या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गातील ॲसिपिट्रीफॉर्मीस (Accipitriformes) गणामधील पँडिऑनिडी (Pandionidae) कुलामध्ये होतो. या कुलातील ही एकमेव प्रजाती असून तिचे शास्त्रीय नाव पँडिऑन हॅलिईटस (Pandion haliaetus) आहे. तिचा ससाणा, गरुड, घार व गिधाड या पक्ष्यांशी जवळचा संबंध आहे. या पक्ष्याचा आढळ अंटार्क्टिका वगळता जगामध्ये सर्वत्र असून तो स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो  नदी, तळी, सरोवर तसेच मोठ्या पाणीसाठ्याजवळ (गोड्या व खाऱ्या) आढळतो. याला इंग्रजीमध्ये ऑस्प्रे (Ospray), सी हॉक (Sea hawk), फिश हॉक (Fish hawk) व रिव्हर हॉक (River hawk) असेही म्हणतात. या पक्ष्यांची संख्या उष्ण प्रदेशीय व उपोष्ण प्रदेशीय भागांत स्थिर असून तेथून ते सहसा स्थलांतर करत नाहीत. काही पक्षी हिवाळ्यात यूरोपमधून आफ्रिकेत तसेच उत्तर अमेरिकेतून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. दक्षिण आशियात सर्वत्र तसेच म्यानमार ते दक्षिण-पूर्व आशिया ते इंडोचीन आणि दक्षिण चीन, इंडोनेशिया, मलेशिया व फिलिपीन्स येथे हिवाळ्यात पाहुणा म्हणून हा पक्षी आढळून येतो.

मोरघार : (पँडिऑन हॅलिईटस )

मोरघार आकाराने मोठी असून तिची लांबी सु. ६५ सेंमी. व वजन १,०००–१,१०० ग्रॅ. असते. मादी नरापेक्षा मोठी असून तिचे वजन १,२००–२,००० ग्रॅ. असते. शरीराची वरची बाजू गर्द तपकिरी, तकतकीत आणि खालची बाजू पांढरी असते. डोके पांढरे व डोळ्याच्या दोन्ही बाजूंवरून मानेपर्यंत काळा पट्टा असतो. डोळे नारिंगी लाल ते गडद तपकिरी किंवा सोनेरी पिवळे असतात. नजर तीक्ष्ण असून उंचावरून भक्ष्य शोधण्याकरिता तिचा उपयोग होतो. चोच काळी, बळकट आकडीसारखी वाकडी असते. पंख लांब असून पिसे पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी तेलकट असतात. पंखाचा विस्तार १२०–१७५ सेंमी. असतो. पाय पांढरे असून पायाच्या बोटांवर काळे, लांब व आतल्या बाजूने वळलेले अणकुचीदार नखर असतात. तळव्यावर दाट कंटिका असतात. नखर व कंटिका यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. मादीमध्ये छातीवर गडद तपकिरी ठिपके, तर नरामध्ये ते फिकट असतात. मोरघार जेव्हा उडते तेव्हा तिचे पंख इंग्रजी एम् (m) या अक्षराप्रमाणे दिसतात.

मोरघार : विविधरंगी डोळे.

मोरघार येकऽऽ (Yewk) असा, तर संकटाची चाहूल लागताच चिर्रकऽऽ (Cheereek) असा आवाज काढते. ती एका तासात सु. ४८ किमी. अंतर उडू शकते. विणीचा हंगाम प्रदेशांनुसार बदलतो. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी नर हवेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण नृत्य करतो. नर व मादी उंच ठिकाणी झाडावर किंवा विजेच्या खांबांबर किंवा शक्यतो पाण्याजवळ काटक्यांपासून घरटी बांधतात. ते एकच घरटे वर्षानुवर्षे दुरुस्त करून वापरतात. मादी एका हंगामात १–४ अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे चट्टे असतात. नर व मादी मिळून अंड्यांची काळजी घेतात; त्यावेळी दोघेही आक्रमक असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते, तर नर त्याकाळात मादीसाठी अन्न आणण्याचे व घरट्याचे संरक्षण करण्याचे काम करतो.

अंडी सुमारे एक महिना उबविल्यानंतर पिलू बाहेर येते. दोन महिन्यांनंतर ते हवेत पहिले उड्डाण घेते आणि आपले स्वतंत्र जीवन जगू लागते. पिलू ३ वर्षांचे झाल्यावर प्रजननक्षम होते. नर-मादी जोडा आयुष्यभर टिकतो.

मोरघार हा पक्षी मुख्यतः मत्स्याहारी असून मासे उपलब्ध न झाल्यास लहान सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणीही तो खातो. तो नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर अधिक प्रमाणात आढळतो. संथ पाण्यावरून उडत असताना १०–१५ मी. उंचीवरून पाण्यात सूर मारून पायांनी मासा पकडतो व लगेच पाण्याबाहेर पडतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या पक्ष्याची आयुमर्यादा २०–२५ वर्षे आहे.

उत्तर अमेरिकेत सन १९४७ नंतर मोरघार या पक्ष्याची शिकार करणे, त्यांची अंडी गोळा करणे तसेच कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर व उंच झाडांची तोड यांमुळे या पक्ष्यांच्या प्रजननक्षमतेत अडथळे व बदल होऊ लागले. विशेषेकरून डीडीटीच्या (DDT; Dichloro diphenyl trichloroethane) वापरामुळे मोरघार पक्ष्यांच्या चयापचयात बिघाड होऊन त्यांच्या अंड्याचे कवच पातळ झाल्याचे आढळून आले. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अंडी उबवताना फुटून जात. परिणामी  त्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे मोरघार या पक्ष्याच्या संवर्धनासाठी १९७२ मध्ये डीडीटीच्या वापरावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर मोरघार ही यशस्वी प्रजनन प्रजाती म्हणून पुन्हा दिसू लागली.

पहा : घार; मोरांगी घार.

संदर्भ :

समीक्षक – सुरेखा मगर-मोहिते

This Post Has One Comment

  1. Devend Suryawanshi

    Nice information.. Thanks a Lot

प्रतिक्रिया व्यक्त करा