डोमकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ संपूर्ण भारतीय उपखंडात असून तो भारत, श्रीलंका, नेपाळ व बांग्लादेश या ठिकाणी आढळतो. हिमालयात तो समुद्रसपाटीपासून ३,९६५ किमी. उंचीपर्यंत सापडतो. ऋतुमानानुसार तो आपले स्थान बदलतो. उन्हाळ्यात तो उंचावर जातो तर हिवाळ्यात खाली उतरतो. याचा आढळ जंगलांत असला तरी थोड्याफार प्रमाणात तो खेड्यापाड्यांत, गावांत व शहरांतही दिसून येतो. याचा आढळ मनुष्यवस्तीपासून दूर असतो. याला जंगली कावळा असेही म्हणतात.

लांब चोचीचा कावळा (को. मॅक्रोऱ्हिंकस)

डोमकावळ्याच्या लांब/जाड चोचीचा कावळा (Large billed crow), पूर्वीय जंगली कावळा (Eastern jungle crow) व भारतीय जंगली कावळा (Indian jungle crow) अशा तीन उपप्रजाती आहेत. लांब चोचीच्या कावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस (Corvus macrorhynchos), पूर्वीय जंगली कावळ्याचे को. लेव्हिलॅन्टी (Corvus levaillantii) व भारतीय जंगली कावळ्याचे को. कुलमिनॅटस (Corvus culminatus) असे आहे. विशेषेकरून लांब चोचीचा कावळा ही उपप्रजाती व्यापक प्रमाणात डोमकावळा म्हणून ओळखली जाते.

पूर्वीय जंगली कावळा (को. लेव्हिलॅन्टी)

डोमकावळा हा आकाराने घरकावळ्यापेक्षा मोठा व घारीपेक्षा लहान असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. याची लांबी ४६-५९ सेंमी. असून पंखविस्तार सु. १०४ सेंमी.पर्यंत व वजन सु. ६५० ग्रॅ. असते. याचा रंग चकचकीत काळा व त्यामध्ये जांभळ्या रंगाची झाक असते. डोळे तपकिरी रंगाचे, चोच लांब, जाड व मजबूत असते. पाय काळे असतात. त्याचा आवाज मोठा व कर्कश्श असून तो काव कावऽऽ असा ओरडतो.

डोमकावळा सर्वभक्षी असून त्याच्या आहारात फळे, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी व पिले यांचा समावेश असतो. तो कुजलेल्या वनस्पती व मृत प्राणीही खातो, त्यामुळे परिसर स्वच्छ राखण्यास मदत होती.

भारतीय जंगली कावळा (को. कुलमिनॅटस)

डोमकावळ्याचे थवे किंवा समूह आढळून येतात. समूहात सु. ५० पर्यंत पक्षी असतात. हंगामात यांच्या जोड्या दिसून येतात. विणीचा हंगाम प्रदेशपरत्वे निरनिराळा असतो. याचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात मार्च-एप्रिल तर दक्षिणेत डिसेंबर-मार्च असा असतो, तर श्रीलंकेत तो मे-जूनमध्ये असतो. याचे घरटे घरकावळ्याच्या घरट्यासारखेच असून ते काटक्यांपासून बनवलेले असते. नर-मादी दोघे मिळून उंच झाडावर घरटे बांधतात. घरट्यात मादी ४-५ निळसर हिरव्या रंगाची अंडी घालते. त्यावर तपकिरी ठिपके वा रेषा असतात. अंडी तसेच पिलांना भरविण्याचे काम नर-मादी दोघे मिळून करतात. पिलू एक महिन्याचे झाले की उडू लागते. मादी कोकिळ पक्षी डोमकावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. डोमकावळा आपलीच अंडी समजून ती अंडीही उबवतो. डोमकावळ्याचा आयु:काल सु. १९ वर्षांचा असतो.

लांब चोचीचा कावळा (को. मॅक्रोऱ्हिंकस) : अंडी.

को. मॅक्रोऱ्हिंकस  प्रजातीमध्ये को. मॅ. कोलोनोरम (C. m. colonorum), को. मॅ. कनेक्टन्स (C. m. connectens), को. मॅ. इंटरमेडिअस (C. m. intermedius), को. मॅ. जॅपोनेन्सिस (C. m. japonensis), को. मॅ. मॅक्रोऱ्हिंकस (C. m. macrorhynchos), को. मॅ. मँड्स्कूरिकस (C. m. mandschuricus), को. मॅ. ओसाई (C. m. osai), को. मॅ. फिलिपिनस (C. m.philippinus), को. मॅ. तिबेटोसिनेन्सिस (C. m. tibetosinesis) या उपजातींचा समावेश होतो.

 

 

 

 

पहा : कावळा, कोकिळ, परभृत सजीव, पाणकावळा.

संदर्भ :