एक काटेरी वनस्पती. बाभूळ हे झुडूप किंवा हा लहान वृक्ष फॅबेसी कुलाच्या मिमोजॉइडी उपकुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव ॲकेशिया निलोटिका आहे. लाजाळू, शिरीष, वर्षा वृक्ष व खैर या वनस्पतीही याच कुलातील आहेत. बाभूळ वृक्ष मूळचा आफ्रिकेतील आणि भारतीय उपखंडातील आहे. ईजिप्त, म्यानमार व ऑस्ट्रेलिया या देशांतही तो आढळतो. भारतात तो सर्वत्र मोठ्या संख्येने वाढलेला दिसून येतो.

बाभूळ (ॲकेशिया निलोटिका): (१) वनस्पती, (२) फुलोरे, (३) काटे, (४) शेंगा, (५) डिंक

बाभूळ हा काटेरी वृक्ष ५–२० मी. उंच वाढतो. तो अतिशय कणखर असतो. खोडाची साल गडद तपकिरी किंवा जवळपास काळी, जाड व टणक असून कमी-अधिक भेगाळलेली असते. या वृक्षाला अनेक शाखा फुटलेल्या असतात. पाने संयुक्त व एकाआड एक असून ती अनेक लहान पर्णिकांची बनलेली असतात. प्रत्येक पानाच्या तळाला दोन, १–५ सेंमी. लांबीचे, पांढरट, अतिशय टोकदार, तळाशी पोकळ व टोकाशी कठीण काटे असतात. पावसाळ्यात या वनस्पतीला असंख्य, लहानलहान, पिवळे व गोटीसारखे  फुलोरे येतात आणि झाड फुलांनी बहरून जाते. प्रत्येक फुलोऱ्यात १०–२० सूक्ष्म फुले असतात. फुले येण्याचा हंगाम हिवाळ्यातही चालू राहतो. हिवाळ्यात शेंगा धरतात आणि त्या उन्हाळ्यापर्यंत झाडावर दिसतात. शेंग पांढरट, पिवळसर व माळेसारखी असून तिच्यात ८–१२,  अगदी लहान व चपट्या बिया असतात. बियांपासून रोपे सहज तयार होत असल्यामुळे लागवड न करताही हा वृक्ष वाढतो.

बाभूळ ही भारतातील सर्वांत महत्त्वाच्या व उपयुक्त वनस्पतींपैकी एक आहे. तिचे अनेक उपयोग आहेत. या वृक्षाचे लाकूड खूप कठीण आणि टिकाऊ असते. त्यापासून अवजारांच्या मुठी व नावेच्या वल्ही तयार करतात. जळाऊ लाकूड म्हणून ते उपयुक्त असते. सालीचा आणि शेंगांचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, काळा रंग आणि शाई बनविण्यासाठी होतो. बाभळीचा डिंक चिकटगोंद म्हणून वापरला जातो. तो पौष्टिक असून डिंकाचे लाडू करण्यासाठीही वापरला जातो. साल, पाने, फुले, शेंगा आणि खोड यांपासून मिळणारे डिंक औषधी आहेत. भारतात आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागात बाभळीच्या कोवळ्या फांद्या दात घासायला वापरतात; त्यामुळे हिरड्या आणि दात बळकट होतात. कोवळा पाला व शेंगा शेळ्यामेंढ्यांना चारा म्हणून देतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा