भूकंपमार्गदर्शक सूचना १४
क्षितीज पट्ट्यांचे कार्य :
दगडी इमारतींमध्ये क्षितिज पट्टे अतिशय महत्त्वपूर्ण भूकंपरोधक वैशिष्ट्य म्हणून कामगिरी करतात. ज्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या एखाद्या खोक्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पट्ट्या बांधल्या जातात, त्याप्रमाणे दगडी इमारतीमध्ये सर्व भिंतींना एकत्र बांधून एकच घटक म्हणून धरून ठेवण्यासाठी क्षितिज पट्ट्यांचा वापर केला जातो. नमुनेदाखल एका दगडी इमारतीमध्ये त्यांच्या स्थानानुसार चार प्रकारचे क्षितिज पट्टे वापरले जातात. उदा., चांदई पट्टा (Gable Band), छत पट्टा (Roof Band), छावणी पट्टा (Lintel Band) आणि जोते पट्टा (Plinth Band) (आकृती १). त्यापैकी छावणी पट्टा सर्वाधिक महत्त्वाचा असून तो सर्वच इमारतींमध्ये बांधणे आवश्यक आहे. याउलट चांदई पट्ट्याचा केवळ उतरत्या छपरांच्या (Pitched or Sloped Roof) इमारतींमध्येच समावेश केला जातो. ज्या इमारतींमध्ये सपाट प्रबलित काँक्रिट लादी किंवा प्रबलित काँक्रिटच्या विटांचे छत असेल, अशा इमारतींना छत पट्ट्यांची गरज नसते. कारण छताची लादी हीच पट्ट्यांचे कार्य करते. तथापि ज्या इमारतींना सपाट लाकडी किंवा लोखंडी पन्हाळीदार जस्त विलेपित (CGI Sheet Root) पत्र्यांचे छत असेल त्यांना छत पट्टा असणे आवश्यक आहे. तसेच पृष्ठावरण किंवा उतरत्या छपरांच्या इमारतींमध्ये देखील छतपट्टा अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी पायाखालच्या मृदेचे असम अवतालन होते (Uneven Settlement) त्यावेळी जोते पट्ट्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
छावणी पट्ट्यांमुळे भिंती एकत्र बांधल्या जातात आणि कमकुवत दिशेने भारित झालेल्या भिंतींना मजबूत दिशेने भारीत असलेल्या भिंतीचा आधार मिळतो. ह्या पट्ट्यांमुळे भिंतींची बिनआधारित (Unsupported) उंची देखील कमी होते आणि त्यामुळे कमकुवत दिशेने भिंतीचे स्थैर्य सुधारते. १९९३ मध्ये लातून येथील किल्लारी गावातील IX इतक्या तीव्रतेच्या भूकंपामध्ये अनेक दगडी घरे अंशत: किंवा संपूर्णत: कोसळली (आकृती २ अ). याउलट गावातील एक छावणी पट्टा असलेली दगडी इमारत मात्र हादऱ्यांदरम्यान काहीही विशेष नुकसान न होता टिकून राहिली (आकृती २ आ).
छावणी पट्ट्यांचे संकल्पन :
भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान छावणी पट्टा एकाचवेळी नमनघूर्णन आणि खेचणे (Bending and Pulling) या क्रियांना सामोरा जातो (आकृती ३). या क्रियांना प्रतिरोध करण्यासाठी, छावणी पट्ट्यांच्या बांधकामाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हे पट्टे चिरलेल्या बांबूच्या लाकडापासून किंवा प्रबलित काँक्रिटपासून तयार केले जातात (आकृती ४). त्यापैकी प्रबलित काँक्रिटचे पट्टे उत्तम होत. बांधकामादरम्यान पट्टे भिंतीच्या कोपऱ्यांना चांगल्या प्रकारे जोडले गेले पाहिजेत, त्यामुळे पट्ट्याला कमकुवत दिशेला भारित असलेल्या भिंतींना मजबूत दिशेने भारित असलेल्या भिंतीकडून आधार देणे शक्य होते. सरळ लांबीतील लाकडी वाहक किंवा पोलादी गज यांनी एकत्रितपणे कार्य करावे यासाठी लाकडी छावणी पट्ट्यात छोट्या लांबीचे लाकडी आंतरक (अभ्यंतरयोजी; Spacer) किंवा प्रबलित काँक्रिटच्या पट्ट्यात स्टीलच्या कड्या वापरल्या जातात. लाकडी पट्ट्यांमध्ये सरळ लांबी आणि लाकडी ठोकळे यांना खिळ्यांचा वापर करून एकत्रित बांधून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्रबलित काँक्रिटच्या पट्ट्यांमध्ये पोलादी गज आणि पोलादी कड्या यांच्यात आवश्यक स्थिरक बांधणे गरजेचे आहे.
भारतीय मानके :
भारतीय मानके आय. एस. ४३२६ (१९९३) आणि आय. एस. १३८२८ (१९९३) यामध्ये पट्ट्यांचे आकार, प्रमाण आणि तत्सम तपशील दिले आहेत. जिथे लाकडी पट्टे वापरण्यात येतात तिथे वाहकाचा (Runners) काटछेद कमीतकमी ७५ मिमी. X ३८ मिमी. आणि आंतरकांचा काटछेद कमीतकमी ५० मिमी. X १० मिमी. असणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी प्रबलित काँक्रिटचे पट्टे वापरण्यात येतात, त्याठिकाणी त्याची किमान जाडी ७५ मिमी., ८ मिमी. व्यासाचे किमान दोन गज आणि १५० मिमी. मध्यबिंदू असलेल्या ६ मिमी. व्यासाच्या कड्या वापरणे आवश्यक आहे.
संदर्भ :
- IITK-BMTPC-भूकंप मार्गदर्शक सूचना १४.
समीक्षक – सुहासिनी माढेकर