ग्रीली, अ‍ॅडॉल्फस वॉशिंग्टन (Greely, Adolphus Washington) : ( २७ मार्च १८४४ – २० ऑक्टोबर १९३५ ). अमेरिकन लष्करी अधिकारी आणि ध्रुवीय प्रदेशाचा समन्वेषक. ग्रीली यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील न्यूबरीपोर्ट येथे झाला. वयाच्या सतराव्या वर्षी अमेरिकन यादवी युद्ध सुरू झाल्यावर लगेचच ग्रीली यांनी लष्करात प्रवेश केला. युद्धकाळात सर्वोत्तम कामगिरी करत, पदोन्नती मिळवित २७ मे १८८३ रोजी ते लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचले.

इसवी सन १८८२-८३ मधील पहिल्या आंतरराष्ट्रीय ध्रुवीय वर्षात अकरा राष्ट्रांनी मिळून वैज्ञानिक संशोधनाचा संयुक्त कार्यक्रम प्रायोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेने एल्झमिर बेटाच्या ईशान्य भागातील फोर्ट कॉन्गर येथे स्थापलेल्या तळाचे नेतृत्व ग्रीली यांच्याकडे होते. आर्क्टिक प्रदेशाकडे काढलेल्या या वैज्ञानिक संशोधन मोहिमेत त्यांनी एल्झमिर बेटाचा भूप्रदेश आणि ग्रीनलंडच्या किनाऱ्याचे सखोल समन्वेषण केले; परंतु त्यांच्या मोहिमेचा शेवट शोककारक झाला. ऑगस्ट १८८१ ते ऑगस्ट १८८३ या काळात हवामान आणि भरती-ओहोटीच्या संबंधित दररोज सुमारे पाचशे निरीक्षणे नोंदविण्यात आली. तसेच खनिजे, वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. स्लेजच्या मदतीने केलेल्या प्रवासांदरम्यान लावलेल्या शोधांमध्ये एल्झमिर बेटांच्या पश्चिम भागातील हेझन सरोवर आणि ग्रीली फ्योर्ड यांचा समावेश होता. ऑगस्ट १८८३ मध्ये मदतवाहू जहाजे त्यांच्यापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रीली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फोर्ट कॉन्गर तळ सोडून दिला. लहान बोटींच्या मदतीने त्यांचा गट दक्षिणेकडे निघाला. १५ ऑक्टोबर १८८३ रोजी, तब्बल ५१ दिवस आणि ८०५ किमी.चा प्रवास करून ते स्मिथ साउंड या सामुद्रधुनीतील बेडफर्ड पिम बेटावर पोहोचले. तेथे त्यांना सुमारे २५० दिवस अत्यंत कडक थंडीचा सामना करावा लागला. फक्त ४० दिवसांचा शिधा शिल्लक असल्याने त्यांच्यावर स्वत:चे चामड्याचे कपडे खाण्याची वेळ आली. अखेरीस २२ जून १८८४ रोजी मदतवाहू जहाज पोहोचले, तेव्हा पंचवीस सहकारी असलेल्या गटातील केवळ ग्रीली आणि इतर सहा जण जिवंत होते.

उर्वरित लष्करी सेवाकाळात ग्रीली फिलिपीन्स, अलास्का आणि इतर भागांत संप्रेषण (संदेशवहन) तारा घालण्याच्या कामात सहभागी होते. इ. स. १८८६ मध्ये ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’ने त्यांना ‘फाउंडर्स पदक’ बहाल केले. इ. स. १८८७ मध्ये मुख्य सिग्नल अधिकारी व ब्रिगेडियर जनरल म्हणून ग्रीली यांची पदोन्नती झाली. इ. स. १८८८ मध्ये त्यांनी ‘अमेरिकन जिऑग्राफिकल सोसायटी’च्या स्थापनेसाठी मदत केली. इ. स. १९२२ मध्ये ‘अमेरिकन जिऑग्राफिकल सोसायटी’चे चार्ल्स पी. डॅली पदक त्यांना मिळाले. २१ मार्च १९३५ रोजी अमेरिकन काँग्रेसने ग्रीली यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि उत्तम लष्करी सेवेसाठी सन्मान पदक बहाल केले. ग्रीली यांचे निधन अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे झाले.

ग्रीली यांनी नेतृत्व केलेल्या आर्क्टिक महासागरातील वैज्ञानिक मोहिमेमुळे कॅनडातील एल्झमिर बेटाच्या बऱ्याच भूभागाचा, तसेच वायव्य ग्रीनलंडच्या किनारी भागांचा शोध लावला. ग्रीनलंडच्या किनारी भागातील अतिउत्तरेकडील (८३° २४’ उ. अक्षवृत्त) लॉकवुड बेटावर पोहोचण्याचा तत्कालीन विक्रमदेखील ग्रीली यांनी नोंदविला. ग्रीली यांच्या प्रकाशित झालेल्या बऱ्याच पुस्तकांमध्ये थ्री इयर्स ऑफ आर्क्टिक सर्व्हिस (१८८६) आणि हँडबुक ऑफ पोलर डिस्कव्हरिज (१८९६) यांचा समावेश आहे. ग्रीली यांच्या कार्याच्या सन्मानार्थ ‘यूएसएस जनरल ए. डब्लू. ग्रीली-एपी-१४१’ या अमेरिकन मालवाहू जहाजास तसेच ‘फोर्ट ग्रीली’ या अमेरिकन लष्करी क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळास त्यांचे नाव देण्यात आले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी