स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील कुत्रा सर्वपरिचित प्राणी आहे. माणसाळलेल्या कुत्र्याचे शास्त्रीय नाव कॅनिस फॅमिलिअॅरिस आहे. तीक्ष्ण दृष्टी, तिखट कान आणि अतिशय तीव्र घ्राणेंद्रिये यांसाठी हा प्राणी प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळेच कुत्र्याचा उपयोग गुन्हे शोधण्यासाठी, गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी तसेच बाँबस्फोट विरोधी दलात करण्यात येतो.
कुत्र्यांची उंची साधारणत: ४०-५० सेंमी. उंच असून, डोके व धड मिळून लांबी ६०-७० सेंमी. असते. शेपूट ३०-४० सेंमी. लांब असते. पूर्ण वाढलेल्या नर कुत्र्याचे वजन १०-१२ किग्रॅ. पर्यंत भरू शकते. मादी मात्र वजनाने कमी असते. कुत्र्याच्या रंगात विविधता आढळते. तो पांढरा, काळा किंवा तपकिरी रंगाचा असतो. पाय लांब, मजबूत असून त्याला झाडावर चढता येत नाही; पण पोहता येते. कुत्रा हा पायाच्या बोटांवर जोर देऊन चालणारा प्राणी असून, त्याच्या पुढच्या पायाच्या पंजाला पाच व मागील पायाच्या पंजाला चार बोटे असतात. बोटाला नख्या असतात. दातांची एकूण संख्या ४२ असते. जीभ मऊ असून तिच्यावरील द्रवाच्या बाष्पीभवनाने कुत्रा शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करू शकतो. कडक उन्हाच्या वेळी कुत्रा आपली जीभ बाहेर काढून सावलीत बसतो.
सर्वसाधारणपणे एका वर्षाच्या नर-मादी प्रजननक्षम असतात. प्रजननाचा काळ विशिष्ट नसून नेहमी प्रजनन होते, पावसाळ्याच्या वेळी प्रमाण जास्त असते. एका विणीत ८-१० पिले होतात. कुत्रीला पाच स्तन जोड्या असतात. पाच वर्षांनी कुत्रीची जननक्षमता कमी होऊ लागते व आठ वर्षांच्या सुमारास संपूर्णपणे नष्ट होते. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. २१ दिवसानंतर डोळे उघडले जातात. सुरुवातीला काही काळपर्यंत पिले दुधावर पोसली जातात. पिले लहान असताना मादी त्यांची काळजी घेते.
कुत्रा ठराविक क्षेत्रातील जागेतून फिरतो. तो रस्त्याने जाताना ठिकठिकाणी मूत्र सोडून क्षेत्र आखून घेतो. परका प्राणी आला असताना गुरगुरणे, ओरडणे, भुंकणे, भीती वाटत असताना कर्कश आवाज काढणे, दुसर्याबरोबर भांडण चालू असताना शेपटी वर करून ताठरपणाने चाल करून जाणे, पराभव झाला असताना उतारणे पडणे किंवा शेपूट पायात घालून केकाटत पळून जाणे, जिंकल्यावर पराभूत कुत्र्यावर गुरगुरणे, प्रणयाराधनातील विशिष्ट वर्तणूक आणि संभोगस्थितीत काही काळ राहणे इ. कुत्र्याच्या लकबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
सुमारे १४,००० वर्षांपूर्वीपासून कुत्रा हा मानवाचा सोबती आहे. फार पूर्वीपासून माणसाने त्याला पाळले आहे व कुत्र्यानेदेखील इमानदारपणे माणसाशी मैत्री केली आहे. शिकार करणे, गुन्हे शोधणे, राखणदार, सोबती, लाडका पाळीव प्राणी, आंधळ्यांना मार्गदर्शक, संशोधन कार्यात आणि मनोरंजनासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. हल्ली अस्तित्वात असलेल्या कुत्र्यांचे वाण निरनिराळ्या जातींच्या संकरातून आणि संकरित प्रजेच्या संकरांपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांची संख्या सु. ४०० पर्यंत आहे. काही वाण याप्रमाणे आहेत; पॉइंटर, स्पॅनियल, ग्रेहाऊंड, जर्मन शेपर्ड, एस्किमो, बुलटेरिअर, पोमेरेनियन, बुलडॉग, चाऊचाऊ, लॅब्रोडर, रिट्रिव्हर. भारतामध्ये केनेल क्लब ऑफ इंडिया (केसीआय) या संस्थेमार्फत कुत्र्यांची पैदास, प्रदर्शने, कायदेशीर नियम, कुत्र्यांचे प्रश्न वगैरे कार्ये केली जातात.
मनुष्याप्रमाणे कुत्र्यांमध्ये प्राकृतिक व संसर्गजन्य रोग असतात. हृदयरोग व कर्करोग यांसारखे प्राकृतिक रोग कुत्र्यांना होतात. यकृतशोथ, पिसाळ रोग (आलर्क रोग), नृत्यवात, कुत्र्याचा उन्माद, लेप्टोस्पायरोसिस, गोचिडजन्य ताप, कृमिजन्य रोग असे इतरही रोग त्यांना होतात. बाह्यजीवोपजीवी संधिपाद किडीमुळे कुत्र्यांच्या त्वचेला अतिशय कंड सुटते. ही कीड कुत्र्यांच्या केसांच्या मुळात घुसते. केस गळून पडतात. या रोगाला ‘लूत’ म्हणतात. लूत बरी होण्यासाठी गंधक-मलमाचा उपयोग करतात. लेप्टोस्पायरोसिस हा संसर्गजन्य रोग लेप्टोस्पायरा इक्टेरोहीमोर्हेजी व लेप्टोस्पायरा कॅनिकोला या जीवाणूंमुळे होतो. कुत्र्यांच्या मूत्रात हे जीवाणू आढळतात. महापुराच्या काळात जीवाणूयुक्त मूत्र पाण्यात मिसळून माणसांतही हा रोग झाल्याचे आढळते.