मानवातील अवशेषांगे

सजीवांमधील र्‍हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्‍या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. जुन्याच इंद्रियांत क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरूपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे इंद्रिय नाहीसे होण्यास हजारो वर्षे लागतात. या नाहीशा होत जाणार्‍या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. सध्याचे सजीव प्राचीन काळी असणार्‍या अगदी साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने उत्पन्न झाले आहेत. या जैवक्रमविकासाच्या सिद्धांताच्या पुष्टीसाठी जीवशास्त्रज्ञांनी वेळोवेळी मांडलेल्या पुराव्यांपैकी ‘अवशेषांगे’ हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. सजीवांमधील ‘अवशेषांगे’ ही आपल्या पूर्वजांच्या खाणाखुणा पुढच्या पिढीत संक्रमित करतात. या अवशेषांगांमुळे आपण त्यांचे नाते कोणत्या समान पूर्वजांशी आहे हे सांगू शकतो. जसे मासा, कासव, पक्षी व मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत अगदी एकसारखे दिसतात. या सर्व भ्रूणांना कल्ले, विदरे आणि शेपूट असते. अवशेषांगे ही सजातीय अवयव असतात. एखाद्या सजीवातील अवशेषांग हे त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसले तरी दुसर्‍या सजीवांमध्ये तो अवयव एखादे कार्य करीत असतो, म्हणजेच दुसर्‍या सजीवात ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणार्‍या आणि सेल्युलोजचे पचन करू शकणार्‍या समान प्राण्यांसाठी एक उपयुक्त, कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असलेले कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलविण्याकरिता उपयुक्त असतात. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, पुरुषांना असलेले अल्पविकसित स्तन अशी अनेक अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात.

मासे, उभयचर, सरीसृप आणि पक्षी या वर्गात निमेषक पटल (तिसरी पापणी) ही एक उपयु्क्त आणि पूर्ण विकसित रचना आहे. पापण्या व त्यांची उघडझाप करणारे स्नायू यांच्या विकासामुळे निमेषक पटल माणसाच्या शरीरात निरुपयोगी झाले आहे. जमिनीवर राहणार्‍या काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता नाहीशी झाली आहे. न्यूझीलंडमध्ये आढळणारा किवी पक्षी हे याचे उदाहरण आहे. या पक्ष्याच्या शरीरावर नेहमीचे पंख आढळत नाहीत. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास त्याच्या शरीरावरील केसांसारख्या पिसांखाली अल्प-विकसित पंख दिसतात. यांना उड्डाणांगे म्हणून काहीही महत्त्व नाही. न उडणार्‍या अनेक कीटकांतदेखील पंखांचे अवशेष आढळतात. कीटक, खेकडा, साप, शहामृग, एमू व देवमासा यांच्यामध्ये विविध अवशेषांगे दिसून येतात. काही वनस्पतींमध्येही अवशेषी भाग असतात. डँडेलियन या वनस्पती आणि काही अलैंगिक प्रजनन करणार्‍या वनस्पतींमध्ये फुलांच्या अनावश्यक पाकळ्या दिसतात. त्या पाकळ्या पूर्वीच्या काळात कीटकांना परागणासाठी उपयोगी असत.

अ‍ॅरिस्टॉटल यांनी हिस्टरी ऑफ अ‍ॅनिमल्स या ग्रंथात, चार्ल्स डार्विन यांनी ‘द डिसेन्ट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स’ या ग्रंथात, तर झां बातीस्त लामार्क यांनी ‘फिलॉसॉफी झूलॉजिक या ग्रंथात विविध सजीवांमधील अवशेषांगांची चर्चा केली आहे. १८९३ मध्ये रॉबर्ट वाईडर शेम यांनी मानवातील ८६ अवशेषांगांची यादी प्रकाशित केली आहे.