हेझ, आयझॅक इझ्राएल (Hayes, Isaac Israel) : (५ मार्च १८३२ – १७ डिसेंबर १८८१). अमेरिकन समन्वेषक व शरीरक्रियावैद्य. ते ऑक्सफर्डशर घराण्याचे वंशज असून अठराव्या शतकात त्यांचे कुटुंब संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्यातील चेस्टर परगण्यात येऊन स्थायीक झाले. येथेच वडिल बेंजामिन व आई ॲन या दाम्पत्यापोटी हेझ यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण वेस्टटाऊन अकॅडमीमध्ये १८३८ ते १८४८ या काळात झाले. १८५३ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी एम. डी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना आर्क्टिक समन्वेषणामध्ये रस निर्माण होऊन ते लगेचच इलायशा केंट केन यांच्या आर्क्टिक प्रदेशाकडील दुसऱ्या सफरीत एक शल्यचिकित्सक म्हणून स्वेच्छेने सामील झाले. १८४५ मध्ये सर जॉन फ्रँक्लिन हे ब्रिटिश समन्वेषक ध्रुवीय प्रदेशाकडील सफरीवर गेले असताना लोकांसह त्याचे जहाज बेपत्ता झाले होते. त्या जहाजाचा शोध घेण्यासाठीची ही सफर होती. केन यांच्या या सफरीसाठी न्यूयॉर्कमधील व्यापारी हेन्री ग्रिनेल यांनी अर्थसाहाय्य केले होते. ३१ मार्च १८५३ रोजी न्यूयॉर्कहून ‘ॲडव्हान्स‘ या गलबतातून ही सफर निघाली. ग्रीनलंड बेटाच्या वायव्य भागातील केन बेसिन या सामुद्रधुनीत केन यांचे गलबत हिमाच्छादित झाल्यामुळे त्यांना संपूर्ण हिवाळा तेथेच थांबावे लागले. हेझ त्या वेळी पथकप्रमुख होते. गलबत अडकल्यामुळे आपल्या पथकातील सहकाऱ्यांबरोबर हेझ कॅनडाच्या उत्तर भागात असलेल्या एल्झमीअर बेटाच्या जवळपासच्या बऱ्याच प्रदेशात फिरले. या प्रवासात त्यांनी मे १८५४ मध्ये एल्झमिर बेटाच्या ईशान्य भागातील ग्रिनेल लँड या प्रदेशाचा शोध लावला आणि त्याचे समन्वेषण केले. ऑगस्ट १८५४ मध्ये ग्रीनलंड बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऊपरनव्हीक येथे जाण्याचा त्यांचा मानस होता; मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. १८५५ मध्ये ते परत न्यूयॉर्कला आले.

हेझ पुन्हा जुलै १८६० मध्ये बोस्टनहून ‘युनायटेड स्टेट्स‘ या दुकाठी गलबतामधून (स्कूनर) आर्क्टिक प्रदेशाकडे निघाले. या सफरीचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते. या वेळी सफरीसाठी हेन्री ग्रिनेल यांनीच आर्थिक मदत केली होती. ८५ उ. अक्षवृत्ताच्या उत्तरेस असलेल्या खुल्या समुद्रातून उत्तर ध्रुवावर पोहोचायचे आणि उत्तर ध्रुवाभोवती खुला समुद्र असल्याचे दाखवून द्यायचे हा त्यांच्या सफरीचा प्रमुख उद्देश होता. आधीच्या सफरीतील ‘ॲडव्हान्स‘ हे गलबत जेथे थांबविले होते, त्याच्या थोडे दक्षिणेस त्यांनी आपले गलबत थांबविले. हिवाळा संपल्यानंतर १८६१ च्या वसंत ऋतूत स्लेज गाडीतून ते उत्तरेस निघाले. ८० उ. अक्षवृत्ताच्या उत्तरेस काही अंतर गेल्यावर त्यांना जो समुद्र दिसला, तो ‘खुला ध्रुवीय समुद्र’ (Open Polar Sea) असावा, असा त्यांचा समज झाला. प्रत्यक्षात तो ग्रीनलंड (Greenland) व एल्झमीअर या दोन बेटांना वेगळा करणारा केनेडी चॅनेल होता. या सफरीच्या सुरुवातीलाच त्यांचा ज्योतिर्विद मृत्यू पावल्यामुळे हेझ यांची खगोलीय निरीक्षणे चुकीची ठरली. त्यामुळे १८६१ मध्ये ते या सफरीवरून परत आले आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानच्या लष्करात वेस्ट फिलाडेल्फिया येथील सॅटर्ली आर्मी हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी आपला वैद्यक व्यवसाय सोडून काही काळ न्यूयॉर्क येथे जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू केला; मात्र त्यांच्यातली समन्वेषणाची जीद्द संपली नव्हती. या काळात त्यांनी बराच वेळ लेखन आणि व्याख्यानांवर व्यतित केला.

हेझ यांनी १८६९ मध्ये ग्रीनलंडची तिसरी सफर केली. या सफरीसाठी प्रसिद्ध चित्रकार, छायाचित्रकार आणि समन्वेषक विल्यम ब्रॅडफर्ड यांनी आर्थिक मदत दिली होती आणि स्वत: या सफरीचे छायाचित्रण व दृकचित्रण करण्याचा कार्यभार स्वीकारला होता. या सफरीत हेझ यांनी भौगोलिक, भूशास्त्रीय आणि विशेषत: हिमनदीच्या संशोधनाचे निरीक्षण करून त्यासंबंधातील लेखाजोखा प्रकाशित केला. सफरी पूर्ण केल्यानंतर व्याख्याता, वृत्तपत्र वार्ताहर, लेखन, राजकारण इत्यादींमध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. न्यूयॉर्क येथील अमेरिकन जिऑग्राफिकल सोसायटीचे ते क्रियाशील सदस्य होते. १८७५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ते न्यूयॉर्क राज्याच्या विधानसभेचे सदस्य होते. त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी सोसायटी दे जिऑग्रफी, पॅरिस आणि रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी, लंडन या संस्थानी सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला. हेझ अविवाहित होते. हेझ यांनी आपल्या लेखनांतून आर्क्टिक प्रदेशावरील प्रवासांदरम्यान आलेले अनुभव, तेथील भौगोलिक परिस्थिती तसेच काही चिकित्सालयीन निरिक्षणेही नोंदविली आहेत. त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले :ॲन आर्क्टिक बोट जर्नी (१८६०); द ओपन पोलर सी (१८६७); कोस्ट अवे इन द कोल्ड (१८६८), द लँड ऑफ डेसोलेशन (१८७१); पिक्चर ऑफ आर्क्टिक ट्रॅव्हल (१८८१).

हेझ यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

समीक्षक : अविनाश पंडित