‘संकल्पना उद्यान’ हा उद्यानाचा आराखडा तयार करण्याच्या शास्त्रातील एक नवीन प्रकार आहे. अमेरिकन उद्यानतज्ञ बार्बरा दाम्रोष (Barbara Damrosch) ह्या संकल्पना उद्यानाच्या जनक आहेत. या उद्यानाचा आराखडा तयार करताना एका विशिष्ट संकल्पनेचा किंवा तत्त्वाचा विचार करतात आणि त्या उद्यानाचे सर्व घटक त्या संकल्पनेला पूरक ठरतील असे निवडतात. थोडक्यात, या उद्यानातील प्रत्येक वनस्पती या संकल्पनेशी संलग्न असते. संकल्पना उद्यान तयार करताना उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करतात. त्यासाठी निवडलेल्या वनस्पती तेथील पर्यावरणातील नसल्या तरी चालतात. या संकल्पना ऋतू, रंगसंगती, सांस्कृतिक किंवा एखादा उपयोग यांवर आधारित असतात.
बंदिस्त वर्गाबाहेरील शिक्षण, संशोधन आणि विविध प्रयोगांना संकल्पना उद्यान चालना देऊ शकते. यांत निरनिराळ्या वनस्पतींचा व इतर सामग्रीचा विचार एखाद्या विशिष्ट कल्पनेभोवती केंद्रित करून आराखडा तयार केला जातो. वनस्पती निवडताना भाज्या, फळे, इतर उपयुक्त वनस्पती व शोभेच्या वनस्पती यांचा समावेश होतो.
खडकांच्या उपयोगाने बनविलेले चंडीगडचे शैलोद्यान (Chandigarh Rock Garden) हे भारतातील प्रसिद्ध संकल्पना उद्यान आहे. पुण्याच्या ऊर्जा बागेची संकल्पना ही ऊर्जेचे संधारण आहे; तर पुण्यातीलच नाला उद्यान हे शहरातील नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणलेल्या पाण्याचा उपयोग करून उभारलेले आहे.
फुलपाखरू उद्यानात फुलपाखरांना अंडी घालण्यास सोयीस्कर आणि त्याच्या अळ्यांना खाद्य मिळेल अशा वनस्पतींची निवड केली जाते. पक्षी उद्यान निर्मिताना स्थानिक, स्थलांतरित आणि फळभक्षक पक्ष्यांना निवारा व खाद्य मिळेल अशा वनस्पतींची लागवड करतात.
पर्यावरणपूरक उद्यानाचा आराखडा तयार करताना कृत्रिम तलाव बांधतात व त्याभोवती सुयोग्य अशा वनस्पती लावतात. कालांतराने तेथे पाणथळ जागा प्रस्थापित होते. तेथे लावलेल्या वनस्पतींची मुळे नैसर्गिक गाळण प्रक्रियेने जमीन व पाण्याच्या प्रदूषणाचे नियंत्रण करतात.
विवेकानंद आश्रम (बुलढाणा) येथील पोषक उद्यानात फळझाडे (पपई, केळ, इ.) आणि भाज्या (गाजर, भेंडी, पालक, बीट, इ.) यांची लागवड केली आहे. त्यांमध्ये असलेल्या जीवनसत्त्वांमुळे तेथील मुलांमधील रातांधळेपणाचा विकार कमी झाला आहे.
नक्षत्र उद्यान (Astral Garden) या संकल्पनेचा वापर अनेक सार्वजनिक व नैसर्गिक उद्यानांत केला जातो. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्यावरून त्याचे नक्षत्र ठरते. त्यानुसार त्या व्यक्तीवर परिणाम करणारा एक नक्षत्रवृक्ष असतो. या वृक्षाच्या सान्निध्यामुळे त्या व्यक्तीचे चित्त स्थिर होते, त्याला मन:शांती आणि विश्रांती मिळते. वनस्पती सजीव असल्यामुळे व्यक्तीपासून मिळणाऱ्या चेतना, प्रेरणा यांना त्या प्रतिसाद देतात. ही संकल्पना संपूर्णपणे भारतीय संस्कृतीवर आधारित आहे. बरेचसे नक्षत्रवृक्ष औषधी तर आहेतच पण ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन वायूचा उत्सर्ग करतात. या संकल्पनेद्वारे अनेक वृक्षांचे संवर्धन व जतन केले जाते.
वेगवेगळ्या देशांत वापरल्या जाणाऱ्या काही सर्वसाधारण उद्यान संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत : शेक्सपिअर उद्यान, तत्त्वज्ञानोद्यान, हस्तकला उद्यान, वन्यजीव उद्यान, औषधी वनस्पतींचे उद्यान, सुगंधी वनस्पतींचे उद्यान, क्रीडा उद्यान, पऱ्यांचे उद्यान, अक्षर उद्यान, गोष्टीच्या पुस्तकांचे उद्यान, इंद्रधनुषी उद्यान, सलाड उद्यान, कला उद्यान, सूर्य घड्याळ उद्यान इत्यादी.
भाषांतरकार : शारदा वैद्य
समीक्षक : डॉ.बाळ फोंडके