात भिजत घालून त्यावरील साल काढून टाकतात. नंतर ती चुन्याच्या निवळीत भिजत ठेवतात. ८-१० दिवस हे आले वाळविल्यानंतर चांगल्या प्रतीची सुंठ तयार होते. उत्तम प्रतीची पांढरी व आकर्षक सुंठ बनविण्यासाठी गंधकाची धुरी देतात.

आल्याचे रासायनिक घटक पुढीलप्रमाणे असतात: पाणी ८१ %, प्रथिने २.३० %, स्निग्ध पदार्थ १.०० %, कर्बोदके १२.२० %, तंतुमय पदार्थ २.३० % व राख १.२० %. जिंजेरॉल नावाच्या बाष्पनशील तेलामुळे आल्याला विशिष्ट चव असते. आले व सुंठ यांचा उपयोग औषधासाठी व मसाल्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. आले तिखट, उष्ण, उत्तेजक, वायुनाशक व पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. आलेपाक आणि सुंठसाखर खोकला, पडसे, दमा, मळमळ, ओकारी इत्यादींवर गुणकारी समजतात. जिंजर बीर आणि जिंजर एल ही पेये बनविण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.