अध्यापनासंदर्भात निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेला आराखडा म्हणजे पाठनियोजन. पाठनियोजन करताना पाठाची प्रस्तावना, हेतूकथन, विषयविवेचन, संकलन, उपयोजन व गृहपाठ या पायऱ्यांनुसार प्रशिक्षणार्थ्यांकडून पाठाचे टाचण काढले जाते. त्यात विद्यार्थ्यांचे विषयातील पूर्वज्ञान, अध्यापनपद्धती, फलकलेखन इत्यादी साधनांचा अंतर्भाव असतो. तयार पाठटाचण संबंधित मार्गदर्शक अध्यापकांकडून तपासून घेतले जाते. पाठनियोजनाच्या प्रक्रियेतून अंतिम फलित किंवा निष्पत्ती कागदावर नियमबद्ध पद्धतीने मांडलेली असते. त्याचबरोबर पाठनियोजन करतांना घटकानुसार पूर्वज्ञान निश्चिती, पाठ्यांशाचे पृथक्करण, उद्दिष्टे व स्पष्टीकरणांची निश्चिती, पाठ्यवस्तूचे संघटन व अध्यापन उपागम निश्चिती, अध्यापन आकृतिबंध व अध्ययन अनुभवांची निश्चिती, आधारप्रणाली विचार, अध्यापन कौशल्ये निवड, पाठाचे पदबंध आणि मूल्यमापन साधने या पायऱ्यांचा विचार करून नियोजित पाठटाचण नमुन्यात माहिती लिहिल्यास ती अध्यापन करतांना दिशादर्शक ठरते.

पाठनियोजनाबाबत अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत. सिप्ले व अबत यांनी १९३४ मध्ये केलेल्या  व्याख्येनुसार, “अध्यापनाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे पाठनियोजन”.

बी. ट्रेसर यांच्या १९७२च्या व्याख्येनुसार, “पाठांची संरचना, अध्यापनाच्या उद्दिष्टांच्या परिभाषेतील विद्यार्थ्यांचे अपेक्षित वर्तन आणि आवश्यक व नियोजनबद्ध कृतीची रूपरेषा यांचा अध्यापनासाठीचा सर्वसामान्य आराखडा तयार करण्याचे कार्य म्हणजे पाठनियोजन होय”. एकंदरीत, विद्यार्थ्यांचे अपेक्षित वर्तन व अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बहुविध कृती आणि साहित्य यांचे अर्थपूर्ण, सविस्तर व काळजीपूर्वक केलेले संघटन म्हणजे पाठनियोजन होय.

पाठनियोजनातून आशय, उद्दिष्टे, बहुविध कृती व साहित्य यांद्वारे निर्मित अध्ययन-अनुभूती आणि मूल्यमापन साधने यांची योग्य सांगड घालण्यास मदत होते. यामुळे उपलब्ध वेळेचा दिलेल्या अध्यापनासाठी सुयोग्य वापर करता येतो. काल (कोठे) व अवकाश (केव्हा) या दोन मितींच्या संदर्भात अध्ययन-अध्यापन कृतीचे रेखाटन करता येते. अध्यापनाची पूर्वज्ञानाशी व पुढील अध्ययनाशी सांगड घालता येते. पाठनियोजनामध्ये अध्यापनाची उद्दिष्टे, शैक्षणिक साधने, मूल्यमापन साधने, उद्दिष्ट साध्य करण्याचे उपागम, मार्ग, आशय संघटनांच्या पद्धती, अध्यापनांची प्रतिमाने व कौशल्ये यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन उपलब्ध पर्यायांची जाणीवपूर्वक निवड करता येते. तसेच दिलेल्या पाठटाचण आराखड्यामध्ये निश्चित केलेल्या नियोजनाचे लेखन करता येते.

आकृती : नियोजन व अध्यापन संबंध

महत्त्व : शिक्षकांच्या अध्यापनामध्ये पूर्व क्रियात्मक, आंतर क्रियात्मक आणि उत्तर क्रियात्मक या तीन महत्त्वपूर्ण वर्तनांचा समावेश असतो. पूर्वक्रियात्मक वर्तन म्हणजे, अध्यापन क्रियेपूर्वी करावी लागणारी पूर्वतयारी होय. यात प्रशिक्षणार्थ्यांच्या विषयज्ञान अभिवृद्धी, शैक्षणिक साधन निर्मिती, अध्यापनाचे नियोजन इत्यादी कृती येतात. त्यांपैकी अध्यापनाचे नियोजन हे सर्वांत महत्त्वाचे पूर्वक्रियात्मक वर्तन असते. नियोजनानुसार अध्यापन होण्याकरिता नियोजनाकडे अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक ठरते. आकृती पाहा.

