कांदा वनस्पतीचे विविध भाग

कांदा या वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारचा प्रदेश असून भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत आहे. कांदा ही आवरणयुक्त कंद असलेली बहुवर्षायू वनस्पती आहे. ती लिलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅलियम केपा असे आहे. तिच्या सर्वच भागांना उग्र वास असल्यानेच तिला संस्कृत भाषेत कंदर्प
(जिच्यापासून उग्र दर्प येतो अशी) हे नाव दिले गेले असावे.

कांदा या वनस्पतीची पाने मूलज, दंडगोलाकार, पोकळ आणि रसाळ असतात. छत्रीसारख्या चामरकल्प फुलोर्‍यात अनेक पांढरी किंवा जांभळट फुले येतात. जमिनीखाली असणार्‍या कंदात आकार, रंग, जमिनीला घट्ट धरून ठेवण्याची क्षमता, वास, स्वाद, साठवणक्षमता इत्यादींबाबत विविधता आढळून येते. खोड टिकलीसारखे असून आगंतुक मुळांनी ते जमिनीमध्ये घट्ट जखडलेले असते. बोंडात ५-६, बारीक व काळ्या बिया असतात. या बियांपासून रोपे तयार करून कांद्याची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे फुले येण्यापूर्वीच हे पीक हाताने उपटून अगर लहान कुदळीने खणून काढले जाते. मात्र बीजोत्पादनासाठी आवश्यक तेवढी रोपे राखून ठेवली जातात.

कांदा मूत्रल कफोत्सारक व आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) आहे. हगवण, कावीळ, दमा, सांधेदुखी, जखमा इत्यादींवर तो गुणकारी ठऱतो, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. त्यामध्ये गंधक, साखर, कॅल्शियम, फॉस्फोरिक आम्ल, लिग्निन, अल्ब्युमीन आणि अ, ब, कगटातील जीवनसत्त्वे असतात. त्याचे सर्वसाधारण पोषणमूल्य कमी असते.

जगात कांद्याच्या सु. २००  जाती आढळतात. भारतात लागवडीखाली असणार्‍या तांबडा कांदा आणि पांढरा कांदा अशा दोन जाती आहेत. तांबडा कांदा जास्त तिखट असतो. त्याची लागवड सामान्यत: हिमाळी हंगामात, तर पांढर्‍या कांद्याची लागवड पावसाळी हंगामात करतात. कोकण भागात पांढरा कांदा हिवाळी हंगामात लावतात. इतर काही जातींचीही लागवड महाराष्ट्रात केली जाते. नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनाबाबत विशेष प्रसिद्ध आहे. तेथून कांद्याची निर्यात केली जाते.

कांद्याचे निर्जलीकरण करून त्याची पूडही करता येते. त्याच्या वापराने आहाराची रुची वाढते. तो मलोत्सारास मदत करतो. कांदा कच्चा खाल्ला जातो किंवा भाजून, शिजवून, वाळवून वा तळूनही त्याचा आहारात वापर केला जातो. त्यामध्ये असलेल्या अलिल प्रोपिल डायसल्फाइड या बाष्पनशील गंधकयुक्त रसायनामुळे त्याला तिखटपणा प्राप्‍त झालेला असतो. त्यामुळेच कच्चा कांदा कापताना अगर खाताना डोळ्यात पाणी येते. त्याचे काप लागलीच पाण्यात टाकले आणि नीट धुतले तर त्याला तिखटपणा कमी होतो. त्याचे लोणचेही केले जाते.