कण्याचे आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करणारे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील इंद्रिय. मनुष्याच्या आणि इतर बहुतांशी सस्तन प्राण्यांमध्ये कानाचे बाह्य, मध्य आणि आंतरकर्ण असे तीन भाग पुढीलप्रमाणे पडतात.

कानाची आंतररचना

बाह्यकर्ण

हा कानाची पाळी आणि तीपासून मधल्या कानापर्यंत जाणारा नलिकेसारखा मार्ग या दोन्हींनी बनलेला असतो. यालाच सामान्यपणे कान असे म्हणतात. कानाची पाळी हा डोक्याच्या त्वचेचा बाहेर आलेला भाग असून तो लवचिक कास्थींचा बनलेला असतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज, नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे, मधल्या कानापर्यंत पोहोचतात.

मध्यकर्ण 

हा हवेने भरलेली जागा असून त्याच्या आतील टोकाला एक लंबगोल पडदा उभट आणि तिरकस असतो. ह्यालाच कानाचा पडदा किंवा कर्णपटल असे म्हणतात. या पडद्यामुळे कानाच्या बाहेरचा भाग आतील कानापासून वेगळा होत असून हा पडदा कर्णनलिकेने ग्रसनीला जोडलेला असतो. या रचनेमुळे कर्णपटलाच्या दोन्ही बाजूंकडील दाबांत समतोल राहतो. कर्णनलिका एखाद्या कारणाने (उदा., पडसे, दडा बसणे) बंद झाली तर कान दुखू लागतो व नीट ऐकू येत नाही; कारण कर्णपटलाच्या दोन्ही बाजूंच्या दाबांत असमतोल होतो. विमान प्रवासात हा अनुभव अनेक वेळा येतो. अशा वेळी नाक व तोंड बंद करून श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न केल्यास, ग्रसनीकर्णनलिका उघडून हवा आत शिरते आणि नीट ऐकू येऊ लागते. कर्णपटलाच्या वरील बाजूचा भाग खालच्या बाजूपेक्षा थोडासा रुंद असतो. बाहेरून येणार्‍या ध्वनिलहरी या पडद्यावर आदळतात, त्यामुळे कर्णपटल कंप पावते.

आंतरकर्ण 

याची रचना गुंतागुंतीची असते. कर्णपटलाच्या आतील बाजूस त्याला लागून तीन लहान हाडांची (श्रवण अस्थिकांची) साखळी असते. यातील पहिले हाड हातोडीच्या आकाराचे, दुसरे ऐरणीसारखे तर तिसरे रिकिबीप्रमाणे असते. शेवटच्या रिकिबीसारख्या हाडाला गोगलगायीच्या शंखाच्या आकारासारखा एक अवयव जोडलेला असतो. या अवयवाला कर्णावर्त असे म्हणतात. हे सारे भाग मिळून आंतरकर्ण तयार होतो. हातोडीसारख्या हाडापासून ते शंखाकृती कर्णावर्तापर्यंतचे हे सर्व भाग एका विशिष्ट द्रवात बुडलेले असतात.

मनुष्य आणि प्रगत पृष्ठवंशी प्राणी सारख्याच प्रकारे ऐकतात, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. हवेतील कंपनांचे संक्रमण कर्णावर्तातील द्रव माध्यमात होण्यासाठी कानामध्ये अनुकूलन घडून आले आहे. कानाच्या पाळीतून, श्रवणनालातून ध्वनिलहरी कर्णपटलापर्यंत पोहोचतात आणि कर्णपटल कंप पावते. ही कंपने श्रवण अस्थिकांद्वारे कर्णावर्तांच्या आत असलेल्या द्रवात पोहोचतात. कर्णावर्ताच्या आतील बाजूला असलेल्या कर्णावर्तपटलावर या कंपनांमुळे लहरी निर्माण होतात. या पटलावर केसांप्रमाणे दिसणार्‍या २०,००० हून जास्त रोमपेशींचे (संवेदनापेशींचे) जाळे असते. या रोमपेशी ध्वनिग्राही असतात. त्यांच्या जाळ्याने ग्रहण केलेल्या ध्वनिलहरींचे विद्युत् लहरींमध्ये रूपांतर होऊन श्रवण चेतांद्वारे त्या मेंदूकडे पाठविल्या जातात. आवाजातील उच्च-नीचता ओळखण्याची क्षमता रोमपेशींच्या उत्तेजित होण्यावर अवलंबून असते. कमी वारंवारतेमुळे कर्णावर्ताच्या वरच्या भागातील पेशी उत्तेजित होतात, तर जास्त वारंवारतेमुळे कर्णावर्ताच्या तळाच्या भागातील पेशी उत्तेजित होतात. तसेच कर्णावर्त पटलाच्या प्रत्येक भागापासून निघणार्‍या विद्युत् लहरी मेंदूतील श्रवणकेंद्राच्या एकमेकांपासून थोड्या वेगवेगळ्या भागांत पोहोचतात. तेथे त्या लहरींचे विश्लेषण होऊन त्यांची संगती लावली जाते. मोठ्या व कर्णकर्कश आवाजामुळे रोमपेशी तीव्रपणे उत्तेजित होतात. परिणामी मेंदूकडे कमी वेळात जास्त विद्युत् लहरी पोहोचतात. लहरीच्या या वाढलेल्या संक्रमणाचा अर्थ आवाजाची तीव्रता असा लावला जातो. डाव्या व उजव्या दोन्ही कानांकडून श्रवण चेतांद्वारा मेंदूच्या श्रवणकेंद्रांकडे संदेश जातात. मनुष्य ३० ते २०,००० हटर्झपर्यंत वारंवारता असलेल्या ध्वनिलहरी ऐकू शकतो. कुत्र्याला मात्र ३०,००० हटर्झपर्यंतच्या ध्वनिलहरी ऐकू येतात.

अनेक अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ऐकण्यासाठी आणि तोल सांभाळण्यासाठी कानांऐवजी खास ज्ञानेंद्रिये असतात. उदा., क्रिकेट कीटक आणि कोळी यांच्या पायांवर ऐकण्यासाठी खास पडदा असतो. पतंगाच्या वक्षावर प्राथमिक स्वरूपाचे कर्णेंद्रिय असते. या इंद्रियामुळे त्यांना वटवाघळाच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळते. अशा प्राण्यांमध्ये कान या इंद्रियाचा विकास कमी-अधिक प्रमाणात झालेला आढळतो. माशांमध्ये बाह्यकर्ण किंवा मध्यकर्ण हे नसतात; त्यांच्या आंतरकर्णात कर्णावर्तही नसते. या आंतरकर्णाचा उपयोग मुख्यत: तोल सांभाळण्यासाठी होतो. उभयचर प्राण्यांमध्ये मध्यकर्णांची पोकळी असते. त्यात एक पातळ पटल असून ते कानाच्या पडद्यासारखे कार्य करते. कानांची पाळी फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळते.

शरीराच्या अवस्थेत कोणताही बदल झाला तरी कर्णावर्तात असलेल्या ‘प्रघाण अंग’ या अवयवामुळे मेंदूला संदेश मिळतो. हे संदेश प्रघाण अंगातून निघणार्‍या प्रघाण चेताद्वारे मेंदूकडे पोहोचतात. त्यांच्यामुळे स्नायूंच्या हालचाली योग्य रीतीने होऊन शरीर मूळ स्थितीत येते. शरीराचा तोल सांभाळण्यासाठी कान हे इंद्रिय प्रथम निर्माण झाले. ते सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये थोड्याफार फरकाने आढळते. प्रगत पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ऐकू येईल असे इंद्रिय नंतर निर्माण झाले.