वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी : ( स्थापना – जून, १९६८ ) 

हिमालयाचे भूगर्भशास्त्र या विषयात संशोधन करणारी ही स्वायत्त संशोधन संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारीत कार्यरत आहे. ह्या संस्थेचे प्रारंभीचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी’ (आयएचजी) असे होते. पुढे, या संस्थेचे संस्थापक डॉ. डी. एन. वाडिया यांच्या सन्मानार्थ वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी असे नामकरण झाले. जून, १९६८ मध्ये दिल्ली विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात प्रारंभ झाल्यानंतर, एप्रिल १९७६ मध्ये ही संशोधन संस्था डेहराडून येथे हलविण्यात आली. हिमालयीन भूगर्भशास्त्र या विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनामुळे, ही संशोधन संस्था जागतिक पातळीवर ख्यातकीर्त आहे. तसेच, विज्ञानाच्या अन्य शाखामधील मूलभूत संशोधनात या संस्थेचा सहभाग आहे. त्यात संरचना (स्ट्रक्चर) आणि टेक्टॉनिक्स (इमारतींची सौंदर्य रचना), बायोस्ट्रेटिग्राफी, जिओ मोर्फोलॉजी आणि पर्यावरणीय भूशास्त्र (एन्व्हायरॉन्मेंटल जिओलॉजी), पेट्रोलियमसंबंधी (पेट्रोलॉजी) आणि भूरसायनशास्त्र (जिओकेमिस्ट्री), अवसादशास्त्र (सेडिमेन्टोलॉजी) इ. विषयांचा समावेश असतो.

प्रारंभी, या संस्थेने इटानगर येथे अरुणाचलमधील हिमालयाचा भाग, कुमाऊमधील हिमालयाचा उंच भाग, लाहौल-स्पीती, लडाखचे शिंधू-सिवनी आणि कारकोरम या भागातील कठीण भूगर्भीय संरचना असलेल्या दुर्गम क्षेत्रात संशोधन केले होते. आज सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज असलेली वाडिया इन्स्टिट्यूट पूर्व आणि पश्चिम हिमालयाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर संशोधन करत आहे.

रस्ते संरेखन, पुलांसाठी जागेची निवड आणि पुलांचा पाया, उताराची स्थिरता व घसरत्या भूगर्भाचे नियंत्रण, जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित संरचना, प्रवासी आणि मालवाहतुक सबवे, जलविद्युत प्रकल्पाचे सिस्मोटेक्टॉनिक्स आणि विकासात्मक प्रकल्पातील पर्यावरण संभाव्यता, खोल ट्यूबवेलसाठी जागेची निवड छोट्या-मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूगर्भीय व्यवहार्यता यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात ही संस्था विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना मार्गदर्शन करत असते.

संस्थेने २००९ साली, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या आधारे, हिमालयीन ग्लेशिओलॉजी सेंटरची स्थापना केली आणि त्याद्वारे हिमनद्यावरील वातावरणाचा प्रभाव नियंत्रित करणारी कारणे समजून घेण्याची, हवामान बदलाच्या अनुकूलतेची रणनीती विकसित करण्याची जबाबदारी हाती घेतली.

संस्थेने उभारलेले एस. पी. नौटीयाल हे माहिती संग्रहालय विद्यार्थी आणि सर्व सामान्यांचे आकर्षण ठरले आहे. हिमालय पर्वताची उत्पत्ती आणि उत्क्रांती, भूगर्भीय उलाढाली, भूकंप, तत्संबधी पर्यावरणीय पैलू इ. संबंधीची माहिती तेथे मिळते. या संग्रहालयाला अमेरिका, ऑस्ट्रिया, इस्रायल, जपान, इंग्लंड, फ्रांस, रशिया, कॅनडा या विकसित देशातील तज्ज्ञ भेटी देतात. त्या दृष्टीने हे संग्रहालय एकप्रकारे शिक्षण केंद्र बनले आहे. येथल्या स्वायत्त शैक्षणिक केंद्रात विद्यार्थी पीएच.डी. आणि पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम पूर्ण करतात.

संदर्भ :

  • ‘संशोधन संस्थायण’, दैनिक लोकसत्ता, २९ नोव्हेंबर २०१८.

समीक्षक : अ. पां. देशपांडे