(ट्युबरक्युलॉसिस). एक संसर्गजन्य रोग. प्राचीन काळापासून मनुष्याला क्षयरोग होत असल्याचे म्हटले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्ट‍िरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो. क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होतो. मात्र एका विशिष्ट क्षयरोगामुळे फुप्फुसे बाधित होतात, तो क्षयरोग तीव्र समजतात. तीव्र क्षयरोगाच्या रुग्णाच्या थुंकीतून, बोलण्यातून अथवा शिंकण्यातून क्षयरोगाचे सूक्ष्मजीव हवेत पसरतात आणि या रोगाचा प्रसार होतो. अनेकदा क्षयरोगाचा संसर्ग झालेला असला, तरी लक्षणे दिसून येत नाहीत. असा क्षयरोग सुप्त समजतात; सुप्त क्षयरोग असलेल्या व्यक्ती संसर्गजन्य नसतात. सुप्त क्षयरोग असलेल्या व्यक्तींपैकी सु. १०% व्यक्तींना तीव्र क्षयरोग होऊ शकतो आणि त्यांतील अर्धे रुग्ण मृत्युमुखी पडतात.

सद्यस्थितीला जगाच्या लोकसंख्येपैकी २५% लोकसंख्या क्षयरोगाच्या संसर्गाने बाधित असावी, असे मानतात. २०१६ मध्ये जगातील १ कोटी रुग्ण तीव्र क्षयरोगाचे आढळले आणि त्यांपैकी सु. १३ लाख रुग्ण मरण पावले. मरण पावलेल्या सु. १३ लाख रुग्णांपैकी सु. ९५% पेक्षा अधिक रुग्ण विकसनशील देशांतील होते आणि त्यांपैकी सु. ५०% रुग्ण भारत, चीन, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांतील होते.

तीव्र क्षयरोगामुळे मुख्यत: फुप्फुसे बाधित होतात, तसेच अशक्तपणा जाणवणे, छातीत दुखणे, वजन घटणे, रात्रीचा घाम येणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात. रोगाची तीव्रता वाढत गेली की, सकाळी खोकल्याबरोबर कफ (बेडका) बाहेर पडू लागतो. काही वेळा थुंकीतून बाहेर पडलेल्या बेडक्यांमध्ये रक्त असते.

१५–२०% क्षयरोग्यांच्या बाबतीत, काही वेळा फुप्फुसांच्या क्षयरोगाचा संसर्ग फुप्फुसबाह्य इंद्रियांना होतो. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक्षमता दुबळी असते, अशा व्यक्तींमध्ये किंवा लहान मुलांमध्ये फुप्फुसबाह्य क्षयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुप्फुसावरण, मध्यवर्ती चेतासंस्था, लसीका संस्था, हाडे आणि सांधे इत्यादी इंद्रिये बाधित होतात. एडस्‌बाधित सु. ५०% रुग्णांमध्ये असा क्षयरोग आढळून येतो. फुप्फुसावरणाचा दाह होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत संसर्ग झाल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो.

मा. ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंची वाढ हळू होते, म्हणजे दर १६ ते २० तासांनी त्यांची संख्या दुप्पट होते; अन्य जीवाणूंची संख्या एका तासात दुप्पट होते. मा. ट्युबरक्युलॉसिस जीवाणूंचे बाह्यावरण दुहेरी मेदयुक्त पदार्थांचे असते. त्यामुळे ग्रॅम पॉझिटिव्ह चाचणीत त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही. थुंकीच्या नमुन्यावर योग्य रंजकद्रव्यांचा वापर करून हे जीवाणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात. याकरिता झील–नील्सन रंजकद्रव्य सामान्यपणे वापरतात. क्षयरोगाच्या जीवाणूंवर काही विशिष्ट रंजकद्रव्याचा रंग आम्ल माध्यमात टिकून राहत असल्याने त्यांचे वर्णन ‘ॲसिड–फास्ट’ असेही करतात. मा. ट्युबरक्युलॉसिस या जीवाणूंखेरीज मा. बोवीस, मा. मायक्रोटी, मा. आफ्रिकानम, मा. कॅनेटी या जीवाणूंमुळेदेखील क्षयरोग होतो. त्यांपैकी मा. आफ्रिकानम आणि मा. कॅनेटी जीवाणूंचा प्रभाव आफ्रिकेत दिसून येतो. अन्य दोन जीवाणूंचा प्रसार मर्यादित आहे किंवा त्यांचे उच्चाटन झाले आहे, असे म्हणता येईल.

क्षयरोगाचा संसर्ग इतर लोकांना होण्यामागे विविध घटक कारणीभूत असतात. क्षयरोगाच्या रुग्णांपैकी सु. १३% रुग्णांना एड्सची बाधा होते; आफ्रिका खंडात जेथे एड्सचे प्रमाण उच्च आहे, तेथे हे दिसून येते. याउलट ज्या व्यक्ती एड्‌सग्रस्त आहेत, त्यांतील सु. ३०% जणांना तीव्र क्षयरोग झाल्याचे आढळले आहे. दाटीवाटीची वस्ती आणि कुपोषण याही बाबी क्षयरोगाशी निगडीत असतात. मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती, तुरुंगातील कैदी, बेघर मजूर, वैद्यकीय सुविधांचा अभाव असलेल्या वसत्यांमधील लोक, क्षयरोगाच्या सान्निध्यात राहणारी बालके तसेच वैद्यक व परिचारक इत्यादी क्षयरोगाला बळी पडू शकतात. सिलिकामयता (सिलिकॉसिस), धूम्रपान, मद्यपान, मधुमेह यांमुळे क्षयरोग होण्याची शक्यता वाढते.

क्षयरोगाचा प्रसार

तीव्र क्षयरोगाच्या रुग्णांच्या बोलण्यातून अथवा शिंकांतून, तोंडावाटे बाहेर पडलेल्या द्रवाच्या सूक्ष्मथेंबांमुळे या रोगाचा प्रसार होतो. या सूक्ष्म थेंबांचा (एरोसॉल) आकार ०.५–५ मायक्रोमीटर असतो. एका शिंकेतून ४०,००० ते ५०,००० सूक्ष्म थेंब हवेत फेकले जातात. हे सूक्ष्म थेंब क्षयरोग फैलावू शकतात; कारण १० पेक्षाही कमी क्षयरोगाचे जीवाणू क्षयरोगाचा संसर्ग करण्यासाठी पुरेसे असतात.

ज्या व्यक्ती क्षयरुग्णाच्या संपर्कात दीर्घकाळ, वारंवार किंवा नजीकच्या संपर्कात असतात, त्यांना क्षयरोगाची लागण होण्याची जास्त शक्यता असते. तीव्र क्षयरोग झालेल्या रुग्णाने जर उपचार किंवा औषधे सुरू केलेले नसतील तर त्या रुग्णापासून १०–१५ जणांना क्षयरोग होऊ शकतो. क्षयरोगाच्या प्रसाराची शक्यता निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. जसे क्षयरोगाच्या रुग्णाद्वारे बाहेर पडलेल्या संसर्गजन्य सूक्ष्मथेंबांची संख्या, क्षयरोग्यासोबतचा संपर्काचा कालावधी, खेळती हवा, जीवाणूंची ताकद किंवा कमकुवतपणा, निरोगी व्यक्तीची रोगप्रतिकारक्षमता इत्यादी.

क्षयरोगाचे जीवाणू फुप्फुसातील वायुकोशात शिरतात, तेव्हा फुप्फुसातील बृहतभक्षी पेशी (पांढऱ्या पेशी) त्यांचा नाश करतात; परंतु प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास फुप्फुसातील वायुकोशात बृहतभक्षी पेशींद्वारे ते वेढले जातात. अशा स्थितीत हे जीवाणू दीर्घकाळ राहू शकतात. काही कारणांनी कुपोषण, एड्स, दीर्घकाळ स्टेरॉइडांचे सेवन अथवा उतारवय यांमुळे किंवा रोगप्रतिकारकक्षमता कमी झाल्यास हे जीवाणू सक्रिय होतात आणि आजूबाजूच्या ऊतींचा नाश करतात किंवा रक्तावाटे शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.

क्षयरोगाच्या उपचारासाठी आता प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. क्षयरोगावर एकाच वेळी अनेक प्रतिजैविके दिली जातात आणि ही औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात. क्षयरोगावर रिफॅम्पीन, आयसोनियाझाइड, पायरॅझिनामाइड, इथँब्युटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही प्रतिजैविके देतात. त्यांपैकी दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे किमान सहा महिने घ्यावी लागतात. औषधे वेळच्या वेळी घेतल्यास पहिल्या एक ते दीड महिन्याच्या उपचाराने रुग्णाला चांगला गुण येतो; खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, तसेच ताप येणे बंद होते. लक्षणे बंद झाल्यावर औषधे थांबवली, तर क्षयरोगाचे जीवाणू पुढील उपचारांना दाद देत नाहीत. म्हणून क्षयरोगावरचे उपचार अर्धवट सोडू नयेत. असे केल्याने क्षयरोगाच्या नवीन जीवाणूंचा शिरकाव होतो आणि औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा प्रतिरोधी (रेझिस्टंट) क्षयरोग होऊ शकतो.

क्षयरोगाचे जीवाणू काही काळाने एकाच प्रकारच्या औषधांना दाद देत नाहीत. अशा वेळी औषधांची निष्प्रभता तसेच दुष्परिणाम टाळण्याकरिता एका वेळी किमान दोन औषधे देतात किंवा औषधांची मिश्रणे बदलतात. म्हणून सुरुवातीला ४–५ औषधे व गरज पडल्यास ७–८ औषधे रुग्णाला दिली जातात.

क्षयरोगाचे रुग्ण अनेकदा औषधोपचार पूर्ण होण्याआधी औषधे थांबवितात किंवा सूचनांचे नीट पालन करत नाहीत. याकरिता १९९३ पासून डॉट्स (डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रिटमेंट सिस्टम – DOTS) या नावाने एक उपचारपद्धती अंमलात आणण्यात आली आहे. या उपचारपद्धतीत रुग्णांनी दररोज किंवा गरजेनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समोर औषधे घ्यावीत, हे अपेक्षित आहे. या उपचार पद्धतीत क्षयरोगाच्या रुग्णाचे नियमित निरीक्षण करून औषधे दिली जात असल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाण वाढले आहे.

क्षयरोग संसर्गजन्य असल्याची माहिती १८८० मध्ये वैज्ञानिकांना झाली. त्या काळात क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी क्षयरोगाच्या रुग्णांना अलिप्त आणि बंदिस्त जागेत ठेवावे, या कल्पनेतून आरोग्यधाम (सॅनिटोरियम) अस्तित्वात आले. १८८२ मध्ये रॉबर्ट कॉख या जर्मन वैज्ञानिकांनी क्षयरोगाच्या जंतूंचा शोध लावला. या शोधासाठी १९०५ मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. ॲल्बर्ट काल्मेट आणि कॅमिल गेरँ या दोन संशोधकांनी बीसीजी (Bacillus of Calmette and Guerin) ही लस शोधून काढली. १९२१ मध्ये या लशीचा पहिल्यांदा वापर फ्रान्समध्ये केला गेला. १९४६ मध्ये स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकाचा शोध लागल्यावर क्षयरोगावर अचूक उपचार करणे शक्य झाले. याशिवाय नवनवीन औषधांच्या निर्मितींमुळे सर्वसामान्यांना क्षयरोगावर उपचार परवडू लागले. मांटू चाचणीमुळे, क्ष–किरण तपासणीमुळे आणि एकंदरीत वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या पॉलिमरेज शृंखला विक्रियेमुळे (Polymerase Chain Reaction, PCR) क्षयरोगाचे निदान आजाराच्या सुरुवातीला करणे शक्य झाले आहे.

घरात, कामाच्या ठिकाणी किंवा गर्दीत वावरणारे क्षयग्रस्त रुग्ण हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठी जोखीम असते. परंतु, क्षयरोगाच्या रुग्णाने इतरांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. क्षयरोगाचा प्रसार टाळण्यासाठी खोकला आल्यास किंवा शिंक आल्यास त्याने तोंडावर अथवा नाकासमोर रुमाल धरणे, गरजेचे असते. तसेच कुठेही आणि कधीही न थुंकणे यांसारख्या बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी निदान झाल्यास आणि नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाचे निर्मूलन होण्यासाठी अनेक देश प्रयत्न करीत असून २००० सालापासून दरवर्षी क्षयरुग्णांचे प्रमाण कमीकमी होत झाल्याचे दिसून येत आहे.