डेल्फिनियम प्रजातीतील फुलझाडे

शोभिवंत फुलझाडांची एक प्रजाती. डेल्फिनियम प्रजातीत सु. ३०० बहुवर्षायू फुलझाडांचा समावेश केला जातो. या वनस्पती रॅनन्क्युलेसी कुलातील असून बचनाग व काळे तीळ या वनस्पतीही याच कुलातील आहेत. या प्रजातीतील बहुतेक जाती मूळच्या उत्तर गोलार्ध आणि आफ्रिकेतील उंच पर्वतमय प्रदेशांतील आहेत. भारतात या प्रजातीच्या सु. २० जाती आढळतात. त्यांपैकी पाच-सहा जाती हिमालय, काश्मीर व तिबेट येथे, सु. पंधरा जाती अन्यत्र तर महाराष्ट्रात एक जाती (डे. डॅसिकॉलोन) वनात आढळते. काही थोड्या जाती (डे. अ‍ॅजॅसिस) बाहेरून आणून बागेत लावलेल्या आहेत. डेल्फिनियम प्रजातीच्या वनस्पतींना इंग्रजी भाषेत ‘लार्कस्पर’ म्हणतात. बहुतेक सर्व जाती विषारी आहेत.

डेल्फिनियम प्रजातीच्या वनस्पती १० सेंमी. ते २ मी. पर्यंत उंच वाढतात. पाने साधी, एकाआड एक, हस्ताकृती विभागलेली किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. फुले मंजिरीत येतात. ती मोठी असून निळी, जांभळी, पांढरी किंवा गुलाबी अशा विविध रंगांत असतात. पाकळ्या चार असून वरच्या दोन पाकळ्यांपासून आलेली शुंडिका (सोंडेसारखी बंद नळी; स्पर) निदलपुंजाच्या शुंडिकेत शिरते. निदलपुंजाचे पाच भाग असून त्यांपैकी एकावर ही शुंडिका असते. फळे पुटक प्रकारची असून त्यात अनेक काळ्या व चकचकीत बिया असतात. परागण मधमाश्यांमुळे होते.

रॉकेट लार्कस्पर (डे. अ‍ॅजॅसिस) : याला निळी फुले येतात व याची पाने फार विभागलेली असतात. याचे बी डोक्यातील उवांकरिता आसवरूपात वापरतात. बियांत अत्यंत कमी प्रमाणात अल्कलॉइड (एक टक्का) आणि अधिक प्रमाणात अबाष्पनशील तेल (३९ टक्के) असते.

घाट लार्कस्पर (डे. डॅसिकॉलोन) : यालाही भडक निळी फुले येतात. फुलांनी बहरलेली ही जाती खूप आकर्षक दिसते. जुन्नर, पुरंदर, सिंहगड, तोरणा (पुणे जिल्हा) इ. टेकड्यांवर ही वनस्पती तुरळकपणे दिसते.