नियोजनाचा प्रत्यक्ष अध्यापानाशी संबंध असतो; मात्र ते पूर्वक्रियात्मक वर्तनात येते. अध्यापन परिणामकारक होण्याच्या दृष्टीने पाठनियोजनाचे महत्त्व पुढील प्रमाणे :

 • पाठनियोजनामुळे आशय व पद्धती या दोन्हींवर अध्यापकाचे प्रभुत्व प्राप्त होते.
 • अध्यापनात जिवंतपणा, अचूकता व संयुक्तिकता येते.
 • अध्यापनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लागण्यास मदत होते.
 • अध्यापनाची परिणामकारकता वाढते.
 • अध्यापनासाठी उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग होतो.
 • भिन्न कुवतीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव देण्याचे क्लिष्ट काम सोपे होते.
 • शिक्षकांच्या तात्कालिक उद्दीष्टांबरोबरच दीर्घकालीन उद्दीष्टेही साध्य होण्यास मदत होते.
 • अध्ययन-अध्यापन सुसंघटित होऊन त्यास योग्य दिशा प्राप्त होते.
 • अध्यापनाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यास मदत होते.
 • अध्यापकांचा अध्यापनातील आत्मविश्वास वाढीस लागतो.
 • अध्यापनात शिस्त निर्माण होण्यास मदत होते.
 • अध्यापनात येणाऱ्या समस्यांचे आकलन वाढीस लागते.
 • अध्यापकांस आपल्या अध्यापनाच्या स्वयं-मूल्यमापनासाठी मदत होते.
 • अध्यापनातील प्रयत्न प्रमादांचे प्रमाण कमी होते.

अलीकडे नियोजनाच्या प्रक्रियेचा अधिक सूक्ष्म विचार केला जातो. पाठनियोजन अभ्यासाचे दोन दृष्टीकोन आहेत. पहिला, ‘भविष्यकाळात काय करायचे, हे ठरविताना घडणाऱ्या मुलभूत मानसिक प्रक्रियांचा संच म्हणजे नियोजन.’ आणि दुसरा, ‘अध्यापनासाठी नियोजन करावयाचे म्हणून शिक्षक ज्या कृती करतात ते म्हणजे नियोजन.’ पहिल्या प्रकारात आपण वर्गात काय शिकविणार? कोणत्या पायऱ्यांनी जाणार? कोणत्या मुद्यानंतर कोणता मुद्दा येणार? केव्हा कोणती चित्र दाखविणार? कोणते उदाहरण केंव्हा देणार? कोणता प्रश्न केव्हा विचारणार? का विचारणार? इत्यादी संदर्भांत अध्यापकांकडून मनातल्या मनात आपले विद्यार्थी व पाठाचे आशयात्मक स्वरूप यांचा विचार करून आराखडा तयार केला जातो. या दृष्टीकोनात अध्यापन हे नियोजनबद्ध वर्तन मानले जाते. यात आराखड्याची निर्मिती व आराखड्याची कार्यवाही या दोन मानसशास्त्रीय प्रक्रियांचा समावेश होतो. आराखड्याची निर्मिती करीत असताना सर्वसाधारणत: ध्येयाची किंवा उद्दिष्टांची निश्चिती, उद्दिष्टाप्रत जाण्याचे मार्ग आणि विशिष्ट परिस्थितीत कोणत्या गोष्टींची व केव्हा निवड करावी, यांचे निर्णय या घटकांचा समावेश होतो.

अध्यापन नियोजनात एखादा घटक शिकविताना घटकाची उद्दिष्टे निश्चित केली जातात. कोणत्या परिस्थितीत आपणास शिकवावयाचे आहे, म्हणजेच त्या परिस्थितीत आपल्या नियंत्रणाखाली असणारे घटक व नसणारे घटक यांचा विचार केला जातो. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या कृतीचा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसा उपयोग होईल, याचा विचार केला जातो. त्या निष्पत्तीची उपयुक्तता विचारात घेवून योग्य अध्यापन कृतीची निवड केली जाते. नियोजनाच्या अशा प्रकारच्या मानसिक क्रीया घडत असताना मनामध्ये ज्या अध्यापन परिस्थितीसाठी नियोजन केले जाते, त्याचे अवकाशीय व कालिक असे चित्र तयार होते आणि त्या परिस्थितीत करण्यात येणाऱ्या कृतींचा क्रम व निर्णय यांचा एक सुस्पष्ट मानसिक आराखडा तयार होतो. आराखड्याची प्रत्यक्ष कार्यवाही करत असताना ठरविलेल्या कृतीत आणि घडलेल्या कृतीत फरक पडण्याची शक्यता नेहमीच असते. हा फरक अध्यापनाच्या काळात अत्यंत गतीने घडणाऱ्या कृती, परिस्थितीच्या अंदाजाचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे पडतो. वर्गात प्रत्यक्ष जे घडते त्यानुसार तात्काळ काही निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय योग्य रीतीने घेण्यासाठी नियोजनामध्ये निश्चित केलेल्या निर्णयाचा उपयोग होत असतो. कार्यवाही करीत असताना एखादी कृती करण्यापूर्वी आपण त्याबाबत काय ठरविले होते, ते आठविण्याची क्रिया घडते. थोडक्यात, पाठनियोजन हे नियोजनबद्ध असे मानवी वर्तन असते की, ज्यात आराखड्याची निर्मिती व कार्यवाही या दोन्ही मानस शास्त्रीय प्रक्रियांचा अंतर्भाव होतो.

अध्यापनासाठी करावयाच्या कृतीची मांडणी म्हणजे नियोजन. ही नियोजनाची दुसरी व्याख्या. या संदर्भात अलिकडील काळात काही संशोधने झालीत. क्लार्क आणि यिंगर यांना त्यांच्या संशोधनात असे दिसून आले की, शिक्षकांना दैनंदीन पाठनियोजनापासून वार्षिक नियोजनापर्यंत अनेक प्रकारचे नियोजन करावे लागते. जर शिक्षकांनी पाठनियोजन केले, तर त्यांच्या मानसिक गरजा पूर्ण होऊन तो बौद्धिक दृष्ट्या अध्यापनास सज्ज होऊ शकतो. तसेच ते आंतरक्रियात्मक कृती करतांना पाठटाचण मार्गदर्शक ठरते. टेलर यांच्या प्राप्त निष्कर्षानुसार, (१) शिक्षक प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गरजा, क्षमता, विषयवस्तू यांना जास्त प्राधान्य देतात व अध्यापन पद्धती, मूल्यमापन यांना कमी महत्त्व देतात. (२) नवीन शिक्षक किंवा कमी अनुभव असलेले शिक्षक हे प्रशिक्षणात ज्या रीतीने पाठटाचण काढतात, त्या पद्धतीने नियोजन करतात. (३) अनुभवी शिक्षक लिखित स्वरूपात नियोजन न करता ते मनात करतात. मनातील अध्यापन रचना त्यांना अध्यापनास मदत करते.

वैशिष्ट्ये : वर्गात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकविण्याकरिता योग्य पाठनियोजनाची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण ठरतात.

 • पाठटाचण सुवाच्छ अक्षरांत, थोडक्यात मात्र सर्व मुद्देयुक्त लिहून काढणे.
 • पाठनियोजनात सातत्य राखण्याकरिता पाठ शिकविण्यापूर्वी आधी शिकविलेल्या पाठाची उजळणी घेऊन पुढील भाग शिकविणे.
 • प्रशिक्षणार्थ्यांनी आपले अध्यापन तंत्र (प्रश्नोत्तरी पद्धती, तुलनात्मक पद्धती, समवाय पद्धती इत्यादी) प्रथमत: स्पष्ट करावे.
 • पाठामध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात येणारे योग्य प्रश्न नश्चित करावीत. त्यांचे उत्तरेही प्रशिक्षणार्थ्यांच्या आकलनात असावेत. प्रशिक्षणार्थ्यांनी पाठादरम्यान प्रश्न तयार करू नयेत.
 • विद्यार्थ्यांना पाठामध्ये पूर्णपणे समायोजित करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी दृक-श्राव्य साधने, चित्रे, आकृत्या, नकाशे, फलक लेखन इत्यादी शैक्षणिक साधनांचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या अवधानांचा विचार त्यांचे वय, आवडी-निवडी, क्षमता इत्यादींतून करावा.
 • प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या पाठनियोजनामध्ये पाठाचे घटक-उपघटक यांमध्ये विभागणी करून टाचणात उद्दिष्ट्ये, ध्येय स्पष्ट करावे.
 • पाठनियोजन करताना पाठात विद्यार्थी समाविष्ट होतील, कार्यप्रवृत्त होतील, पाठ कंटाळवाणा होणार नाही याची, तसेच पाठ ठरविलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावी.
 • पाठाच्या शेवटी पाठामध्ये काय शिकले-शिकविले याचा सारांश सांगून त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे, सामूहिक उत्तरे न स्वीकारण, त्यांचे मत जाणून घेणे, पुढील तासाबद्दल पूर्व कल्पना देणे इत्यादी बाबी पाठनियोजनात महत्त्वपूर्ण आहेत.

काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते, पाठनियोजन व अध्यापन यात धन सहसंबंध असतो. या सर्व संशोधनातून तीन महत्त्वपूर्ण निष्कर्ष निघतात. एक, अध्यापन परीणामककारक होण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. दोन, पाठाचे नियोजन हे नेहमीच लिखित स्वरूपात केले जात नाही. तीन, अनुभवी शिक्षक मानसिक रीत्या पाठाचे नियोजन करतात, तर नवीन शिक्षक लिखित स्वरूपात नियोजन करतात. अध्यापन कौशल्ये, अध्यापन पद्धती, मूल्यमापन इत्यादी कृती अनुभवी शिक्षकांची नित्यकर्म बनल्यामुळे त्यांचा विचार ते नियोजनात करीत नाहीत. ते केवळ विद्यार्थी व आशय यांना नियोजनात महत्त्वाचे स्थान देतात.

पाठनियोजन ही अध्यापनातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ज्याच्या वापरामुळे अध्यापन अधिक परिणामकारक करता येते. पाठनियोजनाला मानसशास्त्रीय, संशोधनात्मक आधार आहे, ज्यामुळे पाठनियोजनाचे महत्त्व लक्षात येते.

समीक्षक – बाबानंदन पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा