अँफिऑक्सस

अँफिऑक्सस किंवा लॅन्सलेट हा आद्य समपृष्ठरज्जू प्राण्यांचा एक गट आहे. उपसमशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांतील समुद्राच्या उथळ पाण्यात व वाळूत ते सापडतात. यातील सामान्यपणे आढळणार्‍या एका जातीचे शास्त्रीय नाव ब्रांकिओस्टोमा लॅन्सिओलॅटम असे आहे. आशिया खंडात पाळलेल्या प्राण्यांसाठी अन्न म्हणून व्यापारी स्तरावर त्यांचे उत्पादन करतात. पृष्ठवंशी प्राणी कसे उत्क्रांत झाले हे समजून घेण्यासाठी जीवसृष्टीच्या अभ्यासात अँफिऑक्सस महत्त्वाचे आहेत. ते लहान माशासारखे दिसतात.

अँफिऑक्ससची लांबी ५-८ सेंमी. असते. याला स्वतंत्र मेंदू नसतो. मात्र पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे पाठीच्या भागात चेतारज्जू असून तो शेपटीपर्यंत पसरलेला असतो. तसेच पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे स्नायूंची संरचना खंडमय असते. श्वसनासाठी लांब ग्रसनी असून तिला अनेक कल्ले (फटी) तसेच अन्ननलिका, रक्ताभिसरण संस्था आणि जननग्रंथी असतात. मात्र पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. चेतारज्जूला आधार देण्यासाठी तसेच त्याचे संरक्षण करण्यासाठी पृष्ठरज्जू (नोटोकॉर्ड) असतो. हा पेशींनी बनलेला असून दंडगोल पेशी जवळजवळ असल्याने मजबूत दांड्याप्रमाणे असतो. पृष्ठरज्जूची वाढ थेट डोक्यात पोहोचलेली असते म्हणून या गटाला सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ (सेफॅलो-डोक्याशी संबंधित) असे म्हणतात. अपृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे अँफिऑक्सस तोंडाद्वारे पाणी शरीरात घेतात. तोंडात करवतीप्रमाणे लहान दातांची कतार असते. पाण्यातून अन्न (लहान प्राणी व प्लवक) पोटात जाते. त्यावर विकरांद्वारे प्रक्रिया होऊन अन्नपचन होते. अँफिऑक्ससला हृदय नसते, तसेच डोळे व कान नसतात पृष्ठवंशीय प्राण्यांप्रमाणे विकसित झालेल्या डोळ्यांची जनुके मात्र या प्राण्यात अविकसित स्वरूपात आढळली आहेत. शरीराच्या दोन्ही अंगाला असलेल्या स्नायुखंडाचा उपयोग पोहोण्यासाठी होतो. अँफिऑक्सस रात्री आणि प्रजननकाळात खूप वेगाने पोहतो. दिवसा मात्र तो वाळूत बिळ करून राहतो, परंतु तोंडाकडचे टोक नेहमी वाळूच्या वर पाण्यात असते.

अँफिऑक्सस नर आणि मादी सारखेच दिसतात. केवळ त्यांच्या जननग्रंथी वेगवेगळ्या असतात. समशीतोष्ण कटिबंधातील हे प्राणी अनेकदा, तर उष्ण कटिबंधातील वर्षांतून एकदा प्रजनन करतात. नर व मादीच्या युग्मकांचे शरीराबाहेर पाण्यात फलन होते. दोन दिवसांत डिंभ तयार होऊन हळूहळू त्याची वाढ होते. डिंभ लाटांबरोबर वाहत जाऊन नंतर त्याचे प्रौढात रूपांतर होते.

च्या अभ्यासात अँफिऑक्सस महत्त्वाचे आहेत. ते लहान माशासारखे दिसतात.