एक लहान, शेंगा येणारे झुडूप. टाकळा ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना तोरा किंवा कॅसिया तोरा आहे. ती मूळची आशियातील असून उष्ण प्रदेशातील सर्व देशांमध्ये आढळते. भारतात उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांत ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसेच पावसाळ्यात पडीक जागी ती रस्त्याच्या कडेला तण म्हणून सर्वत्र वाढते. या वनस्पतीला नकोसा वाटणारा गंध असल्यामुळे तिच्या इंग्रजी नावात फिटीड (दुर्गंधी) असा उल्लेख केला आहे.

टाकळ्याची पाने व फुले

टाकळा १ मी. पर्यंत उंच वाढते. पाने संयुक्त, एकाआड एक, पिसांसारखी आणि सु. १० सेंमी. लांब असतात. प्रत्येक पानात पर्णिकांच्या चार जोड्या असतात. पर्णिकेतील खालची जोडी लहान व टोकाकडची जोडी मोठी असते. फुले लहान व पिवळी असून पानांच्या बगलेत येतात. फुलांना पाच पाकळ्या असून त्यातील एक खंडित तर इतर चार अखंड असतात. शेंगा लांब, लवचिक आणि पातळ असतात. त्यात २५–३० बिया असतात. फुले पावसाळ्यात तर फळे हिवाळ्यात येतात.

टाकळ्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात. पाने सौम्य रेचक, कृमिनाशक आहेत. भाजलेल्या बियांची पूड करून ती कॉफी म्हणून पितात. बिया उगाळून नायटा, त्वचादाह आणि त्वचेच्या अन्य रोगांवर लावतात.

ज्या वनस्पतीला रानटाकळा म्हणतात तीही सेना प्रजातीतील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव सेना सोफेरा आहे. २.५–३.५ मी. उंचीचे हे शिंबावंत झुडूप उष्ण प्रदेशात व भारतात सामान्यपणे पडीक व नापीक जागी पावसाळ्यात आढळते. ते वर्षायू किंवा बहुवर्षायू असून त्याची सामान्य लक्षणे आणि उपयोग टाकळ्याप्रमाणे आहेत.