भारत सरकारची एक वैज्ञानिक संस्था. भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ही वनस्पतींचे संकलन, संशोधन, ओळख आणि सर्वेक्षण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. १८९० मध्ये ती स्थापन झाली. या संस्थेने भारतामध्ये आसपासच्या प्रदेशातील नवीन वनस्पती आणून त्यांची लागवड करणे आणि देशातील तसेच आसपासच्या प्रदेशातील वनस्पतींचे शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करणे यांसारखी उपयुक्त कामे सुरू केली. स्वातंत्र्यानंतर भारतातील वनस्पतींचे पुन्हा मूल्यमापन करण्याचे ठरल्यानंतर १९५४ मध्ये तिची पुनर्रचना करण्यात आली. तिचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे.

भारतात या संस्थेची प्रादेशिक केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत : (१) अंदमान व निकोबार क्षेत्रीय केंद्र, पोर्ट ब्लेअर; (२) रुक्ष विभाग केंद्र, जोधपूर; (३) अरुणाचल प्रदेश क्षेत्रीय केंद्र, इटानगर; (४) डेक्कन क्षेत्रीय केंद्र, हैदराबाद; (५) पूर्व क्षेत्रीय केंद्र, शिलाँग; (६) उत्तर क्षेत्रीय केंद्र, डेहराडून; (७) सिक्किम हिमालय क्षेत्रीय केंद्र, गंगटोक; (८) दक्षिण क्षेत्रीय केंद्र, कोईमतूर; (९) पश्‍चिम क्षेत्रीय केंद्र, पुणे; (१०) द सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरी, कोलकाता; (११) भारतीय वस्तुसंग्रहालयाचा औद्योगिक विभाग; (१२) द सेंट्रल नॅशनल हर्बेरियम; (१३) इंडियन बोटॅनिकल गार्डन, कोलकाता.

भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: नवीन वनस्पतिस्रोतांसाठी पाहणी न झालेल्या किंवा कमी प्रमाणात पाहणी झालेल्या प्रदेशांची पाहणी करणे; विशिष्ट प्रदेशातील वनस्पतींच्या नावांची यादी व प्रत्येक वनस्पतींचे वर्णन देणारे ग्रंथ तयार करणे; वनस्पतिजातीय व वर्गीकरणवैज्ञानिक संशोधन करणे आणि विद्यापीठे व संशोधन संस्था यांना अचूकपणे वनस्पती ओळखण्यास मदत करणे; वनस्पतीच्या विविध प्रकारांचे व इतर प्रमाणित नमुन्यांचे संरक्षण करण्यासाठी वनस्पतिसंग्रह, वस्तुसंग्रहालये यांची स्थापना करणे आणि भारतातील, परदेशातील वनस्पतींच्या नमुन्यांची देवघेव करणे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व दुर्मिळ वनस्पतींचा जनुकीय अभ्यास, संवर्धन व शिक्षण या दृष्टींनी वनस्पती उद्याने योग्य अवस्थेत राखणे; वनस्पति-भूगोलाचा आणि पारिस्थितिकी बदलांचा वनस्पतिजाती व वनश्री यांवर होणाऱ्‍या परिणामांचा अभ्यास करणे; वनस्पतिजाती व त्यांचा अध‍िवास यांना असणारा संभाव्य धोका आणि त्यांचे संवर्धन यांविषयी अभ्यास करणे. देशातील वनस्पति-स्रोतांच्या संदर्भातील सर्व बाबींविषयी सरकारला सल्ला देणे.

संस्थेतील वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार, संस्थेच्या सर्व शाखांतील वैज्ञानिक व तांत्रिक कार्यांची योजना आखणे, मार्गदर्शन करणे व समन्वय साधणे इत्यादी कामे संस्था करते. तसेच देशातील इतर संशोधन संस्थांशी संपर्क ठेवते. विविध विकास व अन्य योजना यांमुळे होणाऱ्‍या पारिस्थितिकीय परिणामांचे मूल्यमापन करते. संस्थेने सायलेंट व्हॅली, सतलज व बिआस यांना जोडणारा कालवा, टेहरी धरण, इडिक्की धरण इत्यादी योजनांबाबत तसेच सर्व संभवनीय जीवावरणरक्षित क्षेत्र, राष्ट्रीय उद्याने व वन्य जीवांची अभयारण्ये यांच्या बाबतीत संबंधित सरकारांना आवश्यक माहिती पुरवून धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत केलेली आहे.

या संस्थेचे कार्यालय पश्‍चिम क्षेत्रीय केंद्र, पुणे (महाराष्ट्र) येथे कार्यरत आहे. ते १९५५ मध्ये सुरू झाले असून त्याच्या कक्षेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा ही राज्ये आणि दमण, दीव, दादरा व नगर हवेली, मिनीकॉय, लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश येतात. १९५६ पासून या संस्थेने वेगवेगळ्या प्रदेशांतील सर्व प्रकारच्या वनस्पतींची नोंद करण्याचे कार्य सुरू केले असून वनस्पतींचे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये व्यापक पाहणी करण्याबरोबर काही निवडक भागांच्या सखोल अभ्यासाचे काम संस्थेने केले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष वनस्पतिजात  या ग्रंथांमध्ये देण्यात येत असून ते ग्रंथ वनस्पतिवैज्ञानिक व वनाधिकारी यांना तसेच निसर्ग व वनसंसाधने यांच्याविषयी जिज्ञासा असणाऱ्‍यांना उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांतील वनस्पतींच्या अद्ययावत याद्या उपलब्ध माहितीसह तयार करण्यात आल्या आहेत. या केंद्रात अभ्यासासाठी पुढील सुविधा उपलब्ध आहेत: (१) भरपूर वनस्पतींचा संग्रह; (२) अनेक जुन्या व नवीन वनस्पतिविषयक ग्रंथांचा आणि नियतकालिकांचा संग्रह; (३) पेशीविज्ञान, परागविज्ञान, शरीररचनाविज्ञान वगैरे शाखांत काम करण्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा; (४) वनस्पतींच्या भागांचे व त्यांच्यापासून बनलेल्या वस्तूंचे, खडकांचे वगैरे नमुने असलेले संग्रहालय; (५) औषधी वनस्पतींचा रासायनिक विश्‍लेषणाकरिता पुरवठा व त्याबाबत संशोधन; खाद्य व अखाद्य तेलांसंबंधी संशोधन; (६) वनस्पतींचे व त्यांच्या भागांचे नमुने पुरविणे. या संस्थेचे वनस्पतिसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय विद्यार्थी, संशोधक व इतरांस खुली असल्याने वरील सर्व बाबींचा उपयोग गरजूंना होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा