विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो. या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. बहुधा त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.

लहान मुलांमध्ये गजकर्ण होण्याचे प्रमाण अधिक असते. गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो. स्नानगृह, तरणतलाव, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. प्राण्यांमध्येदेखील गजकर्ण आढळतो. कोंबड्या, ससे, गायी, मांजरे, कुत्रे, घोडे इ. प्राण्यांत हा रोग दिसून येतो. मात्र या प्राण्यांच्या पिल्लांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. या प्राण्यांच्या संपर्कामुळेही हा रोग लहान मुलांमध्ये पसरू शकतो.

संसर्ग झालेल्या कवकाच्या प्रकारानुसार गजकर्णावर इलाज केले जातात. कोणत्या प्रकारचा कवक आहे हे सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास कवक संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.

सॅलिसिलिक आम्ल, बेंझॉइक आम्ल, रिसॉर्सिन, अ‍ॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे, तसेच काही शॅम्पूंमध्ये असणारे पायरिथिऑन झिंक हे रसायन गजकर्णावर गुणकारी आहेत. संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे पोटात घ्यावी लागतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा