काकडीचा वेल व फळे

काकडी (खिरा) ही एक फळभाजी असून तिची वेल असते. कुकर्बिटेसी कुलातील या वेलीचे शास्त्रीय नाव कुकुमिस सटिव्हस आहे. ही वनस्पती मूळची भारतातील आहे. भारतात तिची लागवड साधारणपणे ३,००० वर्षांपूर्वीपासून होत आहे. आशिया, यूरोप व उत्तर अमेरिकेतही ही वनस्पती आढळते. यूरोपातही प्राचीन काळापासून तिची लागवड होत आहे. उत्तर अमेरिकेत ती सोळाव्या शतकात पोहोचल्याचा उल्लेख आढळतो.

काकडीच्या सरपटत वाढणार्‍या वेलीच्या खोडावर कोवळे रोम असतात. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती व ३ ते ५ खंडांत विभागलेली असून पानांच्या वरच्या व खालच्या बाजूला रोम असतात. एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले अशी दोन प्रकारची फुले येतात. नरफुले झुपक्याने येतात. मादीफुले एकेकटी, तळाला फुगीर आणि केसांनी आच्छादलेली असतात. नरफुले प्रथम उमलतात, तर मादीफुले नंतर उमलतात. फळे दंडगोलाकार, रसाळ, विविध आकारांची व आकारमानांची असतात. बिया पांढर्‍या, गुळगुळीत असून त्यांचे बाह्यकवच कठिण असते.

काकडी वनस्पतीला उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. लागवडीनंतर साधारणत: ३५ ते ४० दिवसांनी फळे धरू लागतात. फळांचा रंग हिरवा असतानाच ती तोडावी लागतात. काकडीत कार्बोदकाचे प्रमाण जास्त असते. तसेच काकडीपासून  आणि जीवनसत्त्वांबरोबर लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि इतर काही खनिजे मिळतात. तिच्या बिया शीतल व पौष्टिक असतात. मगज दाहनाशी असतो.

काकडीत सु. ९६ %  पाण्याचा अंश असल्याने प्रामुख्याने उन्हाळ्यात तिचे सेवन करतात. लोणची, कायरस आणि कोशिंबीर यांमध्ये तिचा उपयोग करतात. मावळी काकडी, पुणे-खिरा, पनवेल काकडी, शीतल, प्रिया, तार काकडी, पुसासंयोग इ. काकडीचे काही प्रकार आहेत.