(ॲसोसिएशन इन लिव्हिंग ऑरगॅनिझम). दोन सजीवांमध्ये असलेल्या परस्परसंबंधांना सजीवांमधील साहचर्य म्हणतात. निसर्गात कोणताही सजीव एकटा राहू शकत नाही. प्रत्येक सजीवाचे इतर सजीवांबरोबर आणि परिस्थितीबरोबर साहचर्य घडून आलेले असते. सजीवांमधील साहचर्य वेगवेगळ्या स्वरूपाचे असते आणि ते दोन प्राणी, दोन वनस्पती, प्राणी आणि वनस्पती, वनस्पती आणि कवक, प्राणी आणि प्रोटिस्टा, प्राणी आणि जीवाणू, वनस्पती आणि जीवाणू यांच्यात आढळून येते. साहचर्य सजीवांच्या एकाच जातीत किंवा विभिन्न जातींमध्येही असू शकते. साहचर्यामध्ये दोन भिन्न सजीव एकमेकांच्या सान्निध्यात परस्परांना पूरक असे जीवन जगत असतात. साहचर्यामुळे काही वेळा दोघांनाही फायदा होतो, तर काही वेळा एकामुळे दुसऱ्याचे नुकसान ‍होते. सजीवांचे साहचर्य विविध प्रकारांचे असते आणि ते वैचित्र्यपूर्ण असते. सजीवांत एकमेकांमध्ये साहचर्य असणे निसर्गासाठी गरजेचे असते. या साहचर्यामुळे सजीवांचे अस्तित्व टिकून राहते.

(१) सहवासविच्छेद : या प्रकारात दोन सजीव, जसे प्राणी आणि वनस्पती एकत्र असतात. परंतु एका सजीवाचा त्रास दुसऱ्या सजीवाला होतो. बहुधा असे साहचर्य वनस्पती आणि चरणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसून येते. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या असे शाकाहारी प्राणी गवतावर जगतात. पण गवत चरताचरता काही वेळा ते सगळे गवत खातात आणि गवताचा समूळ नाश करतात. तसेच ते प्राणी चरताना त्यांच्या खुरांना गवताचा कसलाही त्रास होत नाही. मात्र प्राणी गवत चरताना त्यांच्या खुरांनी गवत तुडविले जाऊन ते गवत मरून जाते.

(२) शोषण : या प्रकारच्या साहचर्यात एक सजीव दुसऱ्या सजीवावर वर्चस्व प्रस्थापित करतो, साहचर्याचा गैरफायदा घेतो आणि दुसऱ्या सजीवाचे शोषण करतो. उदा., ॲमेझॉन मुंग्या तपकिरी मुंग्यांना (फॉर्मिका फस्का) गुलामाप्रमाणे राबवितात आणि त्यांच्याकडून कामे करून घेतात. मेलिया टेसेलेटा या जातीचे खेकडे आपल्या मोठ्या नांग्यांमध्ये समुद्रपुष्पे धरून ठेवतात आणि स्वत:ला संरक्षण मिळवितात. त्यामुळे समुद्रपुष्पाचा काही वेळा नाश होतो. यकृतपर्णासारखा कृमी मेंढीच्या पित्तनलिकेत राहतो आणि मेंढीला रोगकारक ठरतो. पट्टकृमी माणसाच्या लहान आतड्यात राहतो, माणसाने पचविलेल्या अन्नावर वाढतो आणि माणसाला कुपोषित करतो. काही गोलकृमी वनस्पतींमध्ये वाढतात आणि वनस्पतींना हानी पोहोचवितात. आंबा, कडूनिंब या मोठ्या झाडांच्या फांद्यावर वाढणारे ‘बांडगूळ’, कण्हेर, मेंदी यावर वाढणारी ‘अमरवेल’, तंबाखूच्या मुळांवर वाढणारा बंबाखू, गव्हावर वाढणारा तांबेरा अशा साहचर्याच्या प्रकारांत एका वनस्पतीवर म्हणजे आश्रयी वनस्पतीवर, दुसरी वेगळी वनस्पती सतत चिकटून राहते, आश्रयी वनस्पतींपासून अन्नरस शोषून घेते आणि तिचे नुकसान करते. याप्रमाणेच परजीवी जीवाणूंमुळे वनस्पतींची पाने गळून पडतात, वनस्पती कुजते आणि मरून जाते. ही सर्व उदाहरणे ‘परजीवी जीवोपजीवन’ साहचर्याची आहेत. सामान्यपणे या प्रकारात एका सजीवाचे शोषण होते, तर दुसऱ्याचे पोषण होते.

(३) उदासीनता : हे साहचर्य ‘परजीवी’ अथवा ‘शोषण’ प्रकारांपेक्षा भिन्न आहे. अपिवनस्पती आश्रयी वनस्पतींवर प्रचंड संख्येने वाढतात. घनदाट वनात मोठ्या वृक्षांच्या फांद्यावर नेचे, शैवाक, शेवाळी, अननस यांच्या काही जाती वाढतात. त्यांची प्रचंड वाढ झाल्याने, तसेच त्यांनी आश्रयी वनस्पतींपासून पाणी, क्षार शोषल्याने आश्रयी वनस्पतींच्या फांद्या मोडण्यापलिकडे त्यांचे फारसे नुकसान होत नाही. असे साहचर्य उदासीन आहे, असे मानतात. कासवाच्या पाठीवर शैवाल वाढते. हे साहचर्य उदासीनच असते. या प्रकारात दोन सजीवांमध्ये जरी परस्परसंबंध असले, तरी एकमेकांचे नुकसान होत नाही.

(४) सुविधा : यात एका सजीवाला दुसऱ्या सजीवापासून सुविधा उपलब्ध होते. मात्र दुसऱ्या सजीवाला काहीही त्रास होत नाही किंवा त्याचे नुकसान ‍होत नाही. उदा., फायरॅस्फर हा मासा स्वत:च्या रक्षणासाठी समुद्रकाकडीच्या गुदद्वारांतून शरीरात शिरतो, तेथे काही काळ थांबतो आणि पुन्हा बाहेर पडतो. त्यामुळे त्याला संरक्षण ‍मिळते. मात्र त्यामुळे समुद्रकाकडीचे काही नुकसान होत नाही.

(५) सहभोजिता : (कॉमॅनॅलिझम). या साहचर्यामध्ये एकाच पंक्तीत अन्न घेण्यासाठी दोन सजीव एकत्र येतात आणि दोघेही सजीव एकाच वेळी अन्न घेतात. सहभोजिता सहचर्याचा मुख्य हेतू अन्न मिळविणे हाच असतो. नीरीज हा वलयी प्राणी खेकडा राहत असलेल्या शंखामध्ये आश्रय घेतो. खेकडा अन्न घेत असताना नीरीजदेखील शंखातून डोके बाहेर काढतो आणि खेकड्याने पकडलेल्या अन्नापैकी काही भाग खातो. तसेच शंखवासी खेकडा व समुद्रपुष्प हेही एकत्र आढळतात. जेव्हा खेकडा अन्न मिळवितो, तेव्हा समुद्रपुष्पांनाही अन्न मिळते. वाळवीच्या आतड्यात राहणारे कशाभिका आदिजीव लाकडातील सेल्युलोजचे विकरांच्या साहाय्याने पचन करतात, स्वत: अन्न घेतात आणि वाळवीलादेखील अन्न मिळवून देतात. गाय आणि तत्सम जनावरे गवतातून चरताना गवतातील कीटक उडतात, ते कीटक सामान्यपणे जनावरांच्या पाठीवर बसलेले गायबगळे खाऊन टाकतात. याप्रमाणेच लुचुक (रेमोरा) मासा शार्कच्या धडाला चिकटून राहतो. शार्कच्या तोंडातून निसटलेले मांसाचे तुकडे तो खातो, दोन्ही एकाच वेळी अन्न खातात.

सजीवांमधील साहचर्य : (१) सहवासविच्छेद, (२) उदासीनता, (३) सहभोजिता, (४) सहजीवन.

(६) सहोपकारिता : (म्युच्युॲलिझम). दोन सजीवांत घडून आलेली ही प्रक्रिया दोन्ही सजीवांना फायदेशीर आणि उपयुक्त असते. जसे, बुरशीचे तंतू वनस्पतींच्या ऊतींवर किंवा ऊतींच्या आत राहतात. यात बुरशी वनस्पतींना काही पोषक द्रव्ये उपलब्ध करून देतात, तर वनस्पती बुरशीला ॲमिनो आम्ले व इतर जैवरसायने पुरवितात. असेच उदाहरण ऑर्किड आणि कवक यांच्यात दिसून येते. लायकेन म्हणजेज ‘शैवाक’. दगडफूल हे शैवाल आणि कवक यांच्यातील सहोपकारितेचे उदाहरण आहे. शैवाल अन्न तयार करते, तर कवक शैवालाला पाण्याचा पुरवठा करते. काही वेळा, एक प्राणी जलव्याल (हायड्रा व्हिरिडिस) व एक वनस्पती (शैवाल) एकमेकांना उपकारक ठरतात. जलव्यालाच्या शरीरात झोओक्लोरेली हे हिरवे शैवाल राहते. शैवालाच्या अन्नातील काही भाग आणि ऑक्सिजन शैवालाकडून हायड्राला मिळतो, तर हायड्रापासून कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजनयुक्त पदार्थ शैवालाला मिळतात. याखेरीज शैवालाला संरक्षणदेखील मिळते. सहोपकारिता साहचर्याच्या प्रकारात दोन्ही सजीवांनी एकत्र राहणे अनिवार्य असते. कारण एका सजीवाशिवाय दुसरा सजीव जगू शकत नाही. जसे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे ऱ्हायझोबियम जीवाणू हे शिंबावंत वनस्पतींच्या (तूर, वाटाणा) मुळांच्या गाठीत राहतात. अशा प्रकारे शिंबावंत वनस्पतींच्या गाठींद्वारे जीवाणूंना संरक्षण दिले जाते.

(७) सहजीवन : (सिंबायोसिस). या साहचर्यात दोन्ही सजीवांचा फायदा होतो. सहजीवन साहचर्य विविध प्रकारांचे असून त्याद्वारे पोषण, संरक्षण, आधार, प्रजनन इ. बाबी सजीवांना साध्य होतात. उदा., कीटक आणि वनस्पती यांच्यातील सहजीवनात जेव्हा कीटक फुलातील मकरंद घेतात, त्याचवेळी त्या फुलातील परागकण घेऊन नकळत दुसऱ्या फुलावर जातात आणि परागण घडून येते. वनस्पतीला कीटकांचा परागणात आणि परिणामी प्रजोत्पादनात उपयोग होतो, तर कीटकाला अन्न मिळते. पक्षी फळांतील गर खाद्य म्हणून वापरतात आणि अखाद्य भाग म्हणजे बीजे यांचा प्रसार घडवून आणतात. सहजीवन साहचर्य निकटच्या दोन सजीवांमध्ये किंवा दोन जातींमध्ये दिसून येते आणि त्याचा फायदा दोघांनाही होतो.

(८) स्पर्धा : प्राण्यांच्या कळपात अन्न, पाणी, आसरा आणि जोडीदार मिळविण्यासाठी साहचर्य आढळून येते आणि त्यासाठी त्यांच्यात स्पर्धा होते. या स्पर्धेमधून बलवान नर जोडीदार मिळवितो, तसेच कळपावर नियंत्रण ठेवतो. त्यातून कळपाची पुढची पिढी चांगली निपजते. त्याप्रमाणे जीवनकलहात योग्य आणि बलवान जाती टिकून राहते, पुढच्या योग्य पिढ्या निर्माण होतात